Monday, April 4, 2016

http://m.maharashtratimes.com/edit/ravivar-mata/etheist-in-maharashtra/articleshow/51664796.cms

हा लेख कालच्या महाराष्ट्र टाइम्समधे प्रसिध्द झाला. आणि मग अर्थातच काही फोन्स, काही मेल्स आणि फेसबुकवरच्या कमेन्ट्स असा प्रतिसाद त्यावर आला.
काही उटपटांग असंबध्द कमेंट्स आल्या नसत्या तरच नवल होतं. तशाच त्या आल्याही. म्हणून विवेकवादाच्या वाटेवर नुकत्याच धडपडत पावले टाकत चाललेल्या लोकांसाठी काही लिहिणे आलेच.
नास्तिक विचाराच्या अस्तित्वाने आणि होय आम्ही नास्तिक आहोत असे छातीठोक पणे सांगणारांच्या अस्तित्वाने बरेच लोक थोडे बावचळतात. कधी रागावतात. त्या वाटेवर जाण्यासाठी थोडे समाजभय ज्यांना आडवे येते, किंवा परंपरांचा पगडा ज्यांना छानच वाटतो ते लोक अशा गुणाढ्य होकारावर जरा जास्तच रागावतात, याचा अनुभव सगळ्याच दिलखुलास नास्तिकांना आलेला असतो. त्यामुळे त्यांना त्याचे विशेष काही वाटत नाहीच. प्रश्न आहे तो नवख्यांचा.
तुम्ही मुस्लिम आस्तिकांवर टीका करीत नाही, तुम्ही ख्रिस्ती आस्तिकांना काहीच म्हणत नाही या नेहमीच्या काड्या टाकल्या जातातच. शिवाय नास्तिक लोक जातीभेद पाळतातच असाही एक अनर्गल बकवास गमतीगमतीत केला जातो. शिवाय नास्तिक लोकांनी एकत्र आलं म्हणजे काय होणार. तेच ते बोअरिंग बोलतात (इंटरेस्टिंग हळदीकुंकू नसतं ना त्यांच्यात!), मग आता यांचा हा एक नवा धर्म, नवी पोथीच तयार होणार का वगैरेही पुळचट युक्तीवाद हुषारीने मांडले जातात. या फडतूस पण तरीही वारंवार होणाऱ्या हल्ल्याला उत्तरे आहेत.
नास्तिक्यविचाराकडे नव्याने वळणाऱ्या लोकांना सांगणे आहे- की नास्तिक मेळावा म्हणजे चळवळ नव्हे किंवा कुणालातरी कन्विन्स करण्याचा मंच नव्हे. जे कुणी या दिशेने विचार करतात त्यांना तुम्ही अयोग्य विचार करीत नाही, या विचारात अनीती नाही, तर कुठल्याही भयगंडातून श्रध्देचा गंज चढवून न घेणारे तुम्ही निर्भय, चमकदार- ब्राईट- लोक आहात हे सांगण्यासाठी इतर नास्तिक एकत्र उभे रहात आहेत.
"नास्तिकांची संख्या वाढेल ही अंधश्रध्दा आहे, किंवा नास्तिकता हीच एक श्रध्दा आहे, किंवा धर्म आहे"... वगैरे वाक्ये टाकणारे आपली या विषयातील समज तोकडी आहे एवढेच जाणवून देतात, मित्र हो. त्याने स्वतःचा बुध्दीभेद करून घेऊ नका. जे विवेकबुध्दीला पटत असेल तेच करा एवढ्याच गोष्टीचा आग्रह धरतात बरेचसे नास्तिक. आणि त्याचाच भाग म्हणून ज्या गोष्टी विवेकाच्या कसोटीवर उतरत नाहीत त्यांचे तसे- अविवेकी, त्याज्य रूप दाखवून देतात नास्तिक.
धर्म, श्रध्दा हे अखेर जवळपास साऱ्याच दुष्कृत्यांचे मूळ जनक असतात हे एकविसाव्या शतकात पुरेसे सिध्द झाले आहे. त्यावर विचार करून स्वतःची वाटचाल ठरवतात नास्तिक. आपण फक्त हा विचार मनात दडपला जाऊ नये म्हणून एकत्र येत आहोत.
अनेकांची बुध्दी केवळ ज्यांच्या पोटी आपण जन्माला आलो त्यांची मने सांभाळण्यासाठी साखळदंडांत पडते. शिवाय सारे काही परंपरेनुसार करणारांचा जथा सोबत असेल आणि बुध्दीबळ कमी पडत असेल तर त्याही साखळ्या पायात घोटाळतात. आपल्या बुध्दीला विचारांच्या निर्भय प्रवासाची चाकं मिळावीत, आपल्या सदैव घडत रहाणाऱ्या विवेकी, अंतिमत्वाचा दावा न करणाऱ्या मतांना शब्द मिळावेत म्हणून नास्तिकांनी एकमेकांची सोबत आहे हे जाणून राहिले पाहिजे.
आपले मत म्हणजे बाबावाक्यच असे समजणाऱ्या अनेक मतांच्या गल्बल्यापुढे गडबडून जाऊ नये म्हणून हे सांगणे. नास्तिकता अखेर सर्व दुष्कृत्यांचे मूळ "देव हा भ्रम" आणि "भ्रामकतेतूनच निपजलेले कुठलेही  धर्म" हेच आहेत या विचारापर्यंत पोहोचवते म्हणून बरीच गर्दी अस्वस्थ होत असते हे लक्षात ठेवले तरीही पुरे. 

1 comment:

  1. Repeating same comment I posted for your speech...
    प्रश्न आस्तिक योग्य की नास्तिक हा नसून गोष्टी कालानुरूप पारखून घेऊन त्यातले चांगले ते पुढे नेणे, वाईट ते विसरून जाणे असा विवेकी दृष्टीकोन बाळगणे महत्वाचे. नाहीतर लोकांच्या आस्थेवर टीका करताना अजून एक "नास्तिक" धर्म जन्माला येईल. धर्माला अफूची गोळी मानणाऱ्या "संप्रदायातून" अनेक पक्ष आधीच कार्यरत आहेत. त्यात अजून एक भर.

    जाती, धर्म, देव, दानव, भाषा, देश इ. मानवनिर्मित गोष्टी उत्क्रांती आणि नागरिकीकरण या प्रक्रियेतून घडत गेल्या. मानवी समूहाला एकत्रित बांधून ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग पण झाला. त्यातून काही अपप्रवृत्ती झाल्या असतील व मानवी समूहाला एकत्र ठेवण्यासाठी धागा म्हणून कालबाह्य ठरल्या असतील तर त्यांना विसरणेच चांगले, मात्र असे करताना उगीच आधीच्या पिढीला झोडपत बसण्यात काही अर्थ नाही. तेव्हा योग्य होते तसे ते वागले, आत्ता योग्य आहे तसे आपण वागू.

    ReplyDelete