Tuesday, April 5, 2016

आस्तिकांनी डोक्यावर घेतलेले आणखी एक चेटूक

रामदेव बाबा! गेल्या दोन दशकांत हा 'बाबायोगा' दरवर्षी मोठामोठा होत गेला. मास स्केलवर योगासनांची शिबिरे भरवण्याचा त्याचा उद्योग सुरू झाला तो साधरणतः १९९५-९६ च्या सुमारास. आणि मग त्याच्या प्रभावी भाषणशैलीचे व्यापारी सौष्ठव ओळखून त्याला काही व्यावसायिकांनी उचलून धरले. सन २००३ मधे बाबा रामदेव टीव्हीवर झळकू लागला. पहाटेच सुरू होणाऱ्या तथाकथित अध्यात्मिक चॅनेल्सच्या रांगेतल्या आस्था चॅनेलमधे याचीही भर पडली.
टीव्हीवरच्या किंवा कुठल्याही चकाकत्या पडद्यावरील माणसांच्या दर्शनाने भारतीय लोक कसे खुळावतात याची उदाहरणे अगणित आहेत. रामदेव बाबाचा योग, संस्कृती, ‘भ्रस्टाचार’ विरोध, नीती, आरोग्यदात्याची भूमिका, मोठमोठे रोग केवळ योगसाधनेने बिनपैशात बरे करण्याचे दावे, भव्य शामियान्यातील हजारोंच्या गर्दीला एका हाकेसारशी गुडघे टेका, अंगठे धरा वगैरे योगासनांच्या सूचना देण्याची हातोटी या साऱ्याची नशा त्याचे कार्यक्रम पाहाणारांच्या आणि प्रत्यक्ष योग करायला जाणारांच्या डोक्यात भिनली नसती तर नवल. सकाळी उठलं की फुकटात आय़ुर्वेद शिकायला मिळतो अशी शॉर्टकट तज्ज्ञांची चंगळही झाली. आचार्य बालकृष्ण वनस्पती हातात धरून आय़ुर्वेद आणि ओषधी यांचे प्रवचन देऊ लागलेच होते. त्यातून एक वेगळेच साम्राज्य उभे रहायचे होते.
बाबायोगाचे चेटूक पद्धतशीरपणे समाजातल्या योगासने करायचा वेळ परवडणाऱ्या वर्गावर पसरत गेले. कोकाकोलाका उपयोग किसलिये? संडास साफ करने के लिये- या सारख्या घोषणांनी अमेरिकी उत्पादनांना सांसकृतिक विरोध करणारांना चेव आला. कोककोलाचा खप कमी झाल्यावर रामदेवबाबाला आपली ताकद खऱ्या अर्थाने लक्षात आली. २००६मध्ये पतंजली आय़ुर्वेद ही कंपनी बाबायोगा आणि त्याचा उजवा हात बाळकृष्ण यांनी स्थापन केली. भक्तांच्या श्रध्दाळू मनांची जमीन प्राणायामांच्या फाळाने नांगरून झालेली. आपल्या नावे करून झालेली. आता केवळ धंद्याचे बियाणे टाकायचे बाकी होते. दहा वर्षांत या कंपनीची उलाढाल 4500 कोटी रुपयांवर गेली आहे. दर महिन्याला ५०० ते साडेपाचशे कोटीची भर पडण्याचा सध्याचा वाढीचा वेग आहे. बाबायोगाच्या लोकप्रियतेच्या चेटुकात आता जाहिराती, सरकारी पाठबळ अशीही भर पडली आहे. धडकधडकनाचनगुरूंला आता ही जागतिक पातळीवर पोहोचलेली स्पर्धा जाणवू लागली आहे. पतंजली उत्पादने सरकारी मर्जीतल्या उद्योगपतींच्या रिटेल स्टोर्समधून रॅक्सभरभरून विकली जात आहेत. मॅगीवर हल्ला करणे हा बाबायोगाच्या जारणमारणाचाच भाग होता. मग कशा पतंजली नूडल्स आळ्या तेही आपण पाहिले आहे. पुढची तारीख घातलेली उत्पादने आजच बाजारात येत आहेत हेही आपण पाहातो आहोत.
या साऱ्या प्रयत्नांकडे चलो ठीक है एक भारतीय कंपनी पाय रोवू पाहातेय तर काय वाईट आहे असे म्हणून सोडून देता आलेच असते.
पण बाबायोगाचे चेटूक सोडून देण्यासारखे नाही. अर्थात आमच्यासारख्यांनी काही लिहिलं म्हणून या चेटकाला काही फरक पडेल असे नाही याची पुरेपूर जाणीव आहे.
आता बाबायोगाचे इतर आलामंतरकोलाकंतर काय असते ते पहा.
या बाबायोगाने योग आणि प्राणायामांच्या उपयोगातून कॅन्सर- स्तनांचा कॅन्सर, यकृताचा कॅन्सर, प्रोस्टेट, गर्भाशय, पिट्युटरी ग्रंथीचा कॅन्सर आपण बरे करून दाखवल्याचा दावा केला होता. यासाठी आपल्याकडे पुरावे आहेत अशे दावेही केलेच. ते पुरावे कधीही समोर आले नाहीतच.
२००६मधेच एड्ससारखा सिंड्रोम योगासनांनी बरा करण्याचा त्याने दावा केला तेव्हा देशाच्या आरोग्य मंत्रालयाने त्याला ताबडतोब हे दावे करणे थांबवावेत अशी नोटिस दिली. त्याने ते लगेच थांबवलेही. मद्दडांच्या मनाचा कब्जा करण्यासाठी असा फुटकळ दावा थोडा काळ केला तरी पुरेसाच होता.
योग, संस्कृत भाषा एवढ्यापुरतेच शिक्षण घेतलेले असल्याने बाबायोगाकडून आणखी काही अभ्यस्त अपेक्षा करणे चूकच आहे. त्यामुळे होमोसेक्शुअलिटी हा एक रोग आहे असे त्याचे ठासठासून सांगणे त्याच्या कुवतीनुसार बरोबरच होते. जगभरात होमोसेक्शुअलिटीबद्दल जागृती होत असण्याचा तो काळ होता. तिथे बाबायोगाने आपल्या अकलेचे दिवे पाजळून देशातल्या मी माझे स्वतःचे डोके कधीही वापरणार नाही अशी शपथ घेऊन जन्मलेल्या अनेकांच्या मनातला अंधार आणखी गडद केला. आणि होमोसेक्शुअलिटी प्राणायामाने बरी होऊ शकते असे म्हणून न जाणो किती पालकांनी आपल्या मुलांना मानसिक त्रास दिला असेल...
अर्थातच हे दावे करून तशी औषधेही दिव्य औषधी मंदिरमार्फत विकली जाऊ लागली होती.
बाबायोगाची आणखी एक मूठमारी म्हणजे विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देऊन त्यांची मने दूषित करण्यापेक्षा सर्वत्र योगिक शिक्षण सुरू करा असे सांगणे.
बाबायोगाचे पंजाबीड्रेसयुक्त पलायन ज्या आंदोलनात घडले होते ते आंदोलन अखेर हिंदुत्ववादी सरकारला कसे उपयोगी पडले हा आता इतिहास आहे. काळ्या पैशाबाबतच्या उपोषणांची नौटंकी करताकरता बाबायोगा स्वतःच एका काळ्यापैशाबाबतच्या संवादात अडकला होता. पण असल्या गोष्टींची सारवासारव आपल्या देशात कषायवस्त्र ल्यालेल्या कुठल्याही चोराला करता येते हे काही वेगळे सांगायला नको. काँग्रेस नेतृत्वाची फुकटचंबू फौजही या बाबांपुढे झुकत होती, विज्ञानवीर म्हणवणारे, कलाम, भटकर हेही बाबायोगा, बाबाभोगांच्या समोर झुकत आले आहेत.
आज भगव्याचा उद्घोष करणाऱ्या सरकारच्या राज्यात या भगव्याखाली नागव्या असलेल्या बाबाबुवांना भारीच सुरक्षित दिवस आले आहेत. साधी नोटिसही येणार नाही आरोग्यविभागाकडून तर कायदा सुरक्षा विभाग तर हात बांधूनच रहाणार हे स्पष्ट आहे.
एवढा श्रीमंत, सत्तामंत बाबायोगा आता मर्यादा सोडून का बोलू लागला आहे याची ही पार्श्वभूमी आहे.
या देशात (अजून) कायद्याचे राज्य आहे म्हणून- नाहीतर भारतमाता की जय न बोलणाऱ्यांची मुंडकी छाटली असती असे बोलण्याचा माजोरीपणा या बाबायोगाने आज दाखवला आहे. हा बेशरमपणा असाच वाढत जाणार आहे. शांतीच्या नावाने कार्यक्रम भरवायचे आणि त्यात हिंसेलाच उत्तेजन द्यायचे हा कार्यक्रम बेमुर्वतपणे राबवण्यात संघपरिवाराला आता असल्या चेटक्यांचीही मदत मिळू लागली आहे.
हे थांबवणे अवघड होत जाणार आहे. केवळ निर्भय संघर्षच यांना थांबवू शकतो. तो करावा लागेल.
Like
Comment

No comments:

Post a Comment