Tuesday, April 5, 2016

नासदीय सूक्त

नासदीय सूक्त म्हणजे बिगबॅन्ग सिध्दांताच्या जवळ जाणारी रचना आहे एवढेच नव्हे तर तसा अभ्यासच आपल्या पूर्वजांनी केला होता असे अतिशयोक्त दावे करायला मजाच येते परंपरावादी विद्वानांना.
नासदीय सूक्त अज्ञेयवादी विचाराची सुरुवात आहे. म्हणजे आस्तिक्याकडे झुकणारा अज्ञेयवाद आहे तो. नास्तिक्याकडे झुकणारा नाही. फार सुंदर कल्पना केली आहे. यातून एक सुंदर प्रतिभावान विचार समोर आला आहे हे नक्की. बिग बॅन्ग चे भौतिकशास्त्रवंत ज्ञान वेगळे.
                पण नासदीय सूक्त नक्की काय म्हणते ते जाणून घ्यायला हरकत नाही. मानवी जिज्ञासेतून स्फुरलेलं एक श्रेष्ठ काव्य आहे ते.



नासदासीन्नो सदासीत् तदानी
नासिद्रजो नो व्योमा परोयत् 
किमावरीवः कुह कस्य शर्मन्
अम्भ किमासीत् गहनम् गभीरम् .१
हे सारे निरस्तित्व नव्हते आणि अस्तित्वातही नव्हते. नव्हते वातावरण, नव्हते त्यापलिकडले आकाश. कशाने कशावर आवरण घातले होते? कोणी कुणाला आधार दिला होता? सारे जलमय होते कां... खोल खोल अथांग जल... होते कां ते तरी?

न मृत्यूरासीदमृतं न तर्हि
न रात्र्या अह्न आसीत् प्रकेतः.
आनीदवातं स्वधया तदेकं
तस्माद्धान्यं न परः किंच नास .२.
मृत्यूचे अस्तित्व नव्हते आणि अमर असेही काही नव्हते. रात्र आणि दिवसाचा भेद जाणव देणारे काहीही नव्हते. स्वतःच स्वतःचा श्वास बनलेले की श्वासरहित असे ते एक अस्तित्व... त्यापेक्षा वेगळे असे काहीच तर नव्हते तेव्हा.

तमआसीत्तमसा गूळ्ह
-मग्रेsप्रकेतं सलिलं सर्वमा इदम्
तुच्छ्येनाभ्वपिहितं यदासीत्
तमसास्तमहिनाजायतैकम् .३.
अंधःकार होता... सारा अनियंत्रित गोंधळ अंधःकारानेच पोटात घातलेला. जे जे काही होते ते नव्हतेही, निराकार होते... उष्ण शक्तीतून, अंधःकाराच्या अस्तातून ते काही एकमात्र जन्माला आले.

कामस्तदग्रे समवर्तताधि
मनसो रेतः प्रथमं यदासीत्
सतो बन्धुमसति निरविन्दन्
हृदि प्रतीष्या कवयो मनीषा .४.
आणि मग उद्भवली आरंभीची कामना... आत्म्याचे परम बीज, सूक्ष्म प्राण अशी ती कामना. नंतरच्या विचारवंतांनी आपल्या हृदयातून विचार करून निरस्तित्वाशी अस्तित्वाचे नाते शोधून पाहिले.

तिरश्चीनो विततो रश्मिरेषाम्
अधः स्विदासीदुपरी स्विदासीत्
रेतोधा आसन् महिमान आसन्
स्वधा अवस्तात प्रयतिः परस्तात .५.
त्यावेळी त्या दोघांमधील अंतर मिटत जाताना, त्या वरील अवकाशात काय होते आणि त्याखालील अवकाशात काय होते? तेथे सर्जक होते, महाशक्ती होत्या, मुक्तपणे काहीकाही घडत होते आणि ऊर्जेचा कल्लोळ होता

को अद्धा वेद क इह प्रवोचत्
कुत आजाता कुत इयं विसृष्टिः
अर्वाग् देवा अस्य विसर्जनेना-
sथा को वेद यत आबभूव .६.
ते जे घडत होते, जन्माला येत होते, निर्माण होत होते, त्याचा उगम कोणता, उद्भव कसा झाला, हे कोण निश्चितपणे सांगू शकेल? ही सृष्टी निर्माण झाल्यानंतर देवांची निर्मिती झाली. मग प्रथम कोण अस्तित्वात आले होते हे कोण जाणत असेल?

इयं विसृष्टिर्यत आबभूव
यदि वा दधे यदि वा न
यो अस्याध्यक्षः परमे व्योमन्
सो अङ्ग वेद यदि वा न वेद.७.
या निर्मितीचा मुळारंभ जो होता... त्यानेच या साऱ्याला आकार दिला- की नाही दिला? या सृष्टीवर सर्वोच्च स्वर्लोकीच्या कुणा दृष्टीचे नियंत्रण आहे? आहे कां? त्याला तरी हे सारे निश्चितपणे कळत असेल की नसेल...?


हा अनुवाद पूर्वीच कधीतरी करून ठेवलेला... 

No comments:

Post a Comment