Tuesday, March 29, 2016

काही संभ्रमित प्रश्नांची उत्तरे

काल फेसबुकवर नास्तिक मेळाव्याचे भाषण एका मित्राने शेअर केले. त्यावर एकाने खवळून विचारले मुग्धाताईंना विचारा त्यांनी किती आंतरजातीय विवाह घडवून आणले. अर्थात हा प्रश्न विषयाशी असंबध्द होता. पण गंमत म्हणून जे आहे ते सांगितलं. त्यावर दुसरे एक आस्तिक काका खवळून म्हणू लागले- "आंतरजातीय विवाह करण्याच्या बढायांनी कुठला नास्तिकवाद सिद्ध झाला?"
आणि पुढे हे प्रश्न विचारले.
-धर्म माणसाच्या मनातल्या अंगभूत भीती या भावनेवर मात करण्यासाठी निर्माण झाला असा इतिहास आहे.नास्तिकवाद मानवाला भीतीमुक्त करण्याची ग्वाही देतो का?नास्तिकवाद नेमकी कुठली समाजरचना मांडतो?नास्तिकवादाला नीतीनियम मान्य करीत असल्यास त्याला मान्य असलेले नीतीनियम कुठले?नास्तिकवादाचा टेंभा मिरवणार्यांना सध्या आहे ही समाजरचना मान्य आहे का?असेल तर आस्तिकवाद्यांना ते कुठले स्थान देणार?काय आहेत या प्रश्नांची उत्तरे?-
त्यांना फक्त ही बढाई नाही, प्रश्न आला म्हणून उत्तर दिले एवढेच सांगितले. त्यांनी विचारलेले इतर प्रश्न इतर अनेकांना पडत असतील. म्हणून एकास एक उत्तर न देता ते जरा सविस्तर देण्याचे ठरवले.


धर्म माणसाच्या मनातल्या अंगभूत भीती या भावनेवर मात करण्यासाठी निर्माण झाला असा इतिहास आहे.नास्तिकवाद मानवाला भीतीमुक्त करण्याची ग्वाही देतो का?
धर्म माणसाच्या मनातल्या भीतीतून जन्माला आला. त्याने भीतीवर मात केली नसून भीतीवर मात करण्याच्या मिषाने भीतीचा गैरफायदाच उठवला आहे. उलट नवनवीन भीतीदायक कल्पनांची निर्मिती सर्व धर्मांतून झाली हे पाहू शकता. रौरव नरकांत, सप्तनरकांत सतत भाजून, सोलून निघण्याची भीती ही धर्मांनी निर्माण केली. ख्रिस्ती धर्मांत जे आहे तेच उर्वरित दोन आब्रहमिक धर्मांतही आहे. आणि हिंदू धर्मात तर देवाच्या निर्मितीचा दावा करून- शिरापासून अमके नि पायापासून तमके म्हणून ती उतरंड झुगारून देण्याचा भीतीही मनामनांत रुळवली धर्माने.
नास्तिकवाद नव्हे नास्तिक्य ही भीती झुगारून देता आली की पटते आणि नास्तिक्य एकदा पटू लागले की काल्पनिक अस्तित्वांची भीती नष्ट होण्यास सुरुवात होते.

नास्तिकवाद नेमकी कुठली समाजरचना मांडतो?
व्यक्तीचे विचार स्वातंत्र्य देणारी समाजरचना. पापपुण्याच्या हिशेबाची भीती, त्यातून सुटण्याचे ईश्वराला देण्याच्या लाचेचे प्रयत्न याशिवायच्या  नीतीकल्पनांवर आधारित समाजरचना. स्वतंत्र चिरंतन सत्य आणि भयमुक्त नीती अशी शाश्वत मूल्ये मानवजातीने स्वीकारलीच होती. धर्म हा फार नंतर आलेली लबाडांनी भोळसटांसाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे. मानवी उत्क्रांतीचा काळ एक लक्ष वर्षे धरला तर त्यातील प्रबुध्द मानव गेली बारा हजार वर्षे अस्तित्वात होता. आणि आहे त्या स्वरुपातले सारे धर्म हे ताणूनताणून गेल्या चार ते पाच हजार वर्षांमधले आहेत. अत्यंत हेकट, भयाधारित समाजरचना झुगारून देऊन गतीशील, नीतीमान समाजाची कल्पना नास्तिक व्यक्ती करतात.
नास्तिकवादाला नीतीनियम मान्य करीत असल्यास त्याला मान्य असलेले नीतीनियम कुठले?
नास्तिकवाद हा मुळातच धर्मजोखडविरहीत नीतीकल्पनांवर भिस्त ठेवतो. व्यक्तीच्या उत्तम क्षमतांचा पूर्ण विकास करण्याची संधी देणारी नीतीची कल्पना नास्तिकांना, विवेकनिष्ठांना अभिप्रेत आहे. अनेक लोकशाही राष्ट्रांच्या घटनांतून मांडलेले मूलभूत हक्क हे नास्तिक लोकांनीच शब्दांकित केले आहेत. व्यक्तिगत अवकाशाची पायमल्ली होऊ न देता, समाजस्वास्थ्य जपणे, त्यात कोणत्याही एका घटकावर अन्याय न होऊ देणे हे प्रमुख आहे. आजवरच्या सर्व भिकार धर्मांनी स्त्रियांना सतत कमी लेखले, दुय्यम गुलामीची वागणूक दिली- हे नास्तिकतेच्या नीतीकल्पनेत त्रिवार बसत नाही.

नास्तिकवादाचा टेंभा मिरवणार्यांना सध्या आहे ही समाजरचना मान्य आहे का?असेल तर आस्तिकवाद्यांना ते कुठले स्थान देणार?

नास्तिकवादाचा टेंभा मिरवणे हा शब्दप्रयोग या व्यक्तीची या विचाराबद्दलची असुरक्षितता जाणवून देतो. टेंभे, पलिते तर धर्मांचेच पाजळले जात आहेत. आपल्या वेगळ्या वाटेचा, विवेकनिष्ठेचा नास्तिकांचा अभिमान हा धर्मनिष्ठांच्या जुलमी अभिमानापेक्षा अगदीच सौम्य असतो. धर्मनिष्ठेच्या, ईशनिष्ठेच्या पाईकांनी जो सामाजिक दहशतीचा सांगाडा गेली काही शतके तयार केला आहे त्यावर हल्ला होईल याची भीती यातून स्पष्टच दिसते. होय तो सांगाडा नष्ट व्हावा हीच विवेकनिष्ठांची अंतिम इच्छा असेल. आणि त्यासाठी दीर्घकाळ, अेक शतके जावी लागतील याचेही भान विवेकनिष्ठांना आहे. जसे गेली पाच हजार वर्षे धर्माचे सांगाडे उभे करण्यात गेली पुढील हजारो वर्षे तो नष्ट करण्यात जातील. अखेर हा मानवी बौध्दिक उत्क्रांतीच्या प्रवासाचा भाग आहे- उत्क्रांती सावकाश होत रहाते, आणि त्याला गती देण्याचे बारीकसे काम जगातील विवेकनिष्ठ बुध्दीवंत सातत्याने करत रहातील. 
ही आहेत तुमच्या कोपित पण संभ्रमित प्रश्नांची उत्तरे.

1 comment:

  1. आस्तिकांना फारच भिती वाटते त्यांचा देव, त्यांचा धर्म, त्यांच्या श्रद्धा न मानणा-या माणसांची. त्याच असुरक्षिततेतून हा राग, तिरस्कार ते व्यक्त करत असतील कदाचित. नाहीतर शांतपणे विचारलेल्या प्रश्नाला किंवा मांडलेल्या विचाराला शांतपणे प्रतिक्रिया देता आली असती त्यांना.

    ReplyDelete