माझा देवावर विश्वास नाही- असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे हे पहिल्याप्रथम म्हणून टाकते. मी असं म्हटल्यावर इथे कुणीही दचकणार नाही याची मला खात्रीच आहे.
माझा अमुकतमुकवर विश्वास नाही असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा हे अमुकतमुक अस्तित्वात असतात. खरेखुरे अस्तित्व असते त्यांचे. ते तसे नसते तर त्यांच्यावर विश्वास ठेवणे वा अविश्वास दाखवणे अशक्य होते. पण देवावर विश्वास नाही असे म्हणणे म्हणजे जे अस्तित्वातच नाही त्याच्या अस्तित्वालाच मुळात मान्यता दिल्यासारखे होते. माणसांनी पूर्वापार निर्माण केलेल्या, सर्व संस्कृतीत रुळलेल्या, पण आता निरुपयोगी किंवा उपद्रवीच ठरलेल्या देव किंवा ईश्वर या खोट्याखोट्या समाधानदायक संकल्पनेवर विश्वास नाही असेच आपल्याला स्पष्ट म्हणायची सुरुवात करावी लागेल.
देव ही कल्पना एक दावा आहे. या दाव्याला आजवर कुणीही खडखडीत, स्पष्ट पुरावा देऊ शकलेलं नाही. जे काही आहे ते पुरावे नसलेले चमत्कारिक असे काही दावे, आणि आणखी काही पोकळ दावे.
इतर कोणत्याही विवाद्य विषयात पुराव्यांशिवायचे कोणतेही दावे खरे मानले जात नाहीत. ते दावे खरे ठरण्यासाठी अनंत काळपर्यंत पुराव्यांची वाट पाहात रहाण्याचा प्रश्नच वास्तवात उद्भवत नाही. असे दावे सरळपणे निकामी म्हणून फेकून द्यावे लागतात. पण हा देवाचा विषय मात्र सगळ्या धर्मांनी काहीही तथ्याशिवाय टिकवून धरलाय.
ईशकल्पनेच्या भोवती विणल्या गेलेल्या प्रत्येक धर्माच्या जाळ्याचे धागेदोरे मोठे घट्ट आहेत. पण कोळ्याच्या जाळ्याच्या केंद्रकाशी ज्याप्रमाणे काही विशेष वेगळे नसते- धाग्यांचाच बोळा असतो तसेच धर्मांच्या संकल्पनात्मक जाळ्याच्या केंद्रकापाशी अशाच संकल्पनात्मक धाग्यांचाच चिकटा असतो. अतिशय चिवट धागे- पण कोणत्याही वेगळ्या अस्तित्वाचा पत्ता नसतो. वेगवेगळ्या प्रांतप्रदेशांतल्या, विविध प्रकारच्या कल्पनाशक्ती असलेल्या लोकांकडून निर्माण झालेले दावे म्हणजे ईशकल्पना.
देव या संकल्पनेवर विश्वास का नाही- देव नाही याचा पुरावा काय याचे उत्तर विश्वास नसलेल्यांनी देण्याची अपेक्षा करणे गैर आहे. देव आहे असा दावा करणाराने तो असल्याचा पुरावा द्यायला हवा, आणि तसा वादातीत पुरावा ते जोवर देऊ शकत नाहीत तोवर काही अर्थ नाही. त्यांच्या लाडक्या पोकळ संकल्पनेवर विश्वास न ठेवणारांना त्यांनी त्रास देणे, हिणवणे हा केवळ झुंडीचा बिनडोकपणा एवढेच म्हणता येईल.
आपण सारे या बिनडोकपणाविरुध्द ताठरपणे उभे रहातो. अर्थातच आपणा सर्वांना भेटून आनंद झालाय.
या कार्यक्रमाचे आयोजक, अमित, श्यामला, दीप्ती आणि आजचे माझ्यासोबतचे माननीय वक्ते उत्तम कांबळे, श्रोत्यांमधे उपस्थित असलेले अनेक मित्र, कविता महाजन, निरंजन टकले, मिलिंद मुरुगकर, फेसबुकवर मैत्री झालेले अनेक समविचारीही येणार म्हणाले होते- या सर्वांना अभिवादन करून मी आज जो विषय मांडायचा आहे- नास्तिकांचे जगासाठी योगदान- यावर बोलायला सुरुवात करेन.
या विषयाच्या शीर्षकात एक मोठा बदल आपल्याला करायला हवा. तो मी करते आहे. नास्तिकांचे योगदान याबरोबरच नास्तिकत्वाचे योगदान काय या प्रश्नाचे उत्तर देऊ. नास्तिकांचे योगदान काय असे म्हटले की आपोआपच आस्तिकांचे योगदान काय याची मोजदाद सुरू होईल. आणि जग बराच काळपर्यंत धर्मदंडुक्यांच्या दहशतीत किंवा धर्म, ईश्वर आणि कंपनीच्या रेशमी चाबकांत गुरफटून वाटचाल करीत राहिल्यामुळे आस्तिकांचे प्रत्यक्ष योगदान जास्तच दिसेल. आणि ते दिशाभूल करणारे ठरेल. कित्येक विद्वानांनी आपण देव या समजुतीला भ्रामक मानतो हे आजुबाजूच्या समाजाला कळूही दिले नव्हते.
अगदी आताही अनेक लोक सामाजिक, कौटुंबिक दबावांमुळे आपल्या बुध्दीला देव पटत नाही, आपण निरीश्वरवादी आहोत, किंवा धर्म कालबाह्य झाल्याचे आपल्याला पटते असे उघड मान्य करीत नाहीत. शिवाय आस्तिक-नास्तिक अशा गटांचे योगदान असते की त्यातील बुध्दीमान व्यक्तींचे योगदान असते हा प्रश्नही उभा रहातोच. त्यामुळे आपण नास्तिकतेचे योगदान काय आहे त्यावर लक्ष केंद्रित करू. देव-धर्माच्या कल्पना अमान्य करण्याचे धैर्य आणि रूढ कल्पनांना सत्याच्या शोधासाठी आव्हान देण्याची क्षमता म्हणजेच नास्तिकत्व. या गुणांचे जगासाठी काय योगदान आहे याचा अधिक विचार करू.
नास्तिकांचे योगदान जगात काय हे सांगायचे तर आज विकीपिडीया अख्खी यादीच देतो अनेक विचारवंत, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, कलावंत असलेल्या नास्तिकांची. ज्यातील अनेकांच्या खांद्यांवर आजचं जग उभं आहे. पण मग विकीपीडीया धर्मिक शास्त्रज्ञ, कलावंत यांचीही यादी देतो. यातून अनेक कर्तृत्ववान व्यक्ती या नास्तिक होत्या हे समजून येण्याचे समाधान आपल्याला लाभते हे नक्कीच. पण त्याच स्वरुपाचे समाधान आस्तिकांनाही मिळू शकते.
नोबेल लॉरिएट्सच्या बाबतीत ही गणना झालेली आहे. नास्तिकांची संख्या त्यात जास्त आहे असे दिसून येताच ते नास्तिक नव्हेतच, ही गणना चुकीची आहे हे दाखवण्याचे खटाटोप सुरू होतात.
असं आहे की नास्तिक- ईशकल्पनेवर विश्वास नसलेले कोणतेही नास्तिक कुठल्याही धर्माचे नसतात. ज्या धर्मात आपण अपघाताने जन्म घेतो त्या धर्माचे लोक ज्या परंपरा, वागण्याबोलण्याचीखाण्यापिण्याची संस्कृती अनुसरतात तीच संस्कृती आपण नास्तिकही अनुसरतो. पण म्हणून त्या संस्कृतींच्या मुळाशी असलेल्या- बाळपणापासून धार्मिक संस्कारांच्या मुसळाने नरड्याखाली ढोसून उतरवलेल्या देवाच्या कल्पना नास्तिकांना मान्य नसतात. किंवा कधीतरी आयुष्याच्या प्रवासात त्यांनी त्या मुसळासकट ढोसलेल्या कल्पना फेकून दिलेल्या असतात. आईवडिलांच्या प्रेमापायी क्वचित् श्रध्देचे नाटक केले तरीही ती श्रध्दा वेडगळ आहे हे त्यांना माहीत झालेले असते. विचारांची, बुध्दीची स्वतंत्रता, मनाची निर्भयता हे नास्तिकत्वाचे विशेष आहे. आणि असे नास्तिकत्व विज्ञान-तंत्रज्ञानात गती असलेल्या प्रज्ञेशी संयोग पावले तर मग अशी प्रज्ञा मानवीच काय कोणत्याही जीवसृष्टीसाठी आश्चर्यकारक योगदान देऊ शकते.
पाश्चात्य जगात असे बव्हंशी मानले जाते की नास्तिकतेची कल्पना ही अलिकडच्या काळातली- औद्योगिक क्रांतीनंतर, विचारप्रवर्तनाचे प्रबोधन युग सुरू झाले त्यानंतरची आहे. पण तसे नाही असे संशोधन आहे. प्रा व्हिटमार्श यांनी या विषयावर एक पुस्तकच प्रसिध्द केले आहे- बॅटलिंग द गॉड्स. प्राचीन काळातही नास्तिक विचार होता हे ते त्यातून दाखवून देतात. मानववंश जेव्हापासून साधने तयार करू लागला तेव्हापासून अशी स्वयंप्रज्ञ माणसे- रूढ जीवनाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करणारी माणसे नक्कीच अस्तित्वात असतील. ज्यांनी केवळ निसर्गातील न कळणाऱ्या घटनांना चमत्कार मानून माथे झुकवले त्यांच्याहून वेगळी- चाकाचा विचार करणारी, अग्नी निर्माण करण्याच्या विचार करणारी, निवाऱ्याचा विचार करणारी, दगडी हत्यारांचा विचार करणारी अनेक माणसे होतीच. ईश्वरसदृश मानीव शक्तीच्या हाती आपला जीव सोपवून गप्प न रहाता धडपड करणारी सारी आदिम माणसे ही या नास्तिकत्वाची पूर्वसुरी होती. पण व्हिटमार्श यांनी प्राचीन रोमन साम्राज्यातील नास्तिक विचारवंतांचा लेखाजोखा मांडला आहे.
प्राचीन भारतात तर आता ज्यांच्या शिकवणीचे संघटित धर्मच तयार झाले त्या बुध्द, महावीरांचा विचार वेदप्रामाण्य नाकारणाराच नव्हे, तर निरीश्वरवादी असाच होता. दुर्दैवाने या विचारातील मुक्त निरीश्वरवाद, नीतीतत्वे पोथीनिष्ठ झाली, प्रतीकनिष्ठ झाली आणि त्यांच्या नास्तिकत्वाचे त्यांच्या अनुयायांनी बारा वाजवले. आजीवकांची परंपराही लुप्त झाली.
पण मुक्त निर्भय विचारशक्ती असलेले आणि तिचा अंमल करण्याचे धैर्य दाखवणारे नास्तिकत्व कोणत्याही धर्माचे अस्तित्व आवश्यक मानत नाही. कोणत्याही देवाधारित पापपुण्याचे, स्वर्ग-नरकाच्या कल्पनांचे अस्तित्व मानत नाही, नास्तिकत्वाच्या नीतीनिष्ठा, सदसद्विवेक, मूल्यनिष्ठा या कुठल्यातरी नरकात जळत रहाण्याच्या कल्पनेतून येत नाहीत, मेल्यानंतर प्रेताला किडे पडण्याच्या कल्पनेतून येत नाहीत, आणि गंगेत बुडी मारून, किंवा मक्केला जाऊन किंवा चर्चमधे कबुलीजबाब देऊन केलेली पापे धुतली जातात या आशेने एखाददुसरे पाप करून टाकू बुवा असेही नास्तिकत्वात शक्य नाही. दुष्कृत्य केले तर त्यातून देव आपल्याला तारून नेईल असे न म्हणता आपल्या दुष्कृत्याची शिक्षाही भोगायला बळ देते ते नास्तिकत्व. धर्मनिष्ठांतून निर्माण झालेल्या अनेक दुष्कृत्यांचा उगम असलेला धर्मच नाकारून आव्हान देण्याचे सामर्थ्य नास्तिकत्वात आहे. नास्तिकत्वाचे सर्वात मोठे, महत्त्वाचे असे योगदान हेच आहे.
नास्तिकत्वाला सर्वात मोठा सामना करावा लागला होता तो ख्रिस्तीधर्मातील सनातन्यांचा. गेली दोन हजार वर्षे जगभरात पसरलेला आद्य संघटित धर्म होता ख्रिश्चॅनिटीचा. यातील जीझस या तथाकथित देवाच्या पुत्राच्या दयाकरुणेच्या कथाच कथा ऐकायला मिळतात. चमत्कारांच्याही कहाण्या धर्माच्या गळाचे आमिष म्हणून आहेतच. पण याच धर्माचे अनुयायित्व जगातील सर्वांनी स्वीकारावे यासाठी ख्रिस्ती धर्मगुरूंनी जगात अनेक शतके धुमाकूळ माजवला, अनन्वित पाशवी अत्याचार केले हा इतिहास आहे. भारतात अनेकांना वाटते की त्यांच्या धर्मगुरूंनी आणि त्यांच्यापाठीमागे उभ्या असलेल्या विदेशी सत्ताधाऱ्यांनी केवळ धर्मांतरासाठी दुसऱ्या देशांत जाऊन अत्याचार केले. तसे मुळीच नाही. त्यांनी विचहंट केले- चेटक्यांची शिकार... म्हणजे सैतानाची जादू करण्याच्या मनगढन्त आरोपांवरून त्यांच्या स्वतःच्या देशांतच लाखो लोकांवर, स्त्रियांवर, अगदी दोनदोन वर्षांच्या लहान मुलांवरही जिवंत जाळण्याचे प्रयोग केले. जाळून सैतान नष्ट करायचा असा त्यांचा विश्वास होता. विज्ञानाची प्रगती ही या धर्मवेड्यांमुळे अनेक शतके थांबली होती. गलिलिओ गलीली, कोपर्निकस यांचे नवे शोध त्यांनी मुसक्या बांधून थांबवले. ज्याला अंधारयुग म्हणतात तो कालखंड आणि इन्क्विझिशन्स, क्रुसेड्सचा कालखंड एकच होता- हा काही योगायोग नव्हे. या काळात कोणतेही नवे प्रयोग होऊ शकले नाहीत, किंवा जिज्ञासू मनांनी ते चोरून लपून सुरू ठेवले. मानवी मृतदेहाची चिरफाड करायला बंदी, नवीन औषधे विकसित करण्यास बंदी, नवी साधने विकसित करण्यास बंदी... ख्रिश्चन धर्मवेडाने आजवरही नव्या तंत्रज्ञानाला, नव्या विज्ञानाला विरोध करण्याची परंपरा पाळली आहे. पूर्वी ते अँटिबायोटिक्सना विरोध करीत होते, आता ते जेनेटिक मोडिफिकेशनला विरोध करतात, स्टेम सेल् रिसर्चला विरोध करतात. मानवाची ज्ञानाच्या विज्ञानाच्या वाटेवरची पावले खेचण्याचेच काम धर्मवेड्या, ईश्वरश्रध्द माणसांच्या झुंडींनी केले. याला छेद देऊनही जगाचा भार आपल्या खांद्यावर रक्तबंबाळ होऊनही घेत रहाणारे होते जगभरात पसरलेले एकेकटे नास्तिक. त्यातील काहीजणांना तर आपल्या स्वतःच्या नास्तिकतेच्या प्रवासाची कल्पनाही नव्हती. आपल्या स्वयंप्रज्ञ विवेकाच्या हाकेला ते ओ देत राहिले. आजवर न उलगडलेल्या कोड्यांची उत्तरे देवावर ढकलून न देता शोध घेणे एवढेच त्यांनी आपले नीतीकर्तव्य मानले.
डेविड मिल्स याने लिहिलेल्या अथीस्ट युनिवर्स या पुस्तकात त्याने स्वानुभवाचाच एक किस्सा दिला आहे. चमत्कारी उपाय, फेथ हीलींग वाल्या एका ख्रिश्चन धर्मप्रसारकाच्या त्याच्या गावातल्या फेऱ्याला त्याने विरोध करायचं ठरवलं. कारण हा बाबा डायबिटीज् झालेल्यांनी आपली औषधे, इन्शुलिन इंजेक्शन्स फेकून द्यावीत, कॅन्सरच्या रोग्यांनी केमोथेरपी वगैरे बंद करावी आणि ख्राईस्टच्या आशीर्वादाने रोग बरे करून घ्यावे म्हणून प्रचाराचा धडाका लावत होता. याला विरोध होणे आवश्यक आहे म्हणून मिल्सने तेथे मोर्चा, धरणे वगैरे निदर्शने करायची ठरवली. पण पोलिसांना माहिती द्यायला गेल्यानंतर एकामागोमाग एक सात-आठ पोलिसांनी- हवालदार ते अधिकारी अशा उतरंडीतील सर्वांनीच- आम्ही तुलाच धडा शिकवू, गडबड झाली तर तुलाच अटक करू, मी तुझे दात घशात घालायची वाट पाहीन अशा भाषेत त्याच्या मोर्चाला संरक्षण नाकारले होते. तरीही त्याने मोर्चा काढलाच. आणि त्यात फार काही गडबड झाली नाही. पण भीतीपोटी गप्प न बसणे, मानवकल्याणासाठी दडपण सोसणे हे नास्तिकांच्या नीतीश्रेष्ठत्वाचेच प्रमाण समजले पाहिजे. आपल्यासारख्या नास्तिकांना काहीही चांगले काम करायला त्या काल्पनिक ईश्वराकडून, देवदेव्यांकडून, त्यांच्या दलाल धर्मगुरूंकडून, मुल्लांकडून, बाबाबुवामाँसाध्व्यांकडून एटी जीचं सर्टिफिकेट मिळायची गरज भासत नाही. हे नास्तिकतेचं आपापल्या भोवतालच्या समाजासाठी फार मोठं योगदान आहे.
नास्तिकतेचा प्रवास हा ज्याचा त्यानेच करावा लागतो. विवेकी निर्णयनाच्या टप्प्याकडे येणारी वाट प्रत्येकाला एकेकट्यानेच कापावी लागते. झुंडीचे मेंदूधुलाई तंत्र इथे कामास येत नाही. आपला निर्णय, आपल्या विचारांची निश्चिती ही स्वतःच्या जबाबदारीवर करणे हा नास्तिकत्वाचा दुसरा अर्थ आहे. शहीद भगतसिंगांनी केले म्हणून आम्ही हे अनुसरतो असे कुणी म्हणू शकत नाही. नाहीतर आज शहीद भगतसिंगांच्या नावाचा वापर करून जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, जय गोमाताचे नारे जपत रहाणारे आपण पाहातोच आहोत. कुठल्या ना कुठल्या देवाधर्माच्या पगड्याखाली असलेल्या पालकांच्या पोटी- अर्ज न करता- जन्म घेतलेल्या मुलांना बाळपणापासून बाप्पा जयजय शिकवले जाते, बाप्तिस्मा देऊन सेव्ह केले जाते, किंवा नमाजाचा व्यायाम आणि येता जाता या अल्ला परवरदिगारची रट शिकवली जाते. त्यात्या धर्माप्रमाणे जेजे ठरीव संस्कार असतील तेते मुलांना भोगावे लागतात. पर्याय नसतो. हिंदु धर्मात जन्मलेली मुले येताजाता दिसेल त्या देवळासमोर चपला अर्धवट काढून धावता नमस्कार करायला शिकलेली असतात. सगळे धार्मिक, देवकल्पनाकेंद्री सण, उत्सव मौजमजेशी जोडलेले असतात. अशा वेळी ते सारे कधीतरी बुद्धीला पटत नाही म्हणून नाकारून विज्ञानदृष्टीचा प्रवास सुरू होतो. आपण आज आस्तिक होतो आणि उद्या नास्तिक झालो असेही होत नाही. ती वैचारिक कसोटी स्वतःची स्वतःच द्यावी लागते, आपलं आपण निष्कर्षांपर्यंत पोहोचायचं असतं. साथ असते ती केवळ नास्तिकत्वाचा प्रवास केलेल्या लेखकांच्या पुस्तकांची, ज्ञानाच्या वाटांची.
अलिकडेपासून हिंदू म्हणवल्या जाणाऱ्या भारतीय आचार धर्मात सर्व विचारप्रवाहांना स्थान असणे- हा इतिहास होता- आताची परिस्थिती वेगळी झाली आहे. पण इतिहासात मुस्लिम किंवा ख्रिश्चन किंवा ज्यू या आब्राह्मिक एकेश्वरी धर्मांतील नास्तिकांना अगदी ठेचून मारण्याची असहिष्णुता होती ती हिंदू धर्मात बराच काळपर्यंत नव्हती. हिंदू धर्मातील देव न मानण्याबद्दलची असहिष्णुता मर्यादित होती. (आता तीच असहिष्णुता गायीचं देवत्व मान्य नसणारांना ठेचून मारण्यापर्यंत परिणत झाली आहे हा भाग वेगळा!) ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकापासून ते इसवी सनाच्या बाराव्या सतकापर्यंत टिकून असलेले चार्वाक म्हणजेच लोकायत किंवा बार्हस्पत्य विचाराच्या तत्वचिंतकांना त्रास जरी झाला तरीही त्यांना सरसकट ठार केलेच असेल असे नाही. पण केले नसेल असेही नाही. निर्भयपणे देव, परलोक, पुनर्जन्म, आत्मा वगैरे संकल्पनांना पूर्णपणे फाटा देणाऱ्या या ऐहिक विचारांच्या तत्वज्ञानाला इतर पाच दर्शनांनी बऱ्यापैकी बदनाम केले. पण त्यांचा गलिलीओसारखा छळ झाला किंवा जिओर्डानो ब्रूनोसारखे जाळण्यात आले असेही झाले नसावे. ते केवळ राजाश्रयाअभावी किंवा नंतर लोकाश्रयाअभावीही नामशेष झाले असतील- अजून यावर संशोधन सुरू आहे. पण म्हणजे भारतातला हिंदू किंवा वैदिक धर्म थोर ठरतो असं अजिबातच नाही हे आपण सर्वांनी पाहिलंय. या धर्मात देवाच्या कल्पनेच्या मदतीने रचलेल्या उतरंडींतून झालेली दुष्कृत्ये हजारो वर्षांपासून समाजातले लोक भोगत आहेत. स्त्रिया, आणि देवाच्या नावाने शूद्र ठरवण्यात आलेले लोक यांचे मानवी हक्क नाकारणारा हाही धर्म आहे. त्यामुळे एकेश्वरी हेकट धर्मांच्या जुलमीपणाच्या रांगेत हा धर्मही वेगळ्या कारणांनी बसतोच. तरीही नास्तिक म्हणून छळ करणे या धर्माच्या लोकांनी फार डोळ्यात येईल एवढ्या प्रमाणात- ख्रिस्तींप्रमाणे नक्कीच केले नाही.
अजूनही आपल्यासारख्या नास्तिकांना भारतीय समाजात वावरताना- हो... त्यांचा काय देवावर विश्वास नाही एवढे जरा हिणवून बोलणे सोडले तर फारसा टोकाचा त्रास होत नाही. जो काही कौटुंबिक दबाव असतो किंवा सामाजिक दबाव असतो तो आपण मनावर घेतलं तर झुगारून देता येतोच. आपल्याला फारसे शौर्य गाजवावे लागत नाही. तरीही सामाजिक दबावाला तोंड देत काही गोष्टी नाहीच करणार म्हणण्याचे धैर्य खऱ्या नास्तिकांना दाखवावेच लागते. नाही करणार पूजा, नाही देणार ब्राह्मणाला देवाच्या दलालीची दक्षिणा, नाही करणार खर्च फालतू देवकेंद्री सणांवर, नाही जोडणार हात- असे नकार. आणि हो- योग्य तेच करणार, स्त्रिया आणि शूद्रांना स्वातंत्र्य असू नये हा मूर्खपणा धिक्कारणारच, देवाच्या नावाखाली चाललेल्या लूटमारीला अडवणारच, सणांच्या नावाखाली चाललेले जलप्रदूषण रोखणारच, ध्वनी प्रदूषण रोखणारच, देवळांमधला भ्रष्टाचार अडवणारच असे अनेक होकार आपल्याला धैर्याने द्यावेच लागतात. निर्भय विवेकनिष्ठेचे उदाहरण घालून देण्याचे खरे योगदान नास्तिकांचे आहे.
या दैनंदिन जगण्यापुढे जाणारे नास्तिकांनी हाताळलेले प्रश्न कोणते?
आठवत असेल आपल्या मराठी शाळांतील अगदी पहिलीच्या वर्गापासून हे गृहीतक आपल्या गळी उतरवले जात होते. देवा तुझे किती... सुंदर आकाश सुंदर प्रकाश देव देतो. ही असली बिनडोक गीते जितक्या लवकर पाठ्यपुस्तकांतून जातील तेवढे बरे. करायला हवं काहीतरी. सध्या कठीण आहे.
तर- आस्तिकांचा, धर्मांचा मुख्य मुद्दा असतो ते या जगाच्या, या विश्वाच्या निर्मितीचा. हे जग ईश्वराने निर्माण केले आहे हे प्रमुख गृहितक असते. या प्रमुख गृहीतकाला धक्का लावण्याचे काम करणारे विश्वउत्पत्तीशास्त्र अर्थात् कॉस्मॉलजीचे अभ्यासक प्रामुख्याने नास्तिक किंवा नास्तिकतेकडे झुकणारे अज्ञेयवादी होते.
आल्बर्ट आइन्स्टाईन, रिचर्ड फेनमान्, फ्रेड हॉइल, स्टीफन हॉकिंग, रॉजर पेनरोझ असे अनेक कॉस्मॉलजीकल-मॅथेमेटिकल-ऍस्ट्रोफिझिक्सवरील रिसर्च करणारे शास्त्रज्ञ नास्तिक होते. अलिकडे गाजलेल्या लार्ज हॅड्रॉन प्रोजेक्ट ज्या हिग्ज-बोसॉन कणांच्या संशोधनातून सुरू झाला त्या कणांना शोधून काढणारे प्रमुख वैज्ञानिक पीटर हिग्ज नास्तिक आहेत. पण नास्तिकत्वाचा येन केन प्रकारेण अधिक्षेप होतोच तसे त्यांच्या विश्वनिर्मितीच्या मुळाशी असलेल्या कणांना काही लोकांनी गॉड पार्टिकल असे टोपणनाव दिले. प्रोफेसर हिग्ज यांनी यावर तीव्र नापसंती व्यक्त केली. आल्बर्ट आइन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग यांच्या अनेक विधानांचा सोयिस्कर गैर अर्थ लावून ते आस्तिकच आहेत असा प्रचार सुरू झाला होता. अखेर त्यांना स्पष्ट शब्दांत आपला देव या कल्पनेवर विश्वासच नसल्याचे सांगावे लागले. आइन्स्टाईनला ज्यू धर्मीयांनी, अमेरिकन सश्रध्दांनी अमाप द्वेषयुक्त पत्रे पाठवली. पण तो आपल्या भूमिकेपासून मागे हटला नाही. स्पिनोझाचा देव म्हणजे निसर्ग हाच देव अशी मांडणी करून त्याने व्यक्तिगत जीवनात ढवळाढवळ करणाऱ्या देवाचे अस्तित्व सपशेल नाकारले. आइन्स्टाइनच्या स्पेसटाईम मांडणीने एका शतकानंतर ग्रेविटेशनल वेव्जचे अस्तित्व सिध्द झाले तसेच त्याच्या ईश्वरकल्पना नाकारण्याने आजही वादांना तोंड फुटते आहे आणि तात्विक भूमिका मांडल्या जात आहेत.
गेल्या दोन दशकांपासून डेविड मिल्स, रिचर्ड डॉकिन्स, ख्रिस्तोफर हिचिन्सन, डॅनिएल डेनेट, सॅम हॅरीस, आयान हिरसी अली अशा अनेक नास्तिकतेचे तत्व मांडणाऱ्या वैज्ञानिक तत्वचिंतकांनी विपुल लेखन केले आहे. आपण सर्व लोकांनी डेविड मिल्सचे अथीस्ट युनिवर्स आणि रिचर्ड डॉकिन्सचे द गॉड डिल्यूजन वाचायलाच हवे बरं का.
आज युरोपीय जगात नास्तिकत्वाचा प्रभाव वाढत चालला आहे. आणि यात फार मोठे योगदान युरोपातील नास्तिक विचारवंतांचे, वैज्ञानिकांचे आहे यात शंकाच नाही. पण मघाशी म्हटल्याप्रमाणे रोमन संस्कृतीपासून ईश्वर संकल्पनेवर किंवा त्याच्या निर्मितीवर प्रश्नचिन्ह ठेवणारे तत्वज्ञ होऊन गेले. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात भारतीय चार्वाक परंपरेच्या पाठोपाठ ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात डियागोरास नावाचा रोमन कवी देवाचं अस्तित्व निर्भयपणे नाकारत होता. त्याला पाश्चात्य जगात पहिल्या नास्तिकाचा मान आहे. चार्वाक हा एक गट असल्यामुळे अजित केशकंबली या एका नावाशिवाय आपल्या हाती ठोस नावे फारशी लागत नाहीत. सॉक्रेटिसच्या आधी पुन्हा ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात एम्पेडोक्लीज नावाचा सिसिलीमधील तत्वज्ञ देवाचे अस्तित्व मानणे नाकारून अगदी पहिलीवहिली विश्वोत्पत्तीची थिअरी मांडू पाहात होता. सॉक्रेटिसनेही देवाची तत्कालीन कल्पना नाकारलीच होती.
ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात थिओडोरस नावाच्या तत्ववेत्त्याने देवांचे अस्तित्व नाकारले आणि देवांसंबंधी म्हणून एक ग्रंथही लिहिला. एपिक्युरसने जगण्यासाठी दैवी हस्तक्षेपाची गरज नाही असे सांगितले. आपले आपण शांतपणे जगावे, दैवी शक्तींच्या कोपाची भीती बाळगणे व्यर्थ आहे असे त्याने ठणकावून सांगितले. असेलही देव, पण धर्माच्या भीतीमुळे मानवी आयुष्यातला आनंद नष्ट होण्याचेच काम अधिक होते असेही एपिक्युरसच्या अनुयायांनी सांगितले. आज दोनहजार चारशे वर्षांनंतर हे आपल्याला जवळपास प्रत्येक धर्मातील अतिरेकी पटवून देत आहेत. ड रेरम नेच्युरा या दीर्घकाव्याचा कर्ता ल्युक्रेटिअस याने अनेक कल्पना त्याच्या काव्यात मांडल्या. त्यात देवापेक्षा निसर्गच सामर्थ्यवान असल्याचे म्हटले होते.
नास्तिक किंवा ख्रिश्चन धर्ममान्य तत्वांना संपूर्णपणे नाकारणारे आव्हान देणारे अनेक विचारवंत होते. आपणांपैकी बहुतेकांना जिओर्डानो ब्रूनोचे उदाहरण माहीत असते. पण त्याच्याचसारखे छळ सोसून मेलेले, क्रूरपणे मारले गेलेले अनेक आहेत. १६८९मध्ये काझिमिएझ विसझिन्स्की या पोलिश विचारवंताचा धर्म-न्यायपालिकेने खून केला. त्याने देव अस्तित्वात नाही अशा नावाचे निबंध लिहून नास्तिकवादाचा उघड पुरस्कार केला. त्याच्यावर घाईघाईने खटला चालवून त्याला अगदी ताबडतोबीने- त्याला वाचवण्याच्या पोलिश राजाच्या प्रयत्नांना धूप न घालता- धर्मगुरूमंडळाने क्रूरपणे ठार केले. गरम सळईने त्याची जीभ हासडून मग त्याचा शिरच्छेद करण्यात आला. यानंतरच १७६६मध्ये वोल्तेअरचे सारे प्रयत्न निष्फळ ठरून फ्रँको- ज्याँ ड ला बॅरे याचाही फ्रान्समध्ये नास्तिकतेच्या आरोपावरून शिरच्छेद करण्यात आला. ब्रिटिश नाटककार ख्रिस्तोफर मार्लो याच्यावर नास्तिकतेचा आरोप ठेवला गेला. सुनावणी सुरू होण्याआतच त्याचा खूनही करण्यात आला.
परिस्थिती बदलू शकणारा एक विचार मिटवण्याची घाई जेव्हा प्रस्थापित असत्यांना होते तेव्हा यंत्रणा कशा कामाला लागतात याचा अनुभव आपणही बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा घेऊ लागलो आहोत. म्हणून ब्रूनो, काझिमिएर्झ, फ्रँको-ज्याँ, बॅरे यांच्या योगदानाचीही आठवण ठेवली पाहिजे. नास्तिकतेच्या विचाराचे हे हुतात्मे आहेत.
काझिमिएर्झने जे लिहिले त्यातून त्याची तीव्र मते लक्षात येतात. तो त्याच्या ड नॉनएक्झिस्टेन्शिया डेइ या लिखाणात स्पष्टपणे म्हणतो-
“देवाला माणसाने निर्माण केले. देव ही संकल्पना मानवनिर्मित आहे. त्यामुळे लोक हेच ईश्वराचे निर्माते आहेत. खराखुरा ईश्वर अस्तित्वात नाहीच, तो केवळ मानवी मनात वावरतो. नरपशू- चिमेरा- या कल्पनेसारखीच देव ही कल्पना आहे. देव आणि नरपशू सारखेच काल्पनिक आहेत.
“भोळीभाबडी माणसे देवाच्या निर्मितीच्या माध्यमातून लबाड धूर्त लोकांकडून नागवली जातात. त्यांच्यावर जुलूम करण्याचेच ते साधन बनते. आणि या जुलुमाला संरक्षण मिळते ते त्या देवावर विश्वास ठेवणाऱ्या त्या नागवल्या जाणाऱ्या जनतेकडूनच. काही सुबुध्द लोकांकडून हे सत्य सांगून त्यांना मुक्त करण्याचे प्रयत्न झाले तर ही भोळी जनताच अशा प्रयत्नांचा पराभव करते.
तीनशे वर्षांपूर्वी हे सत्य स्पष्टपणे मांडणाऱ्या आणि त्यासाठी प्राण गमावणाऱ्या या विचारवंताच्या खांद्यावर आज आपण उभे आहोत. आणि साऱ्या जगाला त्या वाटेवर आणून सोडण्यासाठी सिध्द झालेल्या नोबेल पुरस्कारप्राप्त किंवा कोणताही पुरस्कार न लाभताही विज्ञानशोधाचे काम करणाऱ्या अनेक नास्तिकांसोबत आपण आहोत.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र नास्तिकत्व हा काहीतरी लपूनछपून बाळगण्याचा विश्वास उरला नाही. ख्रिश्चॅनिटीमध्ये थोडे मोकळे वारे खेळू लागले. पॅरीसमधे ड हॉलबाख याने उघडपणे नास्तिकतेचा पुरस्कार केला. त्याच्या बैठकींमधे दिदेरो, रुसो, डेविड ह्यूम, ऍडॅम स्मिथ, बेंजामिन फ्रॅन्कलिन यासारखे अनेक विचारवंत हजेरी लावत. फ्रेंच क्रांतीच्या काळात नास्तिक विचाराला आदरपूर्वक अधिष्ठान मिळाले. ब्रिटनमधेही डेविड ह्यूमने इंग्लंडचा इतिहास लिहिला. देवाचा अजिबात उल्लेख नसलेला हा इतिहास आहे. पण फार आपत्ती ओढवू नयेत म्हणून ह्यूमने चमत्कारांची खिल्ली उडवली तरी ख्रिस्ती धर्मावर फार लेखणी उगारली नाही. असे सांभाळून रहाणारे नास्तिकही त्यांच्या कामाच्या झेपेमुळे महत्त्वाचे ठरले. अनेकदा समोर माजलेला मठ्ठ बैल असेल- त्यातून तो काळ्या अंधारातून आलेला असेल तर आडोशाला जावं लागतं हे आपणही लक्षात ठेवायला हवं. विचार करणारा टिकला तर विचार टिकेल हे या बदलत्या धर्मराजकीय काळात आपणही लक्षात ठेवायला हवं.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस कवी शेली याने एक पत्रक काढले. नास्तिकतेची गरज विशद करणारे हे पत्रक वाटले म्हणून त्याची ऑक्सफर्ड विद्यापीठातून उचलबांगडी झाली. पण याच एकोणिसाव्या शतकाने नास्तिक विचार मांडणाऱ्या अनेक विचारवंतांचा ठसा मिरवला. कार्ल मार्क्स हा त्यातील सर्वात मोठा ठसा उमटवणारा विचारवंत. धर्म हा गरीबांचे सहज शोषण करण्याचे साधन कसे बनतो याबद्दलचे त्याचे जगप्रसिध्द विवरण- धर्म ही अफूची गोळी आहे या वाक्यासह जगभरात वणव्यासारखं पसरलं. अनेकांना धर्माचे पर्यायाने देवसंकल्पनेचे जोखड भिरकावून देण्यासाठी बळ देत गेलं. फ्रिडरिश नित्शे याने तर देव मेला असल्याची धाडसी घोषणा केली. गंमत आहे. कार्ल मार्क्सने ज्या विचारसरणीला विरोध करणारा सिध्दांत मांडला त्या भांडवलवादाची मांडणी करणारा ऍडॅम स्मिथही देव नाकारत होता. साम्यवादी विचारसरणीचा विरोध करणारी आयन रॅण्डसुध्दा देवधर्म नाकारते. आय़न रॅण्डचा विरोध करणारा सॅम हॅरीस काय, नोआम चॉम्स्की काय तेही देवाची कल्पना कांडात काढतात.
विसाव्या शतकाने तथाकथित नास्तिक विचारांच्या हुकूमशहांचाही अतिरेक पाहिला. हिटलर, स्तालिन, लेनिन सारे नास्तिक होते असं म्हटलं जातं. पण हिटलरने कधीही ख्रिश्चॅनिटीला मोडून काढलं नाही. देशाचा सनातन धर्म म्हणून त्याने त्यांना वाव दिलाच. लेनिन-स्तालिन यांचा राजकीय डॉग्मा धार्मिक डॉग्माइतकाच जुलमी ठरला. विसाव्या शतकाच्या मध्यातच या सर्वांचा पराभव झाला. आणि नास्तिकत्वाचे खरे मुक्त, स्वतंत्र रूप व्यक्त होऊ लागले.
बर्ट्रांड रसेलसारखा नास्तिक विचारसरणीचा सामर्थ्यवान प्रतिभावंत तत्वज्ञ जगाने पाहिला.
त्यांचा एक लाडका किस्सा सांगते. तो आपण सगळेच आपल्याशी वरचेवर वाद घालायला येणाऱ्या भांडखोर आस्तिकांना थोडाफार बदल करून नक्की सुनावू शकतो.
बर्ट्रान्ड रसेलला त्याच्या नव्वदाव्या वाढदिवसाच्या पार्टीत एका परिचित स्त्रीने विचारलं होतं- “बर्टी, तू मेलास आणि तुला देवाच्या पुढ्यात नेलं गेलं आणि देवाने तुला विचारलं की बाबा रे, तू माझ्यावर विश्वास का नाही ठेवलास... तर मग? काय उत्तर देशील?
रसेलने उत्तर दिलेलं- “‘पुरावा नव्हता, देवा, पुरेसा पुरावा तू ठेवला नव्हतास’ असं सांगेन.”
बर्ट्रान्ड रसेलने आणखी एक सांगून ठेवलंय- खास आपल्यासाठी. तो म्हणतो-
The fundamental cause of trouble in the world today is that the stupid are cocksure, while the intelligent are full of doubt.
आजच्या जगातल्या त्रासाचं मूलभूत कारण एकच आहे- मठ्ठ लोकांना फार खात्री असते आपल्या मतांबद्दल. आणि बुध्दीमान लोक आपली मते सतत संशयपूर्वक पारखून पाहात रहातात.
एकविसाव्या शतकात- नास्तिकत्वाला खऱ्या अर्थाने आशा निर्माण झाली आहे. बर्ट्रांड रसेल सारखा बुध्दीमान तत्वज्ञ आणि रिचर्ड डॉकिन्ससारखा तत्वज्ञाप्रमाणेच मांडणी करू शकणारा उत्क्रांती-जीवशास्त्र अभ्यासक यांच्यामधली नास्तिक बुध्दीमंतांची मालिका आपल्याला पहायला मिळते आहे.
क्रेग वेन्टर या माझ्या लाडक्या वैज्ञानिकाचे नाव मला घेतलेच पाहिजे. क्रेग वेन्टर हा ह्यूमन जेनॉम प्रोजक्टमधला एक प्रमुख संशोधक. दुसरा होता फ्रॅन्सिस कॉलिन्स. वेन्टर नास्तिक तर कॉलिन्स आस्तिक. ह्यूमन जेनॉम प्रोजेक्टच्या पूर्ततेनंतर वेन्टरने स्वतःचे प्रयोग सुरू केले. कृत्रिम डिएनए बनवण्यात त्याने यश मिळवले. आता मानवी दीर्घायुष्य, वाढत्या लोकसंख्येसाठी मुबलक अन्नपुरवठा यासाठी तो काम करतो आहे. सागरी सूक्ष्मजीववैविध्याचे निरीक्षण आणि मांडणी हा त्याचा केवळ स्वतःचा असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आपलीच बुध्दी वापरून जगायचं आहे हे कळल्यावर माणसाने कसं काम केलं पाहिजे याचा आदर्श आहे क्रेग वेन्टर. त्याला स्वतःला एडीएचडी नावाची डिसॉर्डर होती किंवा आहे. अटेन्शन डेफिसिट हायपरऍक्टविटी डिसॉर्डरची लक्षणं आपल्यात आहेत हे समजून घेऊन त्याने त्या डिसॉर्डरला जन्म देणारा जीन स्वतःतच शोधला. देवाच्या कल्पनेने नेस्तनाबूत न होणारी ही माणसेच आपल्याला अधिक समृध्द करणार आहेत.
त्याच वेळी आपल्या देशात काय चाललंय हे मी दाखवायला नको. आपण पाहातोच आहोत. आता वेळ आली आहे आपण भारतीय, आपण मराठी भाषक नास्तिक कसले योगदान देणार आहोत याचा विचार करायची. मला हे बोलण्याचा तसा काहीच हक्क नाही. हा हक्क गेली तीन वर्षे नास्तिक मेळावा आयोजित करण्याचे धैर्य आणि कौशल्य दाखवणाऱ्या तुम्हालाच आहे. २०१०मधे मी भारतीय नास्तिक हा ब्लॉग सुरू केला होता. नंतर त्याला काहीच प्रतिसाद नव्हता म्हणून वैतागून बंदच केला. २०१०मधे सुरुवात करतानाच मी लिहिले होते-
- आधुनिक भौतिक प्रगतीला मानवी आध्यात्मिक प्रगतीतले हीण ठरवून या देशात त्याच भौतिक प्रगतीचा आधार घेतघेत त्यामागील विज्ञानाला पराभूत करण्याचे धंदे चालतात. कितीही उच्च प्रतीच्या अध्यात्मातून, ईश्वराच्या शोधातून, भक्तीतून, तीर्थयात्रा-वाऱ्यांतून, हिमालयातील जपतपांतून आज आपण वापरतो त्यातील साध्यातले साधे अवजारही तयार झाले नसते. कुठल्याही देवाला अनवाणी जाऊन ना कुणाचा आजार बरा होतो ना कसलं यश येतं... पण तरीही असल्याच गोष्टींनी आधुनिक तंत्रज्ञानावर स्वार होऊन आपले हातपाय पसरत नेले आहेत. तर्कशुध्द विचार करण्याचं वळण न लावणाऱ्या आपल्या शिक्षणपध्दतीतून बहुतांशी जे बौद्धिक विकलांग निघत रहातात त्यांना चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची हिंमतच होणार नाही.
एक उपाय मला सुचतो. छोटी सुरुवात असेल कदाचित पण अशी हिंमत असलेल्या नास्तिकांनी, विवेकनिष्ठांनी एकत्र आले पाहिजे. धर्मसंघटना असतात, पंथसंघटना असतात, देवळं-मशिदी-चर्च मंडळींची संस्थाने असतात, कुठल्याही फुटकळ महाराज-बाबा-बापू- माँ- अम्मांचे बिल्ले लावलेले ताफे असतात- आपल्यासारख्या लोकांचा एकतरी फोरम आहे? आपण आळशी आहोत की भित्रे- असा प्रश्न पडावा.
या जगात अनेक देशांतून, आपल्याच देशाच्या विज्ञानसंस्थांतूनही जग अंतर्बाह्य बदलून टाकणाऱ्या विषयांवरचे नवनवीन शोध लागत असताना, नवे शोध लागण्याची गती अनेकपटींनी वाढलेली असताना आपल्या भोवती जो देवधर्मोद्भव अपरंपार वैचारिक गोंधळ माजलेला दिसतो त्याबाबत आपण काय करणार आहोत. नुसतेच छद्मी हसणार?! खाजगीत टर उडवणार?! आणि मग आपण हे बदलू शकत नाही... अहो शतकानुशतकांच्या परंपरा आहेत या... कशा बदलणार... जाऊ द्या म्हणून गप्प बसणार?! विवेकनिष्ठेचा आंतराग्नि फुंकर घालताच फुलू शकतो.
कोणत्याही राजकीय तत्वप्रणालीचा झेंडा खांद्यावर न घेता हे करणे आवश्यक आहे.
भ्रामक कल्पनांना मोडीत काढण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलनाचीच नव्हे तर श्रध्दा निर्मूलनाची गरज आहे. विश्वासावर आधारित असलेला, पुराव्यावर आधारित नसलेला कोणताही दावा- अर्थात श्रध्दा म्हणजे अंधश्रध्दाच असते. हे मत मान्य असलेल्या सर्वांचे हे व्यासपीठ व्हावे.
केवळ लिहिण्यापुरतेच मर्यादित न रहाता आपण हे विषय हाती घेऊन तरूण मुलामुलींपर्यंत पोहोचले पाहिजे. मराठी भाषक मुलेमुली इंग्रजीतले विचार वाचायला अजूनही बिचकतात. भाषेमुळे ज्ञानही परके होते. म्हणून आपले विचार आपल्या भाषेतून. डॉकिन्स, रसेल, हिचिन्सन, डेनेट... साऱ्यांचे विचार आपल्या भाषेतून. लिहायचे. मांडायचे. पोहोचवायचे. हे एक कन्व्हर्जन आपल्याला करायलाच हवं.
आज ते इथे घडायला सुरुवात नव्हे तर सातत्यपूर्ण आय़ोजनाची सुरुवात झालेली पाहून मला खरेच खूप आनंद वाटतो. आपण नुसतेच लिहिले- केले काही नाही याची थोडी शरमही वाटते आहे.
आपल्या देशातील देवसंकल्पनेच्या आणि धर्माच्या चिकट शोषक जाळ्यात अडकलेल्या आपल्या लोकांना सोडवून, थोडेथोडे नास्तिक विचारांचे घास आपण भरवायला हवेत. त्यांना हे विश्व किती मोठं आहे हे समजू द्या.
त्यांच्या राम-कृष्ण-शंकर-विठ्ठल-दुर्गा-लक्ष्मी-हनुमान; ख्रिस्त-पोप-मदर-चमत्कारी संत; अल्ला-महंमद-पीर-काबा या उथळ विहिरींत कुदकण्यापेक्षा बाहेर भव्य असीम जग आहे... अब्जावधी वर्षांपूर्वीच्या ब्लॅकहोल्स टकरीचा हिशेब देणाऱ्या गुरुत्वीय लहरींचेही जग आहे हे त्यांना समजू द्या.
पेल ब्लू डॉटमधे कार्ल सेगन म्हणाला होता- कोणताही धर्म विज्ञानाकडे पाहून असं कधीच का म्हणत नाही की- अरे वा, हे तर आम्ही जे विचार केला होता त्यापेक्षाही छान आहे. आमच्या प्रेषितांनी सांगितलं त्यापेक्षा हे जग कितीतरी भव्य आहे, अधिक रम्य, असाधारण आहे... त्याऐवजी ते जणू म्हणतात छेछेछे- आमचा देव छोटासा आहे आणि आम्हाला तो तसाच रहायला हवं. हे कसं काय- मला कळत नाही. धर्म जुना असो वा नवा- जो धर्म विज्ञानाने स्पष्ट केलेले विश्वाचे भव्य रूप मान्य करून मांडेल त्या धर्माबद्दल स्वाभाविकपणे अधिक आदर, अधिक प्रेम वाटू शकेल नाही कां?
पण अशा विश्वाच्या भव्य रुपापासून सामान्य लोकांना वंचितच ठेवलं जातं. आपण हबलमधून दिसणाऱ्या असीम अवकाशाचा एक चिमूटभर अंश सुध्दा केवढा भव्य आहे ते कधीतरी या लोकांना सांगितलं पाहिजे.

विश्वातील प्रत्येक घडामोडीची कारणं भौतिकच असतात, या पृथ्वीवरच्या जगातल्या घडामोडींचा अर्थ लावायला विविध शास्त्रशाखा असतात... हे त्यांना समजू द्या.
विश्वाचा शोध घेण्याची लालसा बाळगणाऱ्या सर्वोच्च मानवी प्रज्ञेसंबंधी त्यांना काहीतरी समजू द्या-
नाहीतर ख्रिश्चन धर्मात जन्मलेली मुले दोन हजार वर्षांतल्या, मुस्लिम समाजातली मुले सातव्या शतकातल्या, हिंदूंची मुले तीन-चार हजार वर्षांतल्या... वगैरे- इतिहासापुरतीच मर्यादित होऊन रहातील. या पृथ्वीच्या साडेचारशे कोटी वर्षांच्या इतिहासाचा आवाका, या विश्वाच्या अजूनही निश्चित नसलेल्या गतकालाचा, अवकाश-काल अस्तित्वातच नव्हता तेव्हाच्या सिंग्युलॅरिटीच्याही आधीचा वेध घेण्याची माणसांची कुवत आहे हे त्यांना आपण नास्तिकच सांगू शकतो. संथ गतीनेही सही- पण आपण निदान आपल्या भोवतीच्या जगाला वैचारिक, बौध्दिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने पुढे नेऊ हे आपले योगदान असेल.
आभार.

बेहतरीन. खुपच छान.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeletekeep wtiting. though it is a tough task, ज्योत से ज्योत कभी तो जलेगी .
ReplyDeleteमॅम
ReplyDeleteकामानिमित्त बाहेरगावी असल्यामुळे आपले भाषन प्रत्यक्ष ऐकायला नाही मिळाले. पन ति भरपाई झाली. धन्यवाद.
खुप छान व विचार करायला लावनारी विधानं.
महाविर व बुध्द या दोघांना ज्ञान झालेलं कि देव नाही तर त्यांच्या अनुयायांनी त्यांनाच देवत्वाच्या चोकटित बंदिस्त केलं. असंच चाललय.
मॅम

प्रश्न आस्तिक योग्य की नास्तिक हा नसून गोष्टी कालानुरूप पारखून घेऊन त्यातले चांगले ते पुढे नेणे, वाईट ते विसरून जाणे असा विवेकी दृष्टीकोन बाळगणे महत्वाचे. नाहीतर लोकांच्या आस्थेवर टीका करताना अजून एक "नास्तिक" धर्म जन्माला येईल. धर्माला अफूची गोळी मानणाऱ्या "संप्रदायातून" अनेक पक्ष आधीच कार्यरत आहेत. त्यात अजून एक भर.
ReplyDeleteजाती, धर्म, देव, दानव, भाषा, देश इ. मानवनिर्मित गोष्टी उत्क्रांती आणि नागरिकीकरण या प्रक्रियेतून घडत गेल्या. मानवी समूहाला एकत्रित बांधून ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग पण झाला. त्यातून काही अपप्रवृत्ती झाल्या असतील व मानवी समूहाला एकत्र ठेवण्यासाठी धागा म्हणून कालबाह्य ठरल्या असतील तर त्यांना विसरणेच चांगले, मात्र असे करताना उगीच आधीच्या पिढीला झोडपत बसण्यात काही अर्थ नाही. तेव्हा योग्य होते तसे ते वागले, आत्ता योग्य आहे तसे आपण वागू.