Friday, March 30, 2012

यात नवीन काहीच नाही.



सोन्याचा गणपती दिवेआगरातून चोरीस गेला आणि पाठोपाठ जळगावजवळील नेरी येथून पंचधातूच्या आठ प्राचीन मूर्ती जैन मंदिरातून चोरीला गेल्या.
अशा  तऱ्हेने प्राचीन मूर्तींची चोरी होणे हे काही नवीन नाही. या संदर्भात एका पुरातत्व तज्ज्ञाने तळतळून एक माहिती कळवली आहे.
1996-97 साली नांदेडजवळील कंधारच्या किल्ल्याजवळील एका मुस्लिम शेतकऱ्याच्या शेतात शेतात खणताना एक मूर्ती सापडली. ती मूर्ती केशवराज- विष्णूची अतिशय सुंदर अशी एक मीटर उंचीची मूर्ती होती. ही मूर्ती काही गावकऱ्यांनी ताब्यात घेऊन तेथील मोठ्या वाड्याच्या तळघरात नेऊन ठेवली. तेथील तत्कालीन पुरातत्व विभागाचे अधिकारी ही मूर्ती सापडल्याचे कळताच ती निखाते निधी म्हणून तिचा ताबा घेण्यासाठी गेले. त्या लोकांनी ती त्यांना पाहू देण्यासही सुरुवातीस नकार दिला. त्या अधिकाऱ्याने चिकाटीने तहसीलदार, जिल्हाधिकारी, पुरातत्व विभागाचे मुंबई ऑफिस वगैरेंशी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. अखेर त्या घरातील एका मुलाशीच ओळख करून घेत हे अधिकारी तळघराच्या हातापर्यंत- म्हणजे किल्लीला स्थानिक शब्द- पोहोचले. त्या मूर्तीची वैशिष्ट्ये नोंद करून घेत या अधिकाऱ्यांनी या मूर्तीचा ताबा पुरातत्व विभागाकडे यावा म्हणून लेखी माहिती कळवली. विधानसभेत प्रश्न विचारला गेला. प्रजावाणीमधे बातमी आली. लोकसत्तेत आली. अखेर तेथील डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार वगैरे मंडळी कामास लागली आणि ती मूर्ती व्यक्तिगत ताब्यातून काढून कंधार या राष्ट्रकूट राजा कंधारपुराधिश्वर कृष्ण (तिसरा) याने बांधलेल्या किल्ल्यात सुरक्षित ठेवून देण्यात आली. पण या सुरक्षेला कवच होते ते केवळ एका पुरातत्वनिष्ठेच्या मनुष्याचेच. त्यापुढील वर्षी त्या अधिकाऱ्याची बदली झाली आणि काही महिन्यांतच त्या सुंदर मूर्तीची चोरी झाली. आजतागायत केशवराजाची ती अखंड मूर्ती कुठे गेली ते कळलेले नाही. कंधार येथे अभ्यास करण्यासाठी गेलेल्या तरुण पुरातत्वतज्ज्ञ, मूर्तीशास्त्राच्या अभ्यासक डॉ. वैशाली वेलणकर यांनी या केशवराज मूर्तीचे जे छायाचित्र घेतले ते या मूर्तीचे चोरी होण्यापूर्वीचे अखेरचे छायाचित्र. त्या मुंबईत परतल्यानंतर चोरी झाली. परंतु चोर सापडत नव्हते म्हणून की काय तपासयंत्रणेने डॉ. वैशाली वेलणकर आणि त्यांच्यासोबत असलेले दुसरे पुरातत्व संशोधक डॉ. सूरज पंडित यांनाच धारेवर धरले.
एवढी जड मूर्ती किल्ल्याच्या उतारचढावावरून नेण्यासाठी चारजण तर कमीतकमी हवेत. रस्त्याच्या  खाचाखोचा  माहीत असलेले हवेत हे स्पष्ट असताना चोरीची माहिती देणारे कुणी सापडले नाहीत खरे.
त्यावेळी तेथील आमदार केशवराव धोंडगे परिसरात सापडलेल्या मूर्ती आपल्या वाड्यात आणून वाड्याची शोभा वाढवत असत. अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर त्या सर्व मूर्ती शासकीय (जलसिंचन) विभागाच्या विश्रामगृहात मांडून त्याचे राष्ट्रकूट भवन असे नामकरण करण्यात आले होते.
जळगाव, चाळीसगाव भागात एक अत्यंत मौल्यवान असा निखाते निधी- ट्रेझर ट्रोव्ह सापडला. एका स्थानिक मारवाड्याच्या मालकीच्या जागेत. रोमन काळातील अनेक सोन्याची नाणी एका हंडीत सापडली. त्याची किंमत केल्यानंतर त्यातील मालकाचा वाटा पुरातत्व विभागामार्फत शासनाने मालकाला द्यावा आणि ऐवज ताब्यात घ्यावा असे स्पष्ट आदेश न्यायालयाने शासनाला दिले. ती किंमत देण्यासाठी शासनाला सहा महिन्याची मुदत देण्यात आली. नियमाधिनियमांच्या गुंतवळात निर्णय अडकल्यामुळे शासकीय तिजोरीचे हात हाती असलेल्या विभागाने ती रक्कम पुरातत्व विभागाला दिली नाही. आणि ती ऐतिहासिक महत्त्वाची नाणी त्या खाजगी व्यक्तीकडेच राहिली. आज ती वितळवून पाटल्याबिंदल्या झाल्या की वळेसर-गळेसर झाले कुणालाही कल्पना नाही. रोमन राज्यातील नागरिकांना नीलवस्त्रांच्या मोहात पाडून रोमराज्याचा खजिना रिकाम्या करणाऱ्या भारतीयांनी मिळवलेल्या सुवर्णमुद्रांचे ऐतिहासिक महत्त्व आता कुणाच्या लेकींच्या हुंड्यात विरून गेले असेल कोण जाणे.
इतिहासाची साधनं म्हणून महत्त्वाचे ठरणारे किती एक शिलालेख पायऱ्यांचे दगड झाले, धुण्याचे दगड झाले काही गणतीच नाही.
बीडजवळचा धर्मपुरीतील- म्हणजे चालुक्यांची दुसरी राजधानी येथला शिलालेख तिथल्या एकाच्या घरात ज्वारीच्या कणगीखाली ठेवायचा दगड म्हणून वापरण्यात आलाय. तो तो अजिबात द्यायला मागत नाही. फलटणचा शिलालेख धुणं धुण्यासाठी दगड म्हणून वापरला गेला. त्याच्या फक्त कडेकडेच्या दोनदोन शब्दांच्या ओळी शिल्लक आहेत. मधला मजकूर झिजून गेला आहे. आणखी एक शिलालेख रट्टबल्लाळाचा- दीड मीटर बाय एक मीटर रुंदीचा हा शिलालेख गावकऱ्यांनी पुरातत्व विभागाच्या ताब्यात द्यायला नकार दिला. तो आता तेथील मंदिराच्या आवारात इतर काही प्रतिमांसोबत पडून आहे. ज्यांना त्याचे कार्यकारणच कळत नाही असे भक्तगण सगळ्याबरोबर त्यावरही हळदकुंकू वहातात.




2 comments:

  1. मार्कंडा येथील पुरातन मूर्ती त्या भागातील लोकांचे न्हाणीघरात आंघोळीचे व कपडे धुण्याचे दगड म्हणून वापरात असल्याचे वाचले होते .

    ReplyDelete
  2. मार्कंडा येथील पुरातन मूर्ती त्या भागातील लोकांचे न्हाणीघरात आंघोळीचे व कपडे धुण्याचे दगड म्हणून वापरात असल्याचे वाचले होते .

    ReplyDelete