Wednesday, September 1, 2010

आज मन अधिकच विषण्ण झाले आहे.
दहीहंडीचा तमाशा बाहेर चालू आहे. गणपतीच्या सोंगाची तयारी सर्वत्र भांडवलाचा विध्वंस करतेच आहे. पण ते तर नेहमीचेच आहे.
आजच्या विशेष विषण्णतेचे कारण- आपल्या पंतप्रधानांनी तिरुपतीच्या मंदिरात जाऊन मनोभावे पूजाअर्चा केल्याची बातमी. आणि लोकसत्तेत नरेंद्र दाभोलकरांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना लिहिलेले अनावृत्त पत्र.
लोक आपले आपापल्या भूमिका बजावत रहातात. अशोक चव्हाण स्वतः किती अंधश्रध्द आहेत हे काय दाभोलकरांना माहीत नसेल... तरीही त्यांना अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याबाबत पत्र लिहिण्याचे काय कारण. या निमित्ताने लोकांपर्यंत विषय पोहोचावा हा मर्यादित हेतू असेल कदाचित... आणि नुसता लेख छापण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना पत्र या स्वरुपात लिहिला तर त्याचे छपाईमूल्य वाढते हे ही कारण असू शकेल.
पण या देशात कायद्याने बदल करून अंधश्रध्दाविषयक परिस्थिती बदलेल ही अपेक्षा करणे हे विवेकनिष्ठाच्या हतबलतेचेच द्योतक आहे.
गंमत आहे. आपले अशोक चव्हाण, आपले विलासराव, आपले जयंत पाटील सारे सत्यसाईबाबांची वारी करत असतात. दाभोलकरांच्या अंनिसने या सत्यसाईबाबांच्या हातचलाखीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्या कित्येक सत्रांमध्ये दाखवले आहे. या असल्या भक्तांकडून कसल्या विवेकनिष्ठ बदलांची अपेक्षा दाभोलकर करतात.
आज अनेकांनी विविध मराठी वृत्तपत्रांतून दहिहंडीच्या निमित्ताने जी हुल्लड चालते त्यावर, त्यानिमित्ताने धर्म, उत्सव साऱ्याबद्दलच लिहिले आहे. पण प्रत्येक मराठी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर गोविंदाचे उदात्तीकरण झळकते आहे. हेडलाईन.
असल्या वृत्तपत्रांकडून कसल्या विवेकनिष्ठ बदलांची अपेक्षा आम्ही करावी.

1 comment:

  1. While we are talking abt lack of such simple logic in our society there's another world out there which is wondering abt some really interesting stuff:
    http://www.economist.com/blogs/babbage/2010/09/science_and_religion

    ReplyDelete