Wednesday, August 11, 2010

श्रध्देला वळण? नाही. श्रध्देला छेद.

गेल्या ब्लॉगपोस्टवर मंगेश करंदीकरांनी लिहिलेल्या कॉमेन्टला अनुसरून थोडेसे लिहिणार आहे.
अपेक्षा आहे की एकदा या ब्लॉगचा उद्देश खडखडीत स्पष्ट व्हावा. 
श्रध्देला वळण लावण्याचा प्रयत्न आपल्याकडे अनेक लोकांनी मनःपूर्वक केला आहे.आपले सारे संस्कार आणि औपचारिक शिक्षण करणारे लोक, संस्था हेच तर करीत असतात. ते करण्यासाठी वेगळे काही प्रयत्न नव्याने करण्याची गरज नाही. काही मूलगामी बदल करता येणे संभवतच नसेल तेव्हा तोच तर एक मार्ग असतो.
मला महत्त्वाचा वाटतो तो उद्देश,या प्रकारच्या मूल्य शिक्षणापेक्षा अगदी वेगळा आहे.
श्रध्दा या शब्दाचा संकल्पनात्मक विचार करायला हवा.तरुण मुलांना करायला लावायचा तर आपण तो आधी करायला हवा.
वास्तव, सत्य, ठोस पुरावा लक्षात न घेता केवळ जे आपल्या मनात आहे- मग ती प्रतिमा असो, कथा असो,व्यक्ती असो वा कथित इतिहास असो किंवा तथाकथित शास्त्र असो त्यावर शास्त्रकसोटी न लावता विश्वास ठेवणे म्हणजे श्रध्दा. म्हणजेच तो आंधळेपणा झाला. आपण एक लटकाच भेद तयार केला आहे. सत्याधार नसलेले काही विश्वास म्हणजे श्रध्दा. आणि काही म्हणजे अंधश्रध्दा.  शहरी लोक किंवा जरा भद्रलोक देवळाबिवळांत जातात,नवस वगैरे बोलतात, गणपती-महालक्ष्म्यांचे उत्सव करतात, त्यांना सोन्याचे कानबिन, मुकुट-हार वाहतात त्या श्रध्दा,  गाडी सुरू होताना गणपती बाप्पा मोरया नाही तर गजानन महाराज की जय वगैरे म्हणतात ती श्रध्दा आणि कोणी कुचंबलेल्या बाया घुमू लागतात, किंवा कोणी आपली डोकी देवापुढे फोडून घेतात किंवा कोणी आपल्या पाठीतल्या स्नायूंत बगाड रुतवून घेतात- काय नि काय- त्या अंधश्रध्दा.या दोन्हींमध्ये फरक आहे तो फक्त अंशात्मक. गुणात्मक फरक काहीच नाही.
सत्य न जाणून घेता कशावरही विश्वास म्हणजेच श्रध्दा- भले स्वतःच्या मानसिक आधारासाठी बाळगलेली असली तरीही त्याला आंधळेपणाच म्हणावे लागते हे प्रथम मान्य करू.
आपापल्या सांस्कृतिक अवकाशात असलेल्या सर्व गोष्टी जाणून घेणे,त्यांची सत्यता पडताळण्याचा सतत प्रयत्न करणे हा एक ज्ञानार्जनाचा भाग आहे.करंदीकरांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना जे सांगितले तो त्याचाच भाग होतो. व्यासोच्छिष्टम् जगत् सर्वम् असे मान्य करणे ही मात्र श्रध्दा झाली. तिला वळण कसे लागणार? 
ज्ञान मिळवत रहाण्याच्या प्रक्रियेचा अर्थ किंवा हेतूच श्रध्दा संपवणे हा असतो. प्रश्नचिन्हांच्या रानांतून न घाबरता वाट काढत जाणे म्हणजे वैचारिक प्रवास. अशा प्रवासात प्रत्येकाच्या मर्यादा निरनिराळ्या असतील. थकून कशालातरी शरण जाणे स्वाभाविक असेल कदाचित... मळलेली वाटही असेल. पण थकण्याचं उदात्तीकरण करायची गरज नाही.आणि साऱ्याच बुध्दीमत्तांना त्याच पट्टीत ठोकून बसवण्याची सक्ती करायचीही गरज नाही. नास्तिकतेला योग्य तो सन्मान मिळायला हवा.
पारंपारिकतेला हसणाऱ्या पण आपल्याला मानसिक धक्का बसला की मनःशांतीदाता वाटणाऱ्या बाबाच्या नादी लागणाऱ्या लोकांची याच संदर्भातील बौध्दिक तयारी कधी झालेली नसते. पारंपारिकतेची वरवरची लक्षणे टाकून देणारे लोक म्हणजे काही तर्कनिष्ठ विचारपध्दतीचे पाईक असतात असं नाही. मग साडीला किंवा भारतीय पोषाखाला नाक मुरडून हसणाऱ्या, खाली घसरणाऱ्या जीन्स घालणाऱ्या मुलंमुली विवेकी आहेत असं झालं असतं.
म्हणून केवळ वरपांगी आधुनिक वाटणारे लोक विमानप्रवासाचा खर्च सोसून तिरुपतीला नाहीतर सत्यसाईच्या मंत्रालयमकडे रवाना होत असतात. त्यांचं समर्थनही थोडं याच जातीतील असतं... पण त्यांच्याकडून कित्ती चांगली चांगली कामं होतात ते पहा. श्रध्देला वळण आहे बरं.
नाही. आपण आता हे काम नव्याने करण्याची गरज नाही.
मुळातून विचार करायला हवा. प्रत्येक न उलगडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आज नाही उद्या मिळेल, प्रत्येक समस्येचा सामना करायला बुध्दीचंच बळ पुरतं,  माणसाचं या जगातलं अस्तित्व टिकण्याचं,बहरण्याचं कारण दैवी शक्ती नसून त्याची मर्यादा वाढत वाढत गेलेली पदार्थवादी बुध्दी आहे हा विचार जनसाधारणांच्या मनात भिनायला हवा.
नैतिकता पाळली जाण्यासाठी देवाची किंवा धर्माची खरोखर गरज नसते. ती मनातून, बुध्दीतून स्फुरते.
अनैतिकता,क्रौर्य या गोष्टीही याच बुध्दीतून स्फुरतात-त्याला भूतखेत,सैतानांची गरज नसते हे कळायला हवं.
 पारंपारिकतेची दिवसेंदिवस वाढत चाललेली नाटकं-तमाशे, दाखवेगिरीचा सोस हा एक एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीचा चांगला सोर्स झाला आहे.पण ज्या मुलांची बुध्दी प्रखर सत्यशोधाच्या लालसेने पेटून उठू शकेल ती या नसत्या भानगडींमुळे झाकोळली जातात,नको त्या दडपणाखाली आकसून जातात. दिग्मूढ होतात, ही त्यातली खरी दुष्टता आहे.
एक वाक्य फार प्रेमाने अनेक शिक्षक, पालक आपल्या मुलांना सांगत असतात. त्यात एक भाबडेपणा असतो. पण ते एक फार धोकादायक वाक्य आहे.- 'कुठेतरी श्रध्दा असायला हवी बाळा'- हे ते वाक्य. म्हणजेच कधी ना कधी तरी तू सत्याकडे न पहाता आंधळा विश्वास ठेव असा त्याचा अनुवाद होतो.
माझा विरोध यालाच आहे.


4 comments:

  1. thank you!!!


    Humans always try to increase their knowledge ,rather decrease their ignorance.
    when you are in ignorance --you may answer--"I DONT KNOW!!!!"as simple as that.
    why to interfere god in it?
    You will get the answer in future...for sure...

    once again thank you.

    ReplyDelete
  2. Utkarsh, It may be interesting to know what u mean by God..everyone has a different understanding of what GOD is..like the blind men sensing the elephant! I'm not saying that is all wrong as its a part of our upbringing, our environment..we all may be speaking part of truth based on our share of experiences! For example, if you call the life in the life forms (something we are unable to understand much about!) as GOD, well it is omnipresent and will interfere with whatever we do, till we are alive!

    ReplyDelete
  3. Arun, There are some variations of theism, One is deism another is pantheism and yet another variant is agnoustics- they may be leaning to either side-theism or atheism- but thats a temporary stage- they would in future be either theists or atheists.
    Your views seem to be like a pantheist- whayever marvels and unsolved mysteries of nature are something like God to you. The Hindu philosophy preaches mostly pantheiem.
    It is a bearable varient- but nonetheless Utkarsh is right in suggesting- there is no need of god.

    ReplyDelete
  4. Yes, my ideas seem to fall in the Pantheist category (I didn't know that, thanks for the info!)..nevertheless, I am dead against the commonly accepted `version' of God that makes a mockery of everything.. and its not restricted to just one religion/faith!

    ReplyDelete