रा.स्व.संघ: किती खोल, किती पसारा
लेखक- देवनुरू महादेव
‘ ಆ" ಎ$ ಎ$: ಆಳ ಮತು) ಅಗಲ’
या देवनुरू महादेव
यांच्या पुस्तिकेचा मराठी अनुवाद
अनुवादक- मुग्धा
धनंजय
मूळ
प्रकाशन-
आरएसएस: अळ मट्टू अगला
ले.
देवनुरू महादेव
अभिरुची
प्रकाशन
मोबाईल- 99805 60013
abhiruchiprakashanamysore@gmail.com
अर्पण पत्रिका
या जगात स्वतंत्र नागरिक म्हणून जन्मलेल्या मुलांना स्वतंत्र
नागरिक म्हणूनच जगता यावे या इच्छेने लिहिलेले पुस्तक.
ही पुस्तिका तुम्हीही प्रकाशित करू शकता. कुणीही
व्यक्ती, संस्था, प्रकाशक ही पुस्तका प्रकाशित करू शकते. इच्छा असल्यास आमच्याशी
संपर्क साधून डीडी, चेक किंवा पेटीएम वरून तुम्ही आम्हाला पैसे पाठवू शकता आणि
पहिल्या आठ पानांसाठी नवीन टेम्प्लेट बनवून स्वतःचे नाव घालू शकता. संपूर्ण
प्रकाशन खर्च पाठवल्यास तुम्हाला हव्या तितक्या प्रती आम्ही देऊ शकतो.
तुम्ही आम्हाला शंभर रुपये पाठवून संपूर्ण
पुस्तक तुम्हीच छापू शकता. पुढील क्रमांकांवरील कुणाशीही संपर्क साधावा. पहिली ८
पाने सोडून बाकीची सर्व पाने तुम्हाला आम्ही पाठवू. लेखकाला मानधन देण्याची गरज
नाही. फक्त छापल्यानंतर दहा प्रती जरूर पाठवाव्यात.
देवनुरू
महादेव यांनी या पुस्तिकेत आपल्याकडील हिंदुत्वाची संकल्पना कशी बदलत गेली या
मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा आरेसेसची पाळेमुळे
कशी खोल गेली आहेत आणि त्यांचा पसारा कसा वाढला आहे ते फार काळजीपूर्वक मांडले
आहे.
आरेसेसचे
खरे चित्र समोर आणतानाच ही पुस्तिका आपल्याला या देशाची एकता, संविधान आणि लोकशाही
यांचे बळ वाढवण्यासाठी उद्युक्त करू पाहाते. देवनुरू महादेव यांनी या पुस्तिकेच्या
प्रकाशनास अनुमती दिली याबद्दल त्यांचे आम्ही ऋणी आहोत.
-अभिरुची गणेश
अनुक्रम-
प्रस्तावना
१-रास्वसंघाचा प्राण कुठे आहे?
२- दस्तावेज काय स्पष्ट करतात?
३- आजघडीला...
४- या पार्श्वभूमीवर
धर्मांतरबंदीचा कायदा
५- आता...
प्रस्तावना
रास्वसंघाचे
खरे स्वरुप आणि त्यांचे हेतू काय आहेत हे काळजीपूर्वक तपासून लोकांपुढे मांडण्याचा
हा प्रयत्न आहे. संपूर्ण देशाला विघटित करण्याच्या दृष्टीने रास्वसंघ कसा
सातत्याने प्रयत्नशील आहे हे लोकांना समजावे म्हणून हे एक छोटेसे पाऊल म्हणजे ही
पुस्तिका आहे. रास्वसंघ म्हणजे काय याबद्दल उभे केलेले रम्य चित्र आणि सत्य यात
फार मोठी तफावत आहे- ती समजावून देणे हा यामागचा हेतू आहे.
आपल्या
लोककथांमध्ये एक कथा फार प्रसिद्ध आहे. एक क्रूर चेटक्या जगभर हाहाकार माजवतो, दुर्वर्तन
करतो- त्याला कुणाचीही भीती वाटत नसते कारण त्याने आपले प्राण साता समुद्रापार
असलेल्या एक गुंफेत ठेवलेल्या पोपटामध्ये लपवून ठेवलेले असतात. हा सुरुवातीला फक्त
चेटक्या असतो, आणि मग तो बहुरुपीही होतो. तो अनेक रूपे धारण करू शकतो. त्याची
वेषांतर क्षमता अमर्याद असते. आणि त्याला कुणीही काहीही करू शकत नाही, कारण त्याचा
जीव, त्याचा प्राण अज्ञात अशा दूरस्थ गुंफेत सुरक्षित असतो. या भयंकरातून सुटका
करून घ्यायची तर प्रथम त्याचा प्राण कुठे लपवलेला आहे हे शोधून काढावे लागेल.
आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल. अशाच प्रकारे रास्वसंघाचा प्राण कुठे लपलेला
आहे याचा शोध घेताना या संघटनेची पाळेमुळे कुठल्या प्राचीन चिखलात रुतलेली आहेत
त्या चिखलाचाच मी माग काढला. मला जे दिसले ते हिडीस आहे. त्याचा एक बारीकसा अंश या
पुस्तिकेत मी देतो आहे. यातून जर कुणी अधिक खोलवर शोध घेऊ लागले तर मी या माझ्या प्रयत्नाला
यश आले असेच समजेन.
आता
काही ऋणनिर्देश. माझे मित्र शिवसुंदर, प्रसन्न एन. गौडा, बी. श्रीपाद भट आणि प्रा.
कुमारस्वामी यांच्या साहाय्यामुळे, सूचनांमुळे या पुस्तिकेतील माहिती
सुव्यवस्थितपणे मांडता आली. काही संदर्भांचा कन्नडमधे अनुवाद करून दिल्याबद्दल
सुरेश भट बक्रबायलू यांचाही मी ऋणी आहे.
देवू
१- रास्वसंघाचा
प्राण कशात आहे
संघाचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक होते डॉ. हेडगेवार. त्यांच्यानंतर गोळवलकर हे अनेक वर्षांपर्यंत रास्वसंघाचे दुसरे सरसंघचालक होते. गोळवलकर हे सावरकरांना आणि हेडगेवारांना आपले गुरू, मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ मानत- गोळवलकर आणि सावरकर या दोघांच्या लेखनातील काही महत्त्वाचे अंश पुढे दिले आहेत.
गोळवलकरांचा
देवः
“आपणा सर्वांना
अशा एका चैतन्यशील देवाची गरज असते, जो आपल्यातील चैतन्य जागे करू शकेल. ‘आपला समाज हाच आपला देव आहे... हिंदूंचा वंश हाच एक मूर्तीमंत विराट पुरुष
आहे’- वेदांमधून सांगितलेला आदिपुरुष- सर्वशक्तीमान
ईश्वराचेच रूप आहे.” हे आपल्या पूर्वजांनी म्हणूनच सांगून
ठेवले आहे. जरी त्यांनी हिंदू हा शब्द वापरला नाही तरीही पुरुषसूक्तात येणारे हे
वर्णन तेच स्पष्ट करते. –‘तारे आणि आकाश त्या परमात्म्याच्या
बेंबीतून उत्पन्न झाले’ हे सांगितल्यानंतर, ‘सूर्य आणि चंद्र हे त्या परमात्म्याचे नेत्र आहेत’
असे त्यात म्हटले आहे. त्यानंतर त्यात असे म्हटले आहे की ‘ब्राह्मण
हे त्याच्या मस्तकापासून झाले आहेत, त्याचे बाहू म्हणजे क्षत्रिय राजे, त्याच्या
मांड्या म्हणजे वैश्य आणि त्याची पाऊले म्हणजे शूद्र आहेत.’
जे लोक या चातुर्वर्ण्य पद्धतीस मानतात तेच हिंदू वंशाचे लोक आहेत आणि हाच आपला
देव आहे, हाच त्याचा अर्थ.”
(संदर्भ-गोळवलकरांच्या
‘बंच ऑफ थॉट्स’या पुस्तकामधून)
गोळवलकरांचे
‘संविधान’
लोकांच्या मनातील हिंदू
असण्याचा ओतप्रोत अभिमानाची आपल्याला कल्पना आहे असे सांगत ते पुढे म्हणतात, “फिलिपाईन्सच्या दरबारात मनूचा संगमरवरी पुतळा आहे. ‘मानवजातीमधील
सर्वात शहाणा असा हा पहिला माणूस ज्याने कायदे-नियमांची आखणी प्रथम जगाला दिली’ असे त्या पुतळ्याखालील चौथऱ्यावर लिहिले आहे.”
(संदर्भ-
गोळवलकरांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकामधून)
वि.दा.
सावरकरांचा दृष्टीकोन
“आपल्या हिंदू
राष्ट्रात, वेदांनंतर मनुस्मृती हा सर्वात पवित्र असा धार्मिक ग्रंथ आहे. प्राचीन
काळापासून, आपल्या सांस्कृतिक परंपरा, विचार आणि कृती यांमागील नैतिक तत्त्वांचे
दिग्दर्शन करणारा हा ग्रंथ आहे. गेली अनेक शतके आपल्या देशाचा आध्यात्मिक आणि दैवी
प्रवास ज्या नियमांनुसार, ज्या आदर्शांनुसार चालत आला आहे त्याचे सारसूत्र यात
आहे. मनुस्मृती हा लक्षावधी हिंदू अनुयायांच्या दिनक्रमणेचा मूलभूत आधार आहे. आज
मनुस्मृती हाच हिंदूंसाठी कायदा आहे.”
(संदर्भ- वि.दा. सावरकर,
मनुस्मृतीतील स्त्रिया, समग्र सावरकर, खंड ४, प्रभात पब्लिशर्स)
आंबेडकरांच्या
नेतृत्वाखालील भारतीय संविधानाविषयी गोळवलकरांचे मत
“पाश्चात्य
देशांच्या संविधानांमधून उचलाउचल करून, क्लिष्ट आणि विसंगत असे तुकडे जोडून तयार
केलेले आपले संविधान आहे आपले. एवढेच. युनायटेड नेशन्सच्या जाहीरनाम्यातून किंवा
आधीच्या लीग ऑफ नेशन्सच्या जाहीरनाम्यातून, अमेरिकन किंवा ब्रिटिश संविधानांतून कसल्याशा
लुळ्यापांगळ्या तत्त्वांच्या आधारे शिवलेली गोधडीच आहे ती जणू.”
(संदर्भ- गोळवलकरांच्या ‘बंच
ऑफ थॉट्स’ या पुस्तकामधून.)
‘ऑर्गनायझर’ या रास्वसंघाच्या मुखपत्रात ३० नोव्हेंबर, १९४९ रोजी प्रसिद्ध झालेल्या
संपादकीयातून:
२६ नोव्हेंबर, १९४९ रोजी
स्वतंत्र, सार्वभौम भारताने संविधानाचा मसुदा प्रकाशित करून लोकार्पण केला त्या
दिवशी संविधानावरील ही टीका प्रसिद्ध करण्यात आली- “आपल्या
संविधानात प्राचीन भारतीय घटनात्मक कायद्यांचे, संस्थांचे, संकल्पनांचे,
व्याख्यांचे नामोल्लेखही नाहीत. मनुस्मृतीचे
लेखन लायकर्गस ऑफ स्पार्टा किंवा सोलोन ऑफ पर्शिया यांच्याही आधी झाले
होते. आजही मनुची कायदेसंहिता जागतिक कौतुकास पात्र आहे, हिंदू लोकांकडून त्या कायद्यांना
उत्स्फूर्त असे अनुयायित्व लाभते. पण आपल्या संविधानकर्त्या पंडितांच्या लेखी याची
किंमत शून्य आहे.”
संघराज्यासंबंधी
विषबीज: “आपल्या संविधानात राज्यांचा संघ असण्यासंबंधी जे नियम आहेत त्यावरून हे
स्पष्ट होते की आपले राष्ट्र हे एकजिनसी, सुसंवादी राष्ट्र होऊ शकते याची खात्री
संविधानकर्त्यांच्या मनात नाही. त्यांनी राष्ट्राला अनेक राज्यांचा संघ ठरवले आहे
यावरून यात विघटनाची बीजे आहेत हे स्पष्ट होते.”
(संदर्भ-
गोळवलकरांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकातून)
“... याच
कारणासाठी आपण संविधानाच्या या संघराज्यात्मक आराखड्यावरची चर्चा कायमची खोलवर
गाडून टाकली पाहिजे. या एकसंध भारतात स्वायत्त किंवा अर्धस्वायत्त राज्ये असण्याची
शक्यताच मिटवून टाकली पाहिजे. एकछत्री शासनाची प्रस्थापना करण्यासाठी आपण
संविधानाच्या मसुद्याचा पुनर्विचार करून पुनर्लेखन करणे गरजेचे आहे...”
(संदर्भ-
गोळवलकरांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’या पुस्तकामधून)
रास्वसंघाचा
प्रेरणास्रोत
“रास्वसंघ हा
एका ध्वजाखाली, एका नेतृत्वाखाली आणि एका विचारसरणीने प्रेरित असून या थोर
भूमीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हिंदुत्वाची ज्योत पेटवणार आहे.”
(१९३० साली मद्रास येथे
भरलेल्या १३५० संघनेत्यांच्या सभेतील गोळवलकरांचे जाहीर निवेदन हे त्यांच्या
फॅशिस्ट आणि नाझी विचारसरणीचे ठळक उदाहरण आहे.)
हिटलरच्या
नाझी आणि फॅशिस्ट विचारसरणीसंबंधी
“जर्मनवंशाभिमान
हा आजच्या चर्चेचा विषय आहे. आपल्या वंशाचे आणि संस्कृतीचे शुद्धत्व राखण्याच्या
हेतूने जर्मनीने जगाला धक्का बसेल असे निर्णय घेतले- ज्यू वंशीय लोकांचे देशातून
उच्चाटन करण्याची सुरुवात केली. उच्च कोटीचा वंशाभिमान इथे दिसून आला. जर्मनीने
हेही दाखवून दिले आहे की मुळातूनच जे वंश आणि संस्कृती विभिन्न आहेत त्यांचे
एकीकरण कधीही होऊ शकत नाही- हा धडा हिंदुस्थानात आपण सर्वांनी शिकला पाहिजे आणि
त्याचा लाभ घेतला पाहिजे.”
(संदर्भः गोळवलकरांचे ‘वी, ऑर अवर नेशनहूड डिफाईन्ड’, १९३९)
“ही सर्व
प्राचीन इतिहास असलेली राष्ट्रे अल्पसंख्य समूहांची समस्या कशी सोडवतात हे पाहाणे
आणि ध्यानात ठेवणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने देशात
आलेल्या स्थलांतरित लोकांनी त्या त्या देशातील बहुसंख्य लोकांशी, -राष्ट्रीय
वंशाशी- सहजपणे जुळवून घेतले पाहिजे- त्यांची संस्कृती, भाषा, बहुसंख्यकांच्या
आशाआकांक्षा आत्मसात करताना त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व, आपले विदेशी मूळ
विसरून गेले पाहिजे. त्यांनी तसे केले नाही, आणि ते परके म्हणूनच जगत राहिले,
त्यांच्या नव्या राष्ट्राला त्याचा त्रास होत असला तरीही आपल्याच मूळ देशाच्या
रूढी परंपरा पाळत राहिले तर त्यांना कोणतीही विशेष सुरक्षा मिळता कामा नये, अधिकार
किंवा हक्कांचा तर विषयच संभवत नाही. परक्यांसाठी
केवळ दोनच मार्ग मोकळे आहेत- त्यांनी मूळ राष्ट्रीय वंशात सामील व्हावे,
नवी संस्कृती स्वीकारावी किंवा मग राष्ट्रातील वंश जोवर मान्यता देईल तोवर
त्यांच्या दयेवर जगावे किंवा मग राष्ट्रीय वंशाच्या इच्छेनुसार ते म्हणतील तेव्हा
देश सोडावा. अल्पसंख्यकांचा प्रश्न सोडवायला हा एकच दृष्टीकोन परिपूर्ण ठरेल. हेच
एक उत्तर तर्कशुद्ध आणि योग्य आहे. केवळ असे झाले तरच राष्ट्रजीवन निरोगी आणि
निर्विघ्न राहील. केवळ असे केले तरच आपले राष्ट्र अंतर्गत उपराष्ट्रे तयार
होण्याच्या राजकीय कर्करोगासारख्या धोक्यापासून सुरक्षित राहील.”
(संदर्भः गोळवलकरांचे ‘वी ऑर अवर नेशनहूड डिफाईन्ड’, १९३९)
जर्मनी आणि इटली या
राष्ट्रांनी नाझीवाद किंवा फॅशिझमच्या जादूच्या कांडीने स्वतःला सावरले आणि ती
राष्ट्रे पूर्वीपेक्षा अधिक शक्तीमान झाली यावरूनच हे स्पष्ट होते की या
विचारप्रणालींचे शक्तीवर्धक टॉनिकच राष्ट्र निरोगी ठेवण्यात सर्वात प्रभावी आहे.”
(संदर्भा-
वि.दा. सावरकरांच्या १९४०च्या मदुराई येथील हिंदू महासभेच्या अधिवेशनातील
अध्यक्षीय भाषणातून.)
स्वातंत्र्य
“आपल्या
स्वातंत्र्यामागची सुप्त प्रेरणा ही एकच असते, ती म्हणजे आपल्या राष्ट्रीय
मूल्यांचे जतन आणि प्रसार- ही मूल्ये म्हणजेच आपला धर्म आणि आपली संस्कृती. हा
आपला ऐतिहासिक पारंपरिक दृष्टीकोन असतो.”
(संदर्भ-
गोळवलकरांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकामधून)
२-दस्तावेज काय सांगतात
‘रास्वसंघाचा
प्राण कुठे आहे’ या प्रकरणात आपण गोळवलकर आणि सावरकरांनी
प्रगट केलेले काही विचार आणि त्यांचे दृष्टीकोन स्पष्ट करणारे काही उतारे पाहिले.
अजूनपर्यंत तरी हे सारे दस्तावेजांतूनच सापडलेले मांडले आहे. ‘परके’ म्हटले जाणारे कुणी तर सोडाच, कुणीही सुबुद्ध
ब्राह्मणही रास्वसंघाचा हा सैतानी भूतकाळ मान्य करणार नाही.
गोळवलकरांनी आपल्या पुस्तकाला ‘‘बंच ऑफ थॉट्स’’ असे नाव दिले होते. याचं मराठी नाव
होतं विचारधन. असो, पण यातील ‘विचार’
या शब्दाला साजेल असे काहीही या पुस्तकात नाही. जे काही अविचार आहेत त्यात आधी
नमूद केलेल्या तीन गोष्टी आणि अतिशय घातक अशा श्रद्धा यांचीच बजबज आहे. भूतकाळात
जमा झालेल्या घातक श्रद्धा पुन्हा जागवण्याचा प्रयत्न आहे. गेली जवळपास १०० वर्षे
रास्वसंघ आणि त्याचे साथीदार भूतकाळातील घातक श्रद्धांच्या आधारे आज दिसणारे
भारताचे चित्र प्रत्यक्षात आणण्यासाठी झटले आहेत.
रास्वसंघाची पहिली श्रद्धा ही-
पुरुषसूक्तामधील देव कल्पनेमधून उभी रहाणारी सामाजिक व्यवस्था हाच त्यांचा देव
आहे. या समाजव्यवस्थेत ब्राह्मण हे मस्तकाच्या जागी आहेत, क्षत्रिय राजे हा
बाहूंच्या जागी आहेत, वैश्य हे मांड्यांच्या जागी आहेत, आणि शूद्र हे पाय आहेत-
आणि हेच रास्वसंघाच्या दृष्टीने ईश्वराचे रूप आहे. गोळवलकरांनी हाच आपला देव हे
स्पष्ट सांगितले आहे- ते त्या समाजव्यवस्थेचे वर्णन चैतन्यशील देव म्हणून करतात.
रास्वसंघाच्या सर्व निष्ठांच्या तळाशी हाच अचल असा खडक आहे. त्यांच्या दृष्टीने
हेच देवाचे दृश्य रूप आहे!
ठीक तर, देवाच्या रुपाशी
जोडलेली ही चातुर्वर्ण्य व्यवस्था तपासून पाहायची तर आपण आपलेच शरीर तपासून पाहाणे
पुरेसे आहे. डोके म्हणजेच मन किंवा बुद्धी. या डोक्यातून उर्वरित शरीराकडे -हात,
मांड्या, पाय सर्वांकडे आज्ञा जात असतात आणि हे उर्वरित शरीर डोक्यातून आलेल्या
आज्ञा पाळत असते. हेच आपण समाजाला लागू केले तर डोक्याच्या जागेवर असलेले
ब्राह्मण सांगतील त्यानुसार हातांच्या
स्थानी मानलेले क्षत्रिय राज्य करतील, तसेच वैश्य व्यापार करतील आणि शूद्र
सर्वांची पडेल ती सेवा करतील. रास्वसंघाच्या धारणांनुसार हाच सामाजिक न्याय आहे,
हीच सामाजिक समरसता आहे. त्यांच्या देवाच्या संकल्पनेत हेच अंतर्भूत आहे- हाच
त्यांचा चैतन्यशील देव.
लहान मुलांच्या मनात
लहानपणापासून याच संकल्पना घट्ट बसाव्यात म्हणून आता भाजप या संघप्रणित राजकीय
पक्षाने भगवद्गीतेचे शिक्षण सक्तीचे करायला सुरुवात केली आहे. या भगवद्गीतेत
देवाचा अवतार श्रीकृष्ण घोषित करतो की ‘चातुर्वर्ण्यम्
मया सृष्टम्’ (चातुर्वर्ण्याचा
निर्माता मीच आहे).
पण भगवद्गीतेची रचना कधी झाली? मूळ संहितेमध्ये कृष्णाने चातुर्वर्ण्याचा उल्लेख केला होता का? की हे गीतेमध्ये नंतर घुसडलेले आहे? घुसडले असेल तर
ते नेमके केव्हा? या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत.
गीतेच्या अधिकृत संहितेबद्दल
बोलताना स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे की, “जोपर्यंत
शंकराचार्यांनी गीतेवरची विस्तृत टीका
लिहिली नव्हती आणि तिचा प्रसार झाला नव्हता, तोपर्यंत लोकांना त्या रचनेचे
तपशील ठाऊकच नव्हते. शंकराचार्यांच्या आधीपासून फार वर्षांपूर्वीपासून अनेक
विद्वानांनी असे मत मांडले आहे की गीतेवरील टीकाग्रंथ महणून बोधयान वृत्ती
नावाच्या ग्रंथाचा बोलबाला होता. परंतु बोधयानाने लिहिलेला वेदांतिक सूत्रांवरील
टीकाग्रंथ मी भारतभर शोधला, पण तो माझ्या हाती लागला नाही. वेदान्त सूत्रांवरील या
प्राचीन बोधयान टीकेमुळे बोधयानाची कीर्ती विद्वत्जगात पसरली होती, तिचेच अस्तित्व
जर असे अनिश्चित असेल तर गीतेवर त्याचा टीकाग्रंथ होता हे निश्चित करणे अधिकच अवघड
आहे. काहीजण असेही म्हणतात की शंकराचार्यांनी स्वतःच गीतेची रचना केली आणि
त्यांनीच ती महाभारतात घुसवली.” (संदर्भ- स्वामी विवेकानंद
कृती श्रेणी, खंड ७. पृष्ठ ८०-८१, श्री रामकृष्ण आश्रम प्रकाशन)
चातुर्वर्ण्याची विषम आणि
गुलामीचे समर्थन करणारी व्यवस्था ही नंतर देवाच्या तोंडी घालून समर्थनीय ठरवण्याचा
प्रयत्न करून घुसवण्यात आली आहे हे स्पष्ट करण्यास विवेकानंदांचे हे शब्द पुरेसे
नाहीत काय? हे सारे या लोकांच्या दृष्टीने पुरेसे नाही! त्याचा त्यांना काही उपयोगच नाही. त्यांच्या श्रद्धा म्हणजेच इतिहास आणि
त्यांचे शब्द म्हणजेच वेदवाक्य! सत्याची गरजच नाही.
त्यांच्या मनात रुजलेल्या कल्पना म्हणजेच सत्य. त्यांच्या मनातल्या श्रद्धा
वर्तमानात वास्तवात उतरल्या पाहिजेत. या सर्वांतून भारताच्या लोकशाही संविधानाला
जेवढा धक्का पोहोचेल तेवढा त्यांना विजयोन्माद होतो.
त्यामुळे या विशिष्ट हिंदू
धर्मीयांना असे वाटते की भारतात जन्मलेले प्रत्येक मूल जरी जगाचे नागरिक झाले
तरीही जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याने जाती-वर्णाच्या व्यवस्थेशी घट्ट बांधून
घेतले पाहिजे. स्वतंत्र आणि आधुनिक भारताच्या संविधानाची रचना डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झाली तेव्हा त्यात नागरी आणि मानवतावादी आदर्श ठेवण्यात
आले. हे संविधान असल्या या लोकांच्या दृष्टीने दुःस्वप्न न ठरले तर नवल. त्यांची
झोप उडवणारे संविधान आहे आपले. रास्वसंघ आणि संघ-परिवार यांनी आपले संविधान नष्ट करण्याचे हरप्रकारे
प्रयत्न आरंभले आहेत. थोडेथोडके नाही, तर
अनेकविध आणि अक्षम्य असे प्रयत्न याच उद्दिष्टापोटी त्यांनी सुरू ठेवले आहेत.
आपल्या देशाची संघराज्य रचना
उद्ध्वस्त करणे, संविधानाला मुळासकट उपटण्यासाठी सार्वत्रिक प्रचार करणे या
कारस्थानात रास्वसंघ परिवार अनेकांना दिशाभूल करून सहभागी करून घेत आहे. संघाच्या
दृष्टीने विविधतावाद म्हणजेच फुटीरतावाद, त्यांच्या मते हे विघटनवादाचे विषबीज
आहे. गोळवलकरांनी सांगितले की ‘हा सारा राज्यमंडळांचा
पसारा मांडणाऱ्या संविधानाबद्दलची सारी चर्चा कायमची गाडून टाकली पाहिजे...
संविधानाचा मसुदा पुन्हा तपासून, पुन्हा लिहिला पाहिजे आणि एकचालकानुवर्ती शासनाची
पायाभरणी केली पाहिजे.’
शिवाय, एक ध्वज, एक
राष्ट्रविचार, आणि हिटलरने सांगतलेली एकवंशी, एकाच नेतृत्वाखालील शक्तीमान
हुकूमशाही हेच त्यांचे उद्दिष्ट आहे.
आठवण ठेवायला हवी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या इंदिरा गांधी या सुद्धा काही काळासाठी
हुकूमशहा झाल्या होत्या. तो अतिशय छोटासा काळ होता, आणि त्यांची हुकूमशाही
प्रशासकीय स्वरुपाची होती.
इंदिरेच्या या छोट्याशा
हुकूमशाही काळात न्यायपालिका, प्रशासन, वृत्तपत्रे आणि स्वायत्त संस्था या आजच्या
इतक्या षंढ बनल्या नव्हत्या हे लक्षात ठेवायला हवे.
पण आज, मोदींच्या सत्तेत
न्यायपालिका, प्रशासन, वृत्तमाध्यमे आणि स्वायत्त संस्थांना आपले अस्तित्व
राखण्यासाठी धडपडावे लागत आहे. रास्वसंघाच्या स्वप्नातील भारतात समाजातील सर्वच
अवकाश संकोच पावू लागला आहे. त्यांना केवळ राजकीय सत्ता नव्हे तर समाज, संस्कृती,
प्रशासन या सर्वांवर सत्ता गाजवायची आहे. सर्वव्यापी आणि निरंकुश अधिकार यालाच
म्हणतात!
हे आपण लक्षात ठेवायला हवे.
आणि हे सारे कशासाठी- कोणत्या उद्दिष्टासाठी? चातुर्वर्ण्यावर आधारित
समाजव्यवस्थेची पुनर्स्थापना करण्यासाठी? की मनूस्मृतीवर
आधारित संविधान निर्मिण्यासाठी? की देशाची संपर्कभाषा
संस्कृत व्हावी या आकांक्षेसाठी? की... आपल्या देशाच्या
काळ्याकुट्ट अंधाऱ्या भूतकाळातून त्यांना चढणारी नशा वर्तमानकाळातही मिळत रहावी
म्हणून ते हे सारे करत असतील! संस्कृत भाषा संपर्क भाषा
व्हावी या संदर्भात गोळवलकरांनी आधीच घोषित केले आहे, “जोवर
संस्कृत भाषा संपर्कभाषा होण्याइतकी दृढ होत नाही तोवर हिंदीला सर्वाधिक प्राधान्य
दिले पाहिजे.” (‘बंच ऑफ थॉट्स’ मधील पृष्ठ क्र.१२२ पहा). हे
सारे निश्चितच भयानक बीभत्स आहे!
रास्वसंघाची तिसरी श्रद्धा आहे
आर्यवंश हा सर्वश्रेष्ठ वंश असल्याची. ही तर त्यातील प्रत्येकाची अगदी व्यक्तिगत
वेडगळ श्रद्धा झाली आहे. इथेही रास्वसंघ हिटलरसारख्या क्रूरकर्मा
वर्णश्रेष्ठत्ववाद्याला आपले श्रद्धास्थान मानत आला आहे. अयोग्य वंश संपवला पाहिजे
आणि शुद्ध वंश अधिक सुधारला पाहिजे (युजेनिक्स) हा हिटलरचा विचार होता. त्याच्याही
एक पाऊल पुढे जाऊन गोळवलकर म्हणतात की अखंड भारतात आर्यांनी वंशशुद्धीचे प्रयोग
प्राचीन काळापासून केले आहेत.
गुजरात विद्यापीठाच्या
विद्यार्थ्यांपुढे भाषण करताना गोळवलकर म्हणाले, “आज
संकरित संततीचे प्रयोग फक्त पशूंवर केले जातात. अशा प्रकारचे प्रयोग मनुष्यप्राण्यावर
करण्याचे धाडस आजच्या वैज्ञानिकांमध्ये नाही. संकरित वर्णाचे जे नमुने आज दिसतात
ते वैज्ञानिक प्रयोगांचे फलित नसून केवळ लैंगिक वासनेचे फलित आहे. आपल्या
पूर्वजांनी या क्षेत्रात काय प्रयोग केले ते पाहू. वर्णसंकरातून अधिक चांगले मानवी
नमुने जन्माला यावेत म्हणून उत्तरेकडच्या नंबुद्री ब्राह्मणांना केरळमध्ये
वसवण्यात आले. आणि असा नियम केला गेला की नंबुद्री कुटुंबातील ज्येष्ठ पुत्राला
केरळच्या क्षत्रिय, किंवा वैश्य, किंवा शूद्र कन्येशीच विवाह करावा लागेल. आणखी एक
साहसी नियम असाही करण्यात आला की कुठल्याही विवाहित स्त्रीला पहिले अपत्य केवळ
नंबुद्री ब्राह्मणांकडूनच व्हावे. त्यानंतर ती आपल्या पतीकडून अपत्यप्राप्ती करू
शकते. आज या प्रयोगाला व्यभिचार म्हटले जाईल, पण ते तसे नव्हते कारण हा नियम केवळ
पहिल्या अपत्यापुरताच होता.”
आता आणखी एक विसंगती पहा.
आपल्या अनुवंशशास्त्राच्या ज्ञानाची पताका गुजरात विद्यापीठातील भाषणात
फडकवल्यानंतर ते भाषण जेव्हा रास्वसंघाचे अधिकृत मुखपत्र ‘ऑर्गनायझर’मध्ये प्रकाशित झाले त्यानंतर गोळवलकरांनी
ते भाषण मागे घेतले! अर्थात तोवर ते छापले गेले होते आणि
प्रकाशित झाले होते. मग प्रश्न आला- ते भाषणात सत्य बोलले की
असत्य? त्यांनी ते मागे घेतले म्हणजेच ते असत्य किंवा
मनगढन्त होते असे निश्चित झाले का? त्यांचे हे प्रखर भाषण
मोठे मोहिनी घालणारे होते. त्यांची मांडणी अशी होती की जणू त्यांनी त्याचा
प्रत्यक्ष अनुभव घेतला असावा. अशा प्रकारे दुतोंडी मांडणी करून गोळवलकर असत्याची
सूक्ष्म बीजे सर्वत्र उधळून देत होते आणि मग हीच बीजे सगळीकडे रुजून तणांसारखी
वाढत राहिली. सत्य काय ते तपासले जाईपर्यंत असत्याचे हे तण अमर्याद माजत
रहातात. आजकाल वॉट्सॅप, फेसबुक,
वृत्तमाध्यमे आणि सार्वजनिक भाषणे, चर्चा यांतून
असत्याचा प्रचार-प्रसार देशभर होतो आहे. अशा प्रकारे असत्यभाषण प्रसृत
करायचे, देशवासीयांच्या मनात खोटेनाटे रुजवायचे आणि मग नामानिराळे व्हायचे ही
देणगी गोळवलकरांनीच दिली आहे! रास्वसंघ आणि परिवार हे कार्य
अथक प्रयत्नांनी पुढे नेतो आहे- मुठीमुठीने मनगढन्त असत्यांची बीजे वाऱ्यावर उधळून
देतो आहे.
एकीकडे चातुर्वर्ण्य
व्यवस्थेलाच आपला देव मानणारा रास्वसंघ भारतातच स्थापन झालेल्या जैन, बौद्ध,
लिंगायत अशा चातुर्वर्ण्याला किंवा वेदांना न मानण्यातूनच उद्भवलेल्या धर्मांचे
अस्तित्व नष्ट करू पाहातो. या धर्मांनीही चातुर्वर्ण्याचे संवर्धन करावे अशा
रीतीने ते या धर्मांना वागवू पाहातात. या धर्मांनाही हिंदू धर्माचे भाग
असल्यासारखेच समाविष्ट करून घ्यायचे- उदा. बुद्ध हा विष्णूचाच अवतार आहे असे सांगायचे-
म्हणजे तेही आपोआपच चातुर्वर्ण्याचे भाग होतात, अशी त्यांची युक्ती आहे. दुसरीकडे
इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी या धर्मांना हिंदू चातुर्वर्ण्यात सामावून घेण्याची संधीच
नसल्यामुळे त्यांना नष्टच करण्याचे प्रयत्न केले जातात, परिवाराला त्यांच्यावर थेट
हल्ले चढवण्यासाठी मोकळे सोडले जाते. हे हल्ले अनेक प्रकारे आणि विविध रुपांत
होतात- याची सुरुवातही फार आधीपासूनच झाली आहे. या हल्ल्यांमध्ये एक साम्य निश्चित
असते- लबाडी आणि दुतोंडीपणा. एकच उदाहरण पहा, १४ मार्च १९४८ रोजी तेव्हाचे
राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी पंतप्रधान पंडित नेहरू आणि गृहमंत्री सरदार
वल्लभभाई पटेल यांना एक पत्र लिहिले, त्यात त्यांनी एक इशारा दिला होता- “लोकांमध्ये काही गैरसमज पसरवून दंगे घडवण्याच्या रास्वसंघाच्या
योजनेसंबंधी मला माहिती मिळाली आहे. मुस्लिमांसारखे पोषाख घालून संघाचे अनेक लोक
हिंदूंवर हल्ले करणार आहेत ज्यायोगे हिंदू लोक खवळतील. त्याच वेळी काही हिंदू लोक
मुस्लिमांवर हल्ले करून मुस्लिमांना भडकवतील. अशा प्रकारे दोन्ही समाजांना चिथावून
ते दंगलींचा भडका उडवतील.” संघाच्या लबाडीचे हेच विशेष
प्रथमपासून आहे. आजच्या भारतात याची प्रचीती किती प्रकारे येते आहे? किती सोंगे काढली जात आहेत?
रास्वसंघाचा इस्लाम आणि
ख्रिश्चॅनिटीसंबंधीचा तीव्र द्वेष एवढ्यासाठीच आहे की त्यांचा चातुर्वर्ण्याशी
कोणत्याही प्रकारे मेळ बसू शकत नाही. त्यांना त्यातील काहीही मान्यच होऊ शकत नाही.
त्यांचे हे चातुर्वर्ण्य अमान्य करणे त्यांच्या घशात हाडकासारखे अडकते. या दोन
धर्मांच्या लोकांना एका साच्यात दाबून हवे तसे वळवायचे आणि काहीही करून त्यांचे
चैतन्य हिरावून त्यांना कोणत्याही मानवाधिकारांशिवाय किंवा हक्कांशिवाय सडवायचे
हाच रास्वसंघाचा दृष्टीकोन आहे. वी ऑर अवर नेशनहूड डिफाइन्ड या पुस्तकातील पृष्ठ
क्र. ४७ वर गोळवलकरांनी हे अगदी सुस्पष्टपणे म्हटले आहे, ‘देशात आलेल्या स्थलांतरित लोकांनी त्या त्या देशातील बहुसंख्य लोकांशी,
-राष्ट्रीय वंशाशी- सहजपणे जुळवून घेतले पाहिजे- त्यांची संस्कृती, भाषा,
बहुसंख्यकांच्या आशाआकांक्षा आत्मसात करताना त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व, आपले
विदेशातून आलेले असणे विसरून गेले पाहिजे. त्यांनी तसे केले नाही, आणि ते परके
म्हणूनच जगत राहिले, त्यांच्या नव्या राष्ट्राला त्याचा त्रास होत असला तरीही
आपल्याच मूळ देशाच्या रूढी परंपरा पाळत राहिले तर त्यांना कोणतीही विशेष सुरक्षा
मिळता कामा नये, अधिकार किंवा हक्कांचा तर विषयच संभवत नाही. परक्यांसाठी केवळ दोनच मार्ग मोकळे आहेत- त्यांनी मूळ
राष्ट्रीय वंशात सामील व्हावे, नवी संस्कृती स्वीकारावी किंवा मग राष्ट्रातील वंश
जोवर मान्यता देईल तोवर त्यांच्या दयेवर जगावे किंवा मग राष्ट्रीय वंशाच्या
इच्छेनुसार ते म्हणतील तेव्हा देश सोडावा.’ इतकी नीतीभ्रष्ट
कल्पना मांडणारा हा मनुष्य म्हणजे हिटलरचाच भाऊ.
रास्वसंघ आणि त्यांची पिलावळ
कशाप्रकारे फसवणुकीचे मार्ग आखते त्याचे एक अगदी स्पष्ट उदाहरण म्हणजे टिपू
सुलतानाच्या बाबतीतली बदनामीची मोहीम. टिपू सुलतानाची राजवट होती १७८२ ते १७९९ या
काळातील. संघपरिवारातील संघी विद्वानांनी असे सांगायला सुरुवात केली की कोडगू
(कूर्ग) या भागात ६९,००० हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात टिपू सुलतानाचा
हात होता. कोडगू जिल्ह्याच्या स्टेट गॅझेटीअरमधील या भागाच्या तेव्हाच्या
लोकसंख्येचे आकडे तपासा. कितीही प्रयत्न करून आकडे फुगवले तरीही संपूर्ण लोकसंख्या
६९,०००च्या वर जात नाही. त्यांचे म्हणणे खरे असेल तर आज कोडगूची संपूर्ण लोकसंख्या
मुस्लिम असायला हवी होती नाही कां? पण
प्रत्यक्षात कोडगूच्या मुसलमान लोकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या जेमतेम १५% आहे. संघाचे आंधळे विद्वान या गोष्टीची दखल घेत नाहीत, घेऊ इच्छित नाहीत.
खोटे बोला, असत्याची बीजे पेरा आणि ती वाढताना पाहात रहा. दुर्दैवाने, फसवणुकीचे
रान माजत चालले आहे. रास्वसंघ आणि परिवाराला या फसवणुकीच्या रानातून निघणारे
खोटारडेपणाचेच पीक हवे आहे. त्यांच्यात देवत्वाचा अंशही नाही. फसवणूक हेच त्यांचे
कुलदैवत आहे. त्यांची सदसद्विवेकबुद्धी या लबाडीच्या कारखान्यात बळी गेली आहे.
आता आपण हे तपासून पाहू की
इथले सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन्स हे बाहेरच्या देशांतून इथे आले आहेत का? त्यातील बहुसंख्य लोक चातुर्वर्ण्यातील अत्याचारांनी, अन्यायांनी पिडलेले
लोक होते आणि जातीभेदाच्या चक्राखालून सुटण्यासाठी त्यांनी धर्मांतर केले होते हे
खोटे? शिवाय इस्लामी आक्रमकांचे आगमन झाल्यानंतर सत्तेच्या
अभिलाषेपोटी, सैन्यातील मानाच्या पदांसाठी, प्रशासकीय उच्चपदांसाठी, प्रतिष्ठेसाठी
इस्लामचा स्वीकार करण्याचा आरंभ करणारे लोक उत्तर भारतातील आर्य ब्राह्मणच होते ना?
रास्वसंघाच्या द्वेषाचे लक्ष्य असलेले पाकिस्तानातील अनेक मुसलमान
हे असेच पूर्वाश्रमीचे आर्य ब्राह्मण होते ना? हे वास्तव
स्वीकारण्याची कुणाचीच तयारी नाही. निदान या पूर्वाश्रमीच्या हिंदूंचे, आजच्या
मुसलमानांचे मूळ तपासून पहाल? त्यांचे मूळ आर्यवंशी नाही?
पुन्हा एकदा, त्यांची हे सारे जाणून घेण्याची इच्छाच नाही. त्यांची
एकमात्र इच्छा आहे ती सर्वांनी चातुर्वर्ण्याची दंडाबेडी घालून आयुष्याची वाटचाल
करावी. त्यामुळेच चातुर्वर्ण्य हेच खरे आणि एकमेव हिंदुत्व असल्याचा दावा रास्वसंघ
उचलून धरतो. बहुसंख्य हिंदू धर्मीय हे उदारमतवादी असूनही त्यांना अशा प्रकारे
हिंदुत्वाच्या व्याख्येतच फसवण्यात येते, त्यांना इतर धर्मांचा द्वेष करायची
दीक्षा दिली जाते आणि या प्रक्रियेत त्यांना मुसलमान आणि ख्रिश्चनांवर हल्ले
करण्यासाठी पायदळात भरती केले जाते.
रास्वसंघाकडे आतवर पाहाताना
आपले लक्ष आणखी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे वळले पाहिजे. भूतकाळातील कबरी खणून
भुते जागवण्यात आणि त्यांना वर्तमानात नाचवण्यात रास्वसंघ हा काही एकटाच नाही.
संघाच्या काळ्या सावलीत आता त्यांची पिलावळही प्रचंड उत्साहाने या कामात सामील
झाली आहे. संघाच्या प्रमुख प्रकाशन संस्थेचे १९९७मध्ये प्रसिद्ध झालेले ‘परम वैभव के पथ पर’ हे पुस्तक सारे तपशील देते. या
पिलावळीत भारतीय जनता पक्ष आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे, हिंदू जागरण
मंच आहे, संस्कार भारती आहे, विश्व हिंदू परिषद आहे, बजरंग दल आहे. एकंदर अशा
चाळीस संस्था संघटनांचा उल्लेख या पुस्तकात आहे. ही १९९६मधली माहिती आहे.
यानंतरच्या काळात आणखी किती असली भूछ्त्रे उगवली असतील गणतीच नाही. ‘धर्मसंसद’ ही धार्मिक संघटनाही संघाच्याच पंखाखालची
आहे. कर्नाटकच्या बजरंग दलाचेच भावंड असलेली श्री राम सेनै ही संघटना सुद्धा यातच
आहे. ही सारी पिलावळ रास्वसंघाचीच असूनही, यांच्या काही हिंसक कृत्यांमुळे संघ
अडचणीत येतो आहे असे वाटले की संघ अगदी ठरीवपणे या संघटनांशी आपला काहीही संबंध
नाही असे सांगून मोकळा होतो. खरे तर या सर्व संघटनांचे संघाशी आतड्याचे नाते आहे.
ज्या प्रकारे रास्वसंघ
स्वयंसेवकांना आपल्या विचारप्रणालीची दीक्षा देतो ते तर सर्वात भयावह आहे.
गोळवलकरांच्या शब्दांत, “आपण ज्या क्षणी या संघटनेचा भाग
बनतो आणि संघ-धारणा स्वीकारतो, त्यानंतर आपल्या आय़ुष्यासंबंधी दुसऱ्या काही
पर्यायांचा विचार करणे संभवतच नाही. जे सांगितले आहे ते करा. कबड्डी खेळायला
सांगितले तर कबड्डी खेळा. बैठक घ्यायला सांगितली तर बैठक घ्या. उदाहरणार्थ आपल्या
काही मित्रांना सांगण्यात आले की राजकीय कार्यक्रमांत भाग घ्या. पण म्हणजे आता
राजकारणाविना त्यांना जगता येणार नाही किंवा ते पाण्याविना मासा तडफडावा तसे तडफडतील
असे होता कामा नये. त्यांना राजकारणातून बाजूला व्हायला सांगताच ते विनाविलंब
बाजूला होतील. त्यांची काहीही हरकत असणार नाही. त्यांना निवडीचे कुठलेही
स्वातंत्र्य असणे अनावश्यक आहे.”
(वर्ध्याच्या
सिंदी गावात गोळवलकरांनी १६ मार्च १९५४ रोजी दिलेले भाषण)
इथे गोळवलकर निवडीचे
स्वातंत्र्य अनावश्यक असल्याचे सांगतात. व्यक्तीगत निवड महत्त्वाची नसल्याचे घोषित
करतात. इथे प्रश्न असा आहे की अनेक लहान मुले संघटनेत आणली जातात आणि जबरदस्तीनेच
सामील केली जातात. लोकांना मनाची तयारी करण्याचाही अवधी दिला जात नाही.
संघ स्वयंसेवक होण्याच्या
नावाखाली ते अमानुष यंत्रमानवांचीच फौज तयार करत असतात. रास्वसंघाने जाळ्यात
ओढलेल्या मुलांना कसे वाचवायचे हा एक प्रश्नच आहे!
हिंदू समाजाने या विचित्र
काळात या विषयावर बोलणे आवश्यक आहे. चातुर्वर्ण्याचे ढोल वाजवणाऱ्या हिंदूंची
क्रूर कृत्ये पाहूनही गपचूप बाजूला उभे राहून गंमत बघण्याची ही वेळ नाही. खरे तर
असले क्रूर हिंदू तसे अल्पसंख्यच आहेत, पण मेंढीचे कातडे पांघरून कळपात शिरलेल्या एखाददुसऱ्या
लांडग्याइतकेच घातकी आहेत. सर्वसामान्य हिंदू समाजातील माणुसकी न हरवलेले लोक सर्व
जातींत आहेत- यात ब्राह्मण आले तसेच आदिवासी आणि इतरही आले- या सर्वांनी एकत्र
येऊन हा विचार केला पाहिजे.
३-आजघडीला
आज, भाजप हे रास्वसंघाचे एक
पिल्लू केंद्रात आणि इतर अनेक राज्यांत सत्तेवर आहे. महाराष्ट्रातही अनेक
लांड्यालबाड्या करून, येनकेन प्रकारेण नुकताच भाजप सत्तेत पुन्हा शिरला आहे. १९७५मध्ये
आणिबाणीच्या काळात रास्वसंघाच्या राजकीय पक्षाने म्हणजेच जनसंघाने जयप्रकाश
नारायणांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधींच्या हुकूमशाही कारभाराला विरोध
करण्याच्या मोहीमेत शिरकाव करून घेतला. तेव्हापासून त्यांचा रागरंग पूर्णपणे
बदलला. आजवर लोक जनसंघाला नाकारत आले होते ते त्यांना निदान दारात उभे करू लागले.
रास्वसंघाच्या सदस्यांनी जयप्रकाश नारायणांच्या जनता पार्टीचे सदस्यत्व घेताना
दुहेरी पक्षसदस्यत्वाचा आणि रास्वसंघाच्या सदस्यत्वाचा त्याग करण्याचे वचन दिले.
असे वचन देणारे महत्त्वाचे नेते होते, अटलबिहारी बाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि
रास्वसंघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस. त्यांच्या सोज्वळ प्रतिमेला भुलून
जयप्रकाश नारायणांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. जनता पार्टीत नांदत असताना
त्यांनी कधीही त्यांचे संघाशी असलेले संबंध संपवले नाहीत आणि संघाचे सदस्यत्वही
सोडले नाही. वचन मोडणे हातचा मळच होता. जयप्रकाशांचा विश्वासघात झाला होता. नंतरच्या
वर्षात जेपी या विश्वासघाताबद्दल दुःख प्रकट करताना म्हणाले, “त्यांनी मला दगा दिला.”
(१९७५च्या आणिबाणीत जयप्रकाश
नारायणांना चंडीगडच्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले होते तेव्हा शासनाने
जिल्ह्याचे कलेक्टर एम जी देवसहायम् यांना त्यांच्या नजरकैदेवर लक्ष ठेवण्यासाठी
नेमले. रोज भेटीगाठी होत असल्यामुळे ते जेपींचे निकटवर्ती मित्रच झाले. नजरकैदेतून
सुटका झाल्यानंतरही त्यांची मैत्री टिकून राहिली. त्यांचे हे शब्द एमजी देवाशयम
यांनी अजाज अश्रफ यांना दिलेल्या मुलाखतीत
वाचायला मिळतात. ही मुलाखत न्यूजक्लिक या ऑनलाईन मासिकाच्या २६ जून
२०१९च्या अंकात वाचायला मिळेल.)
जनसंघाचा भारतीय जनता पक्ष
झाल्यानंतर रास्वसंघ आणि भाजपचे फसवणुकीचे उद्योग देशभरात वेगाने पसरू लागले. यातून
अखेर भारतीय जनता पक्ष सत्तेतही आला. देशभरात गोंधळ, संशय, द्वेषाचे वातावरण
निर्माण करून, पाकिस्तानला सर्वात धोकादायक शत्रू ठरवून त्यांनी देशाची मोठ्या
प्रमाणात दिशाभूल केली. भारतात घडणाऱ्या बारीकसारीक दंगलींनाही पाकिस्तानच जबाबदार
असल्याचे सांगितले गेले, लोकांना एकमेकांविरुद्ध भडकावण्याचे सत्र सुरू झाले.
समाजात भयाचे वातावरण सातत्याने राहील अशी काळजी ते घेऊ लागले. कधीकधी स्वतःच
दंगली करायच्या आणि दोष मुसलमानांवर ठेवायचा ही नेहमीची युक्ती होऊ लागली. आणि आता
ज्या हिंदु धर्माच्या ज्या छत्राखाली शेकडो श्रद्धा, परंपरा आणि पंथ जपले जात होते
ते छत्रच जयप्रकाश नारायणांसारखा शोक व्यक्त करताना दिसते आहे... दगा झाला आहे.
सत्तेवर येण्याआधी भाजपने किती
वचने दिली होती? कसलेकसले वेष त्यांनी पांघरले होते? एक की दोन की किती? त्यांनी दावा केला होता
भारतीयांनी बेकायदेशीरपणे जो पैसा परदेशी बँकांच्या खात्यांत ठेवला होता तो परत
आणला जाईल आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकले जातील. नरेंद्र
दामोदरदास मोदी यांनी स्वतःच्या तोंडाने हे सांगितले होते. कुणाला मिळाले ते?
तो पैसा आला असेल तर कुठे गेला? मग मोदींनी
कोट्यवधी नोकऱ्या निर्माण करण्याची घोषणा केली होती. पण त्यांनी निर्मिती केली ती
अभूतपूर्व बेकारीची! कोण बोलणार आहे? हे
प्रश्न कोण विचारणार आहे? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू
म्हणाले होते ते. पण शेतकऱ्यांचे उत्पन्न जेवढे होते तेवढेही उत्पन्न त्यांना
टिकवता आले नाही. त्यांनी आपल्याला धूळ चारली आहे. ते काहीही सोडत नाहीत.
सार्वजनिक उद्योग खाजगी क्षेत्रात विकून त्यांची मौज चालली आहे. विदेशी कर्जाचा
बोजा इतक्या प्रमाणात कधीच वाढला नव्हता. त्यांचे गोडगोड बोलणे, पोकळ आश्वासने,
वाळूचे बंगले यांच्या घोळात घेत त्यांनी देशाचे दिवाळे काढले आहे. वाढती बेकारी
आणि महागाई यामुळे ते जराही विचलित होताना दिसत नाहीत. दोन समाजांत द्वेष पेरणे,
तो धुमसत ठेवणे आणि मग उतू जाऊ देणे... या सत्ताधाऱ्यांनी लोकांना द्वेष करण्यातच
समाधान मानायला शिकवले आहे. ज्यांनी भाजपला मत दिले आणि सत्तासिंहासनावर बसवले
त्यांनाही आता पश्चात्ताप होताना दिसतो आहे. परिणामी नागरिकांच्या मनातील सार्वभौम
देशाची भावनाच उतरणीला लागली आहे. ज्या मतदारांनी यांना निवडून दिले त्या
मतदारांच्या दैनंदिन संघर्षाशी यांचा जणू काहीही संबंध नाही.
आजच्या भारतातील राजकीय
पक्षांची घडण कशी आहे यात या घसरणीचे उत्तर सापडू शकते. १- व्यक्तींनी नियंत्रित
केलेले पक्षीय राजकारण २- कुटुंबांनी नियंत्रित केलेले पक्षीय राजकारण ३-
असंवैधानिक संघटनांनी नियंत्रित केलेले पक्षीय राजकारण. या तीन प्रकारच्या
पक्षांची सत्ता भारतात कुठे ना कुठे नांदत आहे. या तीनही प्रकारांमुळे लोकशाही
धोक्यातच येते. आज देशाचे चालकत्व भाजपच्या हाती आहे- असंवैधानिक संघटनेने
नियंत्रित केलेला पक्ष. व्यक्ती किंवा कुटुंबाने नियंत्रित केलेल्या पक्षात जसे
मतदारांच्या हितापेक्षा पक्षप्रमुखांचे हितरक्षण करण्याकडे कल असतो तसेच,
असंवैधानिक संघटनेने नियंत्रित केलेल्या पक्षात मातृसंघटनेचे हित जपले जाते. ही
पक्षसंघटना तीनही पक्षप्रकारांतील सर्वाधिक धोकादायक म्हणावी लागेल. म्हणूनच आज
आपल्याला दिसते की भाजपचे आमदार-खासदार, मंत्रीसंत्री, छोटेमोठे नेतेही
रास्वसंघाच्या नजरेत भरण्यासाठी कशाही उड्या मारायला तयार असतात. असल्या देखाव्यात
एकमेकांवर मात करण्याचे त्यांचे इप्सित असते.
असंवैधानिक संघटनांनी
नियंत्रित केलेल्या पक्षांबाबत आणखी एक निरीक्षण आहे- उदाहरणासहित पाहू- बलाढ्य
नेता म्हणून सर्वत्र प्रतिमा तयार केल्यानंतर मोदी हे बहुमत मिळालेल्या भाजपकडून
पंतप्रधान झाले. पण तरीही ते केवळ दिसण्यापुरते प्रमुख उत्सवमूर्ती आहेत. खरे दैवत
आहे रास्वसंघ- जे नागपूरच्या मंदिरात आरामात बसले आहे. उत्सवमूर्तीच्या वेषभूषेतील
पात्र देशभर इकडून तिकडे फिरत असते, लोकांचा जयजयकार घेत असते. उत्सवमूर्ती
होण्यासाठी मुख्यतः काय लागते? काही कौशल्ये लागतात-
जनसंमर्दापुढे प्रभावी अभिनय करावा लागतो, आपल्या शासनकालात काही भयंकर समस्या
उद्भवल्या तर काहीतरी मुद्द्यावरून भावनिक उद्रेक घडवून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याची
धूर्तता लागते, लोकांना येडे बनवण्याच्या युक्त्या गाठीशी असाव्या लागतात आणि
सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाभाऱ्यात बसलेल्या खऱ्या दैवताशी ‘शतप्रतिशत’ निष्ठा असावी लागते. बस्स, एवढेच लागते.
आजघडीला हेच तर होते आहे ना?
आपल्या लोकशाहीवरचे आणखी एक
महासंकट म्हणजे अशा असंवैधानिक संघटनेने चालवलेल्या पक्षाची नेतृत्वनिवडीची
प्रक्रिया. जणू काही देवतांच्या अंगावरची फुले काही निवडक भक्तांना वाटली जातात
तसे प्रसादासारखे नेतृत्व ठरते. सारे कसे कळसूत्री बाहुल्यांच्या खेळासारखे! नवा नवा बाहुला, रंगीबेरंगी कपडेवाला, राजकारण करण्याचे कौशल्य असो वा नसो-
पण त्याला दिलेल्या तालाबरहुकूम विनातक्रार नाचता आले पाहिजे, प्रेक्षकांना
त्याच्या नाचाने गुंगवून ठेवले पाहिजे... जर आधीचा बाहुला तितकासा आकर्षक राहिला
नाही तर त्याची जागा दुसरा बाहुला घेतो... रंगमंचावर प्रवेशतो... नेता होतो. आधीचा
बाहुला अडगळीत पडतो. निवडून आलेल्या
प्रतिनिधींची ही अवस्था मातृसंस्था करत असेल तर त्यात मोठाच धोका आहे. बाकी सर्व
गोष्टींपेक्षा आपल्या लोकशाहीला आज असलेला सर्वात मोठा धोका हाच आहे.
अशा साऱ्या गोष्टी एकत्र येऊन
लोकांचे जगणे पार केविलवाणे झाले आहे. असंवैधानिक संघटनेच्या हातातले बाहुले
असलेल्या भाजपने नियुक्त केलेल्या पंतप्रधानांकडे काही राज्यकर्त्यासाठी आवश्यक
अशी कौशल्ये हवीत असे ठरले असते तर बेकारी निश्चितच रोखता आली असती. महागाईवर
नियंत्रण मिळवता आले असते. सरकार सार्वजनिक संपत्तीची विक्री करून टाकण्यासाठी
हातघाईवर आले नसते. विदेशी कर्जाचा बोजा वाढतच गेला नसता. भारतातील स्वायत्त
संस्थांना निकामी, निष्फळ करण्यात आले नसते.
पंतप्रधान मोदींच्या या कौशल्यहीन
चकचकीत जगात कोविड १९च्या हल्ल्यापूर्वी म्हणजे २०२० पूर्वी अंबानींची संपत्ती
२.९८ लाख कोटी होती- ती आता ८.०३ लाख कोटी झाली आहे. अडानींची संपूर्ण संपत्ती
कोविड-१९च्या हल्ल्याआधी म्हणजे २०२०च्या आधी ६९ हजार कोटी होती म्हणजे
अंबानींच्या संपत्तीच्या एक चतुर्थांशही नव्हती- पण दरम्यानच्या काळात ती वाढून
आता ७.८० लाख कोटी झाली आहे. केवळ २ वर्षांत ही मजल! (संदर्भ-फोर्ब्ज्
मॅगेझिन- १० जून २०२२). एक दोन नव्हे तर
अनेक प्रकारच्या विषमतांच्या दऱ्यांतून खेचत फरफटत निघालेला भारत कणी तुटलेल्या
पतंगासारखा भरकटतो आहे. पण सरकार केवळ श्रीमंतांना सवलती आणि अर्थसाहाय्य देऊ करते
आहे. करकपात करते आहे. हजारो कोटींचे कर्ज माफ करून टाकत आहे आणि पुन्हा कर्ज
घ्यायची परवानगीही दिली जात आहे. हे सरकार कोणाचे आहे? देशातील
सर्व लोकांनी बसून यावर शांतपणे मनोमन विचार केला पाहिजे.
पण काहीही होवो- लोक दैनंदिन आयुष्यात
कितीही झगडत राहोत, काहीही घटना घडोत वा प्रसंगनिर्मिती होवो, देशाच्या चिंधड्या
उडोत... असंवैधानिक मातृसंघटनेच्या नियंत्रणाखालील भारतीय जनता पक्ष देशभक्तीची
गीते गुणगुणत अनावश्यक कायदेकानू आणि घटनादुरुस्त्यांचे प्रस्ताव आणत आहे. भाजपातून
चातुर्वर्ण्य पद्धतीचा दुर्गंध मुरत चालला आहे, मनूचे कायदे घुसवत भारतीय
संविधानाचा शक्तीपात करणे सुरू आहे, इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीबद्दल टोकाची
असहिष्णुता, आर्यवंशश्रेष्ठत्वाच्या कल्पना उचलून धरल्या जात आहेत. कोणतीही किंमत
देऊन ही सामग्री तर जमवलीच पाहिजे. कुठेही शोधा ती सापडतेच. कर्नाटकातील ‘धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काचा कायदा’ हा वरवर
पाहाता कायदा असल्यासारखा भासतो. पण नीट वाचून पाहिलात तर त्यात भारतीय संविधानाला
उद्ध्वस्त केल्याचे आणि मनुच्या धर्मशास्त्रातील नियमांना घुसवल्याचे दिसते. आपण
सारे आपल्या संवैधानिक स्वातंत्र्यांबद्दल बोलतो, पण रास्वसंघाने स्वातंत्र्याचा
अर्थच संपूर्णपणे बदलून टाकला आहे. संघाचे गोळवलकर गुरुजी त्यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’मधे
म्हणतात, “स्वातंत्र्य असणे याचा अर्थच आपल्या राष्ट्रीय
मूल्यांचे म्हणजेच धर्म आणि संस्कृतीचे संवर्धन आणि प्रसार करणे आहे.” गोळवलकरांचे शब्द हे भाजपसाठी संविधानासारखेच आहेत कारण ते अखेर
रास्वसंघाचे अपत्य आहे. गोळवलकर धर्म कशाला म्हणतात हे समजून घेऊ. त्यांच्या
दृष्टीने चातुर्वर्ण्याला समर्थन देणाऱ्या मूठभर हिंदूंचा धर्म तोच धर्म आहे.
अनेकविध परंपरा पाळणाऱ्या फार मोठ्या हिंदू समाजाशी त्यांना देणेघेणे नाही. अशा
अगदी लहानशा हिंदू गटाकडे धर्माची मशाल सोपवण्यात येत असेल तर ते नैतिकदृष्ट्या
कसे काय समर्थनीय ठरू शकते? यावर प्रश्न विचारले गेले
पाहिजेत. आणि संपूर्ण धर्माची व्याख्या जर गोळवलकर काय म्हणतात याच एका आधारावर
होणार असेल तर मग आपल्या संविधानाने दिलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याचे काय,
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे काय, धार्मिक स्वातंत्र्याचे काय?
चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये जो हिंदू समाज शूद्र वर्णात गणला गेला होता, त्यांना
पुन्हा एकदा शूद्रत्वात ढकलले जाईल काय हा प्रश्नही विचारायला हवा. ब्राह्मण,
क्षत्रिय आणि वैश्यांची हर प्रकारे सेवा करणे हेच त्यांचे आय़ुष्य असणार आहे का?
हे प्रश्न समोरासमोर विचारले गेले पाहिजेत.
गोळवलकर आपल्या ‘बंच ऑफ थॉट्स’
या पुस्तकात भारताची संघराज्य पद्धती गाडायची भाषा बोलतात. एकाच झटक्यात भाजपने
भारताची संघराज्य पद्धती खिळखिळी करून टाकली- गाडण्याच्या जवळपासच नेली. जीएसटी
कराच्या निमित्ताने हे करण्यात आले. वरवर पाहाता जीएसटी हा आर्थिक सुधारणेचा
निर्णय वाटतो. पण त्याचा परिणाम काय झाला आहे? भारतातील
राज्यांनी हा कर मान्य करून आपली आर्थिक स्वायत्तता केंद्राच्या अधीन करून टाकली
आहे. आता अशी परिस्थिती आहे, की राज्यांनी आपली संपत्ती केंद्राच्या पायापाशी नेऊन
ओतली आहे आणि त्यातला हिस्सा मिळावा म्हणून आता त्यांना रडतभेकत भिका मागाव्या
लागत आहेत. या बाबतीत राज्यांची स्वायत्तता संपवून भाजपने गोळवलकरांची इच्छा पूर्ण
करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. संघराज्य पद्धतीचा आत्मा असलेला संविधानातील
सर्वात महत्त्वाचा भाग त्यांनी मिटवून टाकला आहे! आता आपल्या
समोर ठाकला आहे हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्याच्या सक्तीचा प्रश्न- कारण त्यानंतर
येणार आहे संस्कृत भाषा राष्ट्रभाषा बनवण्याचा प्रयत्न. यातून अखेर विविधता
संपवण्याचा हेतू आहे. एक राष्ट्र, एक भाषा, एक वंश, एक चालक... वगैरे वगैरे.
शिक्षणाच्या बाबतीतही तीच कथा
आहे. रास्वसंघ नेहमीच आपला पंजा शिक्षण आणि इतिहासावर ठेवून असतो. शालेय शिक्षण हे
तर द्वेषप्रसाराचे प्रमुख साधन. याचे एक छोटेसे पण स्पष्ट उदाहरण पहा. सहावीच्या
एका पाठ्यपुस्तकातून एक वाक्य गाळले गेले- “टिपू सुलतानाने
ब्रिटिशांविरुद्ध अनेक लढाया केल्या. फ्रेंचांच्या साथीने त्याने ब्रिटिशांना
देशातून हाकलून काढण्याचे प्रयत्न केले.” हे वाक्य धड्यातून काढून
टाकले गेले. शिवाय टिपू सुलतानाने केलेले रेशीमशेतीचे प्रयोग, जमीन सुधारणा,
शेतकऱ्यांना छोटी कर्जे पुरवण्याचे प्रयत्न, नाण्यांची टांकसाळ उभारणे हे सारे काढून
टाकण्यात आले. शिवाय सहावीच्या पुस्तकातील ‘इतर धर्मांचा उदय’ हा धडाही संघवाल्यांना सहन झाला नाही. त्यात जैन, बौद्ध हे नवीन धर्म
असल्याचे लिहिण्यात आले होते. त्यात बदल करून कर्नाटक सरकारने जैन आणि बौद्ध हे
हिंदू धर्मातीलच दोन पंथ असल्याचे वाक्य टाकून तो धडा आठवीसाठी टाकला. जैन, बौद्ध,
शीख, लिंगायत हे भारतातील खरे स्वतंत्र धर्म आहेत हे वास्तव
चातुर्वर्ण्यवाद्यांच्या घशात अडकते खरे.
पाठ्यपुस्तकांमधे असे
प्रतिगामी बदल करणे तसे नवीन नाही. १९९८मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार
सत्तेवर आले तेव्हा मानव संसाधन मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांना शालेय
अभ्यासक्रमात ‘पौरोहित्य आणि कर्मकांडे’ हा विषय घातला होता. त्यांच्याच काळात विज्ञानाधिष्ठित खगोलशास्त्राऐवजी
ज्योतिषविद्येच्या शिक्षणावर त्यांनी भर दिला. वैदिक कर्मकांडात वर्णन केलेल्या
पुत्रजन्मासाठी करण्याच्या पुत्रकामेष्टी यज्ञाबद्दलचीही माहिती देण्यात येऊ
लागली. एकंदरीत अविवेकी श्रद्धा आणि मूर्खपणाच्या गोष्टी लहान मुलांच्या मनावर
ठसवण्याचा प्रयत्न होऊ लागला. रास्वसंघाच्या कार्यात विश्लेषण किंवा विचार
करण्याची गरज नसल्याचे गोळवलकरांनी सांगितले होते ते आठवा. सत्तेत आल्यानंतर
त्यांनी बालशिक्षणात हीच तत्त्वे रुजवण्यास सुरुवात केली.
अलिकडेच सीबीएसईने आपल्या
सिलॅबसमधून अनेक विषय हटवले. यामध्ये दहावीच्या अभ्यासक्रमातून लोकशाही आणि विविधता,
जागतिकीकरणाचा शेतीवरील परिणाम, जन आंदोलने, जातीयवाद या विषयांना वगळण्यात आले.
अशा प्रकारची शैक्षणिक क्षेत्रातील ढवळाढवळ शक्य व्हावी म्हणूनच रास्वसंघाने आणखी
एक पिल्लू पाळले आहे- ते म्हणजे ‘शिक्षा संस्कृती उत्थान
न्यास’. या द्वारे ते सातत्याने एनसीईआरटीवर अभ्यासक्रमातून ‘माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी १९८४च्या शीख शिरकाणाबद्दल माफी मागितली’ किंवा ‘२००२च्या गुजरातमधील दंग्यांमध्ये २०००
मुस्लिमांच्या हत्या झाल्या’ असे अडचणीचे संदर्भ वगळण्यासाठी
दबाव टाकत असतात. त्यांचा भ्याड धूर्तपणा तो हाच आहे. कोण
जाणे सध्या डोळ्यासमोर घडत असलेल्या घटना लपवण्याची शिकस्त करणारे हे लोक कुणालाच
माहीत नसलेला अर्वाचीन भूतकाळ आणखी कोणकोणत्या रंगात रंगवतील... की अदृश्यच करतील?
हेच सुरू राहिले तर एक वेळ अशी
येईल की आपल्याला हेडगेवार आणि सावरकर यांनीच स्वातंत्र्य मिळवून दिले असेच
पाठ्यपुस्तकात वाचायला लागेल. हेडगेवारांनी भारताचा स्वातंत्र्यलढाच नाकारला होता
आणि वीर म्हणवले गेलेल्या सावरकरांनी ब्रिटिश वसाहतवाद्यांशी, साम्राज्यवाद्यांशी
तडजोड करून माफीपत्रे दिली होती. असे लोक भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे शिल्पकार
असल्याची कहाणी लवकरच रचली जाईल आणि प्रसृतही होईल. गांधीहत्या करणाऱ्या गोडसेचा
धडा तो हिंदूधर्माचा संरक्षक हीरो होता
अशा प्रकारे शाळेत शिकवला जाईल. येत्या काळात रास्वसंघ आणि त्यांची पिलावळ कायकाय
दिवस दाखवतील ते लवकरच उलगडत जाणार आहे!
आणखी किती काळ हे सांगत राहावे
लागणार आहे? आर्य वंश हा सर्वश्रेष्ठ आहे एवढेच मान्य
करून भागणार आहे? मूळनिवासींसाठी संघाने आदिवासी ही संज्ञा
बदलली आणि त्यांना वनवासी म्हणून संबोधायला सुरुवात केली. त्यांच्याकडून सारे काही
हिसकावून घेणारे हेच लोक आता आदिवासींची नावेही बदलायचा प्रयत्न करत आहेत. याचे
कारण सोपे आहे, जोवर आदिवासी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखतील तोवर बाकीच्यांना आपण या भूमीत परकेच असल्याची
भावना येत राहील. हाच धागा धरून सांगितले पाहिजे, राखीगढी येथे सापडलेल्या
अवशेषांत सापडलेल्या डीएनए अभ्यासावरून हेच स्पष्ट झाले होते की सिंधु
संस्कृतीच्या लोकांचे आर्य किंवा वैदिक लोकांशी काहीही गुणसूत्रीय साम्य नव्हते.
रास्वसंघाला याचा धक्का बसला,
आणि मग त्यांनी सिंधु संस्कृतीला सरस्वती संस्कृती म्हणायला सुरुवात केली. पण आपण
आर्य लोक बाहेरून आले हे मान्य केले तर? भारतभूमी ही
येथे जन्मलेल्या प्रत्येकाला पोटाशी धरते.
शिवाय भारतात द्रविड, आर्य, इस्लामिक आणि ख्रिश्चन अशा सर्व लोकांचे संबंध
एकमेकांत अतिशय घट्ट विणले गेले आहेत. असे असताना रास्वसंघ इतका अस्वस्थ का आहे?
संघ वर्तमानकाळात का जगू शकत नाही? आर्य
वंशाच्या थोरवीचा जीवघेणा पगडा त्यांच्यावर आहे असे दिसते.
आपण श्रीराम सेनै किंवा बजरंग
दलसारख्या संघटनांमधील तरुणांचा विचार करू. हिजाब, हलाल, मुस्लिम विक्रेत्यांवर
बहिष्कार, अजान वगैरे गोष्टींवरून ते वातावरण तापवायच्या प्रयत्नांत सतत असतात ते
का?
हे सारे तरुण तळागाळातील पददलित समाजातले नाहीत का? त्यांच्यासाठी आपल्या देशात योग्य ते काम, नोकऱ्या निर्माण होणे हे
विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही का? पण रास्वसंघाच्या
पोटी जन्मलेल्या भाजपला या कशाशीच कर्तव्य नाही. रास्वसंघ आणि भाजप यांच्या
दृष्टीने शूद्रांनी त्यांचे पायदळ म्हणूनच राबले पाहिजे, त्यांना कायम असुरक्षित
वाटले पाहिजे आणि त्यांना चातुर्वर्ण्याच्या नियमांनुसार नेहमीच सेवेकरी भूमिकेतच
राहिले पाहिजे. कंत्राटी मजूर आणि त्यांची स्थिती वेगळी नसते. आधी झालेल्या जमीन
हक्क सुधारणा कायद्यांची विल्हेवाट लावली की मग हे भूमीहीन शूद्र पुन्हा एकदा
उच्चवर्णीयांची चाकरी करण्यात गुंतवता येतील, नाही का? सरकारी
प्रशासनातील रिकाम्या जागा न भरल्याने आणि विविध सार्वजनिक उपक्रम खाजगी
क्षेत्राच्या घशात घातल्याने नोकऱ्यांतील आरक्षणाचा प्रश्न आपोआप निकाली निघतो.
आरक्षण मिळत असलेल्या समाजाला बेरोजगार करण्याचा हा प्रयत्न नाही काय? सन्माननीय नोकऱ्या गेल्या की शूद्रांना अपमानास्पद अशा खाजगी चाकऱ्या
केल्याशिवाय पर्यायच रहाणार नाही. शिवाय एकीकडे केंद्र सरकार कामगारांचे हक्क
दडपण्याचे प्रयत्न जारीने करतेच आहे.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन
इकॉनॉमी (सीएमआयई) या संशोधन संस्थेच्या अहवालानुसार २०१७ ते २०२२ या काळात भारतीय
श्रमिकांमधील २ कोटी स्त्रिया नाहीशा झाल्या आहेत. हे सहज घडले, योगायोगाने घडले
की स्त्रियांनी चूलमूल सांभाळण्यासाठी घरात रहावे या रास्वसंघाच्या छुप्या
अजेंड्यानुसार घडले? असा संशय येणं, शंका येणं अगदी स्वाभाविक
आहे.
या सर्वासोबतच सध्या शिक्षणाचे
खाजगीकरण जोरात सुरू करण्यात आले आहे, सरकारी शिक्षणसंस्थांना खिळखिळे केले जात
आहे. त्यामुळे ग्रामीण भागांत मुलींच्या शिक्षणावर थेट परिणाम झाला आहे. काही
परिणाम आपल्याला स्पष्ट समजत आहेत, तर काही भयंकर परिणामांचा अंदाजही येत नाही.
काय करायला हवे? आणि कसे? आपल्याकडे स्पष्ट उत्तरे आहेत का?
समजा, गावात चोर शिरले तर आपण
काय करतो? आपण आपले संरक्षण कसे करतो?
प्रथम, सारे जागे होतो. तरुण
आळीपाळीने रात्रीचे पहारे बसवून मोहल्ल्यांवाड्यांतून देखरेख ठेवू लागतात.
गावातल्या बाया मिरचीपूड घेऊन सज्ज रहातात.
आपल्याला अशाच प्रकारचा जागता
पहारा ठेवणं आवश्यक आहे. कारण हे चोर वेगवेगळ्या वेषांत येतात. उदाहरणार्थ ते
मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने येतात. खोट्या बातम्या पसरवतात. आरत्या
किंवा स्तोत्रे म्हणण्याचा घाट घालतात. कुठलातरी भावनिक प्रश्न गळाला लावून
संपूर्ण समाजाला जाळ्यात ओढतात. यातून सुटकेचा एकच मार्ग आहे. त्यांचे कारस्थान
उघडे पाडायचे. या साठी सतत सावधगिरी बाळगावी लागेल. शिवाय, निदान आता तरी,
शहाणपणाचे बोल ऐकवू शकणाऱ्या लोकांनी मागे न हटता बोलले पाहिजे.
प्रेम, सहिष्णुता, न्याय या
शब्दांचा गजर समाजातून वाढला पाहिजे.
४- या पार्श्वभूमीवर
धर्मांतर-बंदी कायद्याचा अर्थ
अलिकडेच कर्नाटक सरकारने ‘कर्नाटक धार्मिक स्वातंत्र्य रक्षणाचे विधेयक २०२१’
विधानसभेत मांडले आणि घाईघाईने संमतही केले. यासंबंधी अधिनियम जारी करण्यासाठी
कॅबिनेटची मान्यता घेऊन राज्यपालांकडूनही शिक्कामोर्तब करून घेतले. आता हा कायदा
झाला आहे. धार्मिक स्वातंत्र्य रक्षण कायदा असेच त्याचे नाव आहे. पण कायद्याच्या
पोटात डोकावून पाहिलेत तर कळेल की हा कायदा धर्मांतराविरुद्ध विविध प्रकारचे मोडते
घालणारा कायदा आहे. या कायद्यात धार्मिक स्वातंत्र्याची छोटीशी झुळूकही नाही, हक्क
किंवा कसलेही संरक्षण नाही. स्वातंत्र्य हा शब्द वापरला असला तरी प्रत्यक्षात
धर्मस्वातंत्र्याचा हक्क पायदळी तुडवणाराच हा कायदा आहे. त्यामुळे लोकांनी आपोआपच
त्याला धर्मांतर विरोधी कायदा म्हणण्यास सुरुवात केली आहे, आणि तोच खराखुरा उद्देश
या कायद्यामागे आहे! भारताच्या इतिहासात आजवर कुठल्याही
राजाने किंवा सम्राटाने धर्मांतर थांबवण्यासाठी कायदा केला नव्हता. सर्व प्रकारचे
पंथ, विचारधारा, आध्यात्मिक प्रयोगांना स्वीकारणारी ही भारतभूमी आहे. हीच भारतीय
संस्कृती आहे. हा भारताचा वारसा आहे. हेच भारतीयत्व आहे. इतिहासकार म्हणतात ‘युद्धांचा अंत विवाहात होतो.’ भारतीय पौराणिक
कथांतूनही देव आणि देवी यांची युद्धे होतात, हारजीत होते आणि मग ते एकमेकांशी
विवाह करून एकत्र येतात. पण हे तथाकथित भक्तीप्रवण लोक मात्र असहिष्णुतेच्या,
द्वेषाच्या, जातीयवादाच्या आणि जन्मतःच बालकांचे वर्गीकरण करून त्यांना तसेच
आयुष्य काढण्यासाठी भाग पाडणाऱ्या अपमानास्पद पद्धतींचे उदात्तीकरण करणाऱ्या
वातावरणातच अडकून आहेत. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले भाजप सरकार आपल्या बगलेत
रास्वसंघाच्या छुप्या महत्त्वाकांक्षाच सांभाळत आहे आणि चातुर्वर्ण्याचे
पुनरुज्जीवन करण्याची त्यांची मनीषा पूर्ण करण्यासाठी देशाला भूतकाळाकडे घेऊन जात
आहेत. आपल्या अंधाऱ्या भूतकाळाकडे देशाला पुन्हा परत नेण्याचेच हे कारस्थान आहे.
धर्मासंबंधी काहीही चर्चा करण्याची इच्छा असलेल्या कुणालाही ते अशक्य होईल इतके
अडथळे हे सरकार आणते. आणि हे सोंग धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या
नावाखाली चालते. सप्तसागरांचे पाणी पिण्याचा प्रयत्न जेवढा अवघड असेल तेवढाच
धर्मांतराचा प्रयत्न आज अवघड करून ठेवला गेला आहे. ज्यांना धर्मांतर करायचे असेल
अशा व्यक्तींना तीस दिवस आधी फॉर्म-१ भरून कलेक्टरकडे देऊन आपली इच्छा जाहीर करावी
लागते. तसेच ज्या धर्मात जायचे त्या धर्माच्या पुरोहितांनाही फॉर्म-२ भरून त्यांचा
हेतू जाहीर करणे भाग आहे. त्यानंतर यावरच्या हरकती मागवल्या जातात. कुणीही
शेजारीपाजारी, सहकारी, नातेवाईक यावर हरकत घेऊ शकतात! हा काय
नादानपणा आहे? धर्मांतर जर जबरदस्तीने होत असेल किंवा आमिष
देऊन होत असेल तर त्यावर हरकत फक्त जिचे धर्मांतर होणार ती व्यक्तीच घेऊ शकते ना?
सरकारने लोकांच्या आयुष्यात असली फालतू, अनावश्यक ढवळाढवळ का करावी?
शिवाय धर्मांतराचे विधी करणाऱ्या व्यक्तींना केवढी कठोर शिक्षा होते
ते पाहिले तर यापुढे कुणीही धर्मांतराचे विधी करणार नाही असे लक्षात येते. ऐच्छिक
धर्मांतरांनाही खोटेपणा करून हा जुलूम आहे, ही जबरदस्ती आहे, त्यांना लालूच दिली
होती, त्यांना जाळ्यात ओढण्यात आले असे सांगून
रंग देण्यात येतो. धर्मांतराचे विधी करणारांना तर शारीरिक छळालाही सामोरे
जावे लागल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. मग ज्यांना स्वेच्छेने धर्मांतर करायचे
आहे ते काय करतील? कदाचित एकच मार्ग उरला आहे- फॉर्म १
भरल्यानंतर उपरोधाने राज्यशासनालाच विनंती करून धर्मांतराचा मार्ग सुकर करण्याची
विनंती करणे. गतीमंद किंवा मतीमंदांचे धर्मांतर किंवा लहान मुलांचे धर्मांत
करण्यावर अशा प्रकारे बंधने असणे गरजेचे अवश्य आहे कारण त्यांच्याकडे आवश्यक ती
निर्णयक्षमता नसते. पण स्त्रिया किंवा दलित जातींतील व्यक्तींनी धर्मांतराची इच्छा
व्यक्त केली असेल तर या कायद्यामुळे त्यांचा आत्मसन्मानच धोक्यात येऊ शकतो. या
कायद्यात स्त्रिया, दलित, निर्णयक्षमता नसलेल्या मतीमंद व्यक्ती, आणि लहान मुले
यांना एकाच मापात मोजले गेले आहे. स्त्रिया आणि दलित यांचे धर्मांतरण करण्यासाठी
विधी करणाऱ्या लोकांसाठी या कायद्यात कठोर शिक्षा योजून ठेवल्या आहेत. म्हणजे
स्त्रिया आणि दलित हे मतीमंद असल्याचे गृहीत धरले गेले आहे का? की त्यांच्यात निर्णयक्षमता नसते असे गृहीत धरले आहे? सरकारची समज तरी नेमकी काय आहे? सरकारने असे गृहीत
धरले आहे की स्त्रिया आणि दलित निर्बुद्ध असतात, त्यांच्याकडे निर्णयक्षमताच
नसल्यामुळे त्यांना स्वकल्याणाचे निर्णय घेता येत नाहीत.
पण असा कायदा करणाऱ्या सरकारने
एकच गोष्ट लक्षात ठेवावी, त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांत बहुसंख्येने स्त्रिया
आणि दलित होते. पण या कृतघ्न लोकांनी काय केले? आपल्याच
मतदारांच्या बाबतीत त्यांनी भेदभाव करायला सुरुवात केली आणि त्यांना दुय्यम
दर्जाचे नागरिक असल्यासारखी अपमानास्पद वागणूक दिली.
स्त्रिया आणि दलित दोघांनाही
हा डाग, हा अपमान धुवून काढायला हवा. या लोकांना येत्या निवडणुकीत त्यांना पूर्णतः
निपटून काढायला हवे. असल्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवायचा तर स्वतः विचार करून,
स्वतःच निर्णय घ्यायला लागले पाहिजे. या मठ्ठ लोकप्रतिनिधींच्या डोक्यांत प्रकाश
पाडावा लागेल. स्त्रिया आणि दलितांनी जागे होऊन विधानसभेत काहीही विचार न करता,
चर्चा होऊ न देता कायदा संमत करण्यासाठी हात वर करणाऱ्या लोकप्रतिनिधींना जाब
विचारणे गरजेचे आहे. आणि खरोखर सरकार या बाबत काय करीत आहे? हे लोक धार्मिक स्वातंत्र्याच्या बाता मारतात आणि कृतीतून धर्मांतरावर
बंदी आणतात- आणि एकाच घावात संविधानाने
दिलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याला लंगडे करून ठेवतात. स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीला
स्मरून कोणताही धर्म स्वीकारणे, पाळणे आणि त्याचा प्रसार करणे हा आपला घटनादत्त
अधिकार त्यांनी चिरडून टाकला आहे. शिवाय स्त्रिया आणि दलित यांना दुय्यम दर्जा
देऊन त्यांचा अवमान केला आहे! या सर्वाचा थोडक्यात अर्थ आणखी
एका उदाहरणाने स्पष्ट करतो. धर्मांतर बंदीच्या विषयासंबंधी विधानसभेत एक फार्स
झाला. होसदुर्गच्या भाजप आमदार गुळीहाट्टी शेखर- यांची कीर्ती अंगावरचे कपडे काढून
टाकण्यासंदर्भात पसरली होती, शिवाय यांनी स्वतःच्या आईचा ख्रिस्ती धर्मप्रवेश स्वतःच
वर्णिला होता. यांची आई ख्रिस्ताच्या धर्माकडे का आकर्षित झाली हा प्रश्न कुणालाही
विचारावासा वाटत नाही. कदाचित् गुळीहाट्टी शेखर यांच्यासारखा पुत्र लाभल्याची
निराशाच त्यांना ख्रिस्ताची ओढ लावून गेली असावी की काय?
तिचा कुणी विचारच करत नाही! मग या स्त्रीला स्वतःच्या
सदसद्विवेकबुद्धीला स्मरून कोणताही धर्म स्वीकारण्याचा, पाळण्याचा आणि त्याचा
प्रसार करण्याचा घटनादत्त अधिकार होता की नव्हता? एकाही
आमदाराने यावर विचार केला नाही. मनूने सांगितलेल्या धर्माचा दुर्गंध या संपूर्ण
प्रकरणाला येतो. स्त्री ही आधी वडिलांची, मग पतीची आणि वैधव्य आल्यानंतर मग
पुत्राची अंकित असते असे सांगणारा मनूचा धर्म. एकंदरीत या सर्व प्रकरणात
संविधानावर घाव घातले गेले आणि मनूच्या धर्मातील तत्त्वे कशी थोर आहेत हेच
ठसवण्याचा प्रयत्न झाला.
आर्थिकदृष्ट्या दुर्बळ
घटकांसाठी आरक्षण देण्याचा प्रकारही असाच संविधानावर हल्ला चढवणारा आणि मनूधर्माची
पाठराखण करणारा आहे. आरक्षण आणि कल्याणकारी कृती या मागे सामाजिक न्यायाची
संकल्पना आहे. शैक्षणिक स्थान, सामाजिक प्रतिष्ठा आणि शिक्षण-नोकरी यात काहीही
स्थान नसणे या सर्व प्रकारच्या तफावती भरून काढण्यासाठी हे मार्ग शोधले गेले. यात
न्यायाची आशा होती. यात एक कणखर कृती होती. संघभाजपचा एकात्मिक चेहरा असलेल्या पंतप्रधान
मोदी यांनी एका फटक्यात १० % आरक्षण हे आर्थिकदृष्ट्या
दुर्बळ गटांना देऊन टाकले. त्यामुळे आधीची सामाजिक न्यायाच्या जाणीवेतून आलेली
आरक्षणाची संकल्पना हरवली. त्यातील बळ गेले.
थोडं मागे जाऊन पाहिलं तर
लक्षात येईल की रास्वसंघाने मंडल आयोगाच्या मागास जातींना आरक्षण देण्याच्या
शिफारसींवरून वेगवेगळ्या गटांना भडकवण्याचे आणि हिंसक आंदोलने आयोजित करण्याचे काम
जोरात केले होते. या आंदोलनात एका आंदोलकाचा मृत्यूही झाला होता. या
पार्श्वभूमीवर, मोदींनी पंतप्रधान होताच आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गटांना आरक्षण दिले
आणि संविधानावर पहिला वार केला. संविधानाला शक्तीहीन, परिणामहीन करण्याचा त्यांचा
अंतस्थ हेतू आहे. त्यामुळेच सामाजिकदृष्ट्या तुलनात्मक फायदे मिळणाऱ्या गटाचे प्रमाण
लोकसंख्येच्या ५% असूनही, त्यांच्याकडे सर्वाधिक
प्रमाणात नोकऱ्या, शिक्षणाच्या संधी असूनही त्यांना १०% आरक्षण
देण्यात आले, आणि आता ते शर्यतीत अधिक पुढे जाऊ शकतील. मनूधर्माच्या शिकवणीशी
एकनिष्ठ असणारांना साजेसेच हे नवे आरक्षण आहे- वरच्या वर्णांना अधिक संधी मिळणे
गरजेचे आहे ही ती निष्ठा! एकंदरीत मनूचा धर्म व्यवहारात
रुळवणे हा कार्यक्रम आहे. रास्वसंघाने वातावरणात विष कालवले आहेच, त्यामुळे
त्यांनी केलेले कायदे अन्याय्य आहेत असे म्हणणाऱ्या सर्वांना रास्वसंघाचे अपशकुनी
कावळे देशद्रोही ठरवू लागतील. भारतावरची आपत्ती ही या प्रकारची आहे.
(मूळ कन्नडमध्ये
रास्वसंघाच्या अपशकुनी कावळ्यांना ‘कुगुमारीस’ हा शब्द वापरला आहे. तेथील लोकरूढीत असे मानले जाते की कुणी कुगुमारीस
घरासमोर आला आणि कुणी त्याला ‘ओ’ अशी
हाक मारली किंवा ‘कुणी बोलावलं?’ असं
विचारलं तर विचारणाऱ्याचा रक्तपात होऊन मृत्यू होतो. त्यामुळे त्याला प्रतिसाद
म्हणून दारादारावर उद्या या- ‘नाळे बा’ असं लिहून ठेवलेलं असतं.)
५- आता...
मग आता आपण काय करायला हवे? सुरुवात म्हणून आपण काय घडते आहे ते लक्षात घेऊ. आश्चर्य वाटण्यासारखे
आहे सारे! रास्वसंघ आणि त्याची अगणित पिलावळ अतिशय एकदिलाने,
एकवाक्यतेने विषमता, भेदभावावर आधारित समाजरचना होण्यासाठी काम करीत आहे. यातून
आपल्याला काय समजून घ्यायचे आहे? खरेतर यात खोलवर समजून
घ्यावे असे काहीच नाही. भूतकाळात जमा झालेल्या प्राचीन श्रद्धा आणि परंपरा,
म्हणजेच चातुर्वर्ण्यावर आधारित समाजरचना, मनूच्या धर्मशास्त्रानुसार झालेले कायदे
आणि आर्य वंशाच्या श्रेष्ठत्वाचा पुकारा करत आधुनिक भारताच्या संविधानावर घाव
घालणे हीच त्यांची कल्पना आहे. या तीन वाकड्या चालीच्या श्रद्धा हाच रास्वसंघाचा
श्वास आहे. म्हणूनच ते आपल्या बुद्धीलाच नष्ट करू पाहातात. गोळवलकरांच्या
मांडणीतून बुद्धी वापरू नका, निवड करण्याचा आग्रह धरू नका हा स्पष्ट संदेश
वेळोवेळी दिला गेला आहे. अविवेकी श्रद्धा मान्य करणारी ही अविचारी संघटना कधीही
कुठल्याही विवेकी प्रश्नाचे उत्तर देत नाही. संमोहित झालेल्या दोन पायांच्या
मेंढ्यांचा कळप जसा वरच्यांनी दिलेल्या आदेशांनुसार चालत असावा तशाच त्यांच्या
हालचाली असतात. आणि दुसऱ्या बाजूस काय आहे? दुसरीकडे आहे
समाजाला पुढे घेऊन जाणाऱ्या विचारधारांची कास धरण्याचा पर्याय. दुसरीकडे आहे
विवेकविचार, प्रत्येक गोष्ट सत्य आहे की नाही तपासून मगच त्यावर विश्वास ठेवण्याची
सवय. यातूनच नवीन कल्पना स्फुरतात. पण अशा प्रकारे वेगळा विचार करणाऱ्या, वेगळ्या
दिशेने जाऊ पाहाणाऱ्या संघटनांमध्ये नेहमीच मतभिन्नता असते, एकवाक्यता नसते. पण
आजच्या संकटकाळात, रास्वसंघ आणि परिवार बलाढ्य झाला असताना, आणि बाकी प्रस्थापित
असण्याचे फायदे मिळणाऱ्या संघटना दुबळ्या झालेल्या असताना इतर लहानमोठ्या
संघटनांवर अधिक जबाबदारी आहे. आपला समाज भूतकाळाच्या दलदलीत न फसू देता पुढे
न्यायचा असेल तर ही जबाबदारी लहानमोठ्या संस्था-संघटनांनी पेलायला हवी हे अत्यंत
निकडीचे आहे. या वाकड्या चालीच्या गटांच्या चेहऱ्यावरचे बुरखे फाडून फेकण्याचे काम
आपल्याला करावेच लागेल. चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करणारे, प्राचीन भारताचे गोडवे
गाणारे हे लोक स्वतःला जरी बहुसंख्यकांचे प्रतिनिधी म्हणवत असले तरीही प्रत्यक्षात
ते अल्पसंख्यच आहेत हे आपल्याला दाखवून द्यावे लागेल. त्यांचे खरे रंग उघडे पाडावे
लागतील.
स्वतंत्र विचार करणाऱ्या सर्व
संघटनांच्या नेत्यांनाही याचे भान बाळगावे लागेल. निदान आता तरी अशा सर्व पुरोगामी
संघटनांनी एकमेकांशी समन्वय साधला पाहिजे, आपापले छोटेसे प्रवाह सोडून नदीच्या
मोठ्या प्रवाहात सामील व्हायला पाहिजे. ब्राह्मणी श्रेष्ठत्वाची बाधा दूर करायला
हवी. उगाच फुगलेले अहंभाव टाकून द्यायला हवेत. एकाच ध्येयाकडे नेणाऱ्या विविध वाटा
असू शकतात हे विनयपूर्वक मान्य करायला हवे. आपलेच व्यक्तीमहात्म्य वाढवणारे
माजुर्डे नेतृत्व फेकून द्यावे लागेल. स्वतःच्या संघटनेचे महात्म्य वाढवण्याच्या
मागे लागून पोरकट, क्षुद्र हेवेदावे बंद करून आपल्याला एक व्यापक एकता साधायला
हवी... आपल्या संविधानातील तत्त्वांच्या रक्षणासाठी, आपल्या विविधतेचे संवर्धन
करण्यासाठी, भारताचा आत्मा असलेली संघराज्य कल्पना अक्षय रहावी, सर्व नागरिकांचा
सहभाग असलेली लोकशाही व्यवस्था टिकावी, सहिष्णु संस्कृती टिकावी, वाढावी, कुणाला
उच्चनीच न ठरवता सहजीवनासाठी पूरक असलेली समतेची तत्त्वे जगावी यासाठी हे आपल्याला
करावे लागेल. आपल्या समाजात न्याय रुजला पाहिजे, वाढला पाहिजे. विविध समाजांमधील
अभिसरणानेच आपल्याला नवजीवन मिळू शकते. सर्वांनीच याचे नवनवीन मार्ग शोधायला हवेत.
-सर्वप्रथन आपल्याला जागे व्हावे लागेल. रास्वसंघाच्या अपशकुनी कावळ्यांना आपल्या
बंद दारांतूनच स्पष्ट उत्तर मिळायला हवे. त्यांनी आपल्या दारावर चोचींनी टकटक केली
तर त्यांना प्रतिसादही न देता हाकलायला हवे. त्यांच्या कावकावीला प्रतिसाद दिला तर
आपली अधोगती ठरलेलीच आहे हे समजून घ्या. माणसांत एकी राहिली तर सैतानही दूर पळतो
हे लक्षात ठेवायला शिका. आज समाज इतक्या प्रमाणाबाहेर भंगला आहे. धर्माचे मुखवटे
चढवून दुष्टतेचा नंगा नाच सुरू आहे. विषमता हे काहीतरी मोठेच महत्त्वाचे धोरण
असल्याचा आव आणला जातो आहे.
आपल्या या भूमीवर चाललेले
ज्वाळांचे तांडव कधी थांबेल की नाही अशी शंका येऊ लागली आहे. ही राजवट आपल्याला
कुठल्या मुक्कामी घेऊन चालली आहे? सुरराजाची एक गोष्ट आहे. दारू पाजून त्याने आपल्यामागे अनुयायी गोळा
केले. त्याने त्यांना आपल्या राजवाड्यात दारू पिण्याचे आमंत्रण केले. नशेत चूर लोक
त्याच्या सत्तेला प्रश्न विचारू शकणार नाहीत, आपल्या समस्या विसरून आनंदात दारू
ढोसतील, त्याची स्तुती गातील आणि त्याच्या विरोधकांना रस्त्यात बदडून काढतील ही
त्याची अपेक्षा होती. पण दारू पिऊन झिंगलेल्या अनुयायांनी राजवाड्याबाहेर गेल्यानंतर
रस्त्यात गोंधळ घालायला सुरुवात केली. नशेत बेधुंद होऊन ते फिरू लागले. राजालाही
त्यांना थांबवता येईना. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी तो स्वतःच रस्त्यावर
उतरला. पण आता डोक्यात नशा गेलेले ते सारे अधिकच बेबंद झालेहोते आणि त्याच भरात
त्यांनी राजालाच बदडून काढत तुडवले! भेदभाव आणि दुही
माजवणाऱ्या व्यवस्थेत, कायदे पायदळी तुडवणाऱ्या राज्यात आपल्याकडेही हीच कथा घडू
शकते. हे आज होऊ शकते किंवा उद्याही. कारण अखेर द्वेषाचा, कट्टर धर्मांधतेचा शेवट
हा असाच होतो. पेरले ते उगवते त्यातलाच हा प्रकार असतो! द्वेष-मत्सराचा
अग्नी, अंधविश्वासांच्या ठिणग्या यातून साऱ्याचीच धूळधाण होते. एकदा पेट घेतल्यावर
काही काळ तो अग्नी पेटवणारांच्या मर्जीनुसार जाळत जातो पण काही काळानंतर तो
पेटवणारांचाही घास घेतो.
दुष्ट चेटक्याने जन्माला
घातलेला द्वेषाचा सैतान अखेर त्या चेटक्याचाच घास घेऊन समाधानाची ढेकर देणार आहे
हे नक्की. ही काही जादूची कहाणी नाही. हा तर अशा गोष्टींचा स्वाभाविक अंत आहे. आज
हे रास्वसंघाला लागू पडते आहे. पण फक्त त्यांनाच नाही, तर द्वेषाची बीजे पेरणाऱ्या
कुणालाही ते लागू पडत राहील. आपणही जर असेच केले तर आपलीही दशा तीच होईल.
हे लक्षात ठेवून पुढची वाटचाल
आपण एकोप्याने करू या.
No comments:
Post a Comment