Thursday, March 30, 2017

ऑपरेशन बेटी उठाओ

शोधवृत्तांत
नेहा दीक्षित
(आउटलुकसाठी)


शिक्षणाच्या हेतूने पळवलेल्या मुली’-  संघाची मोहीम

संघाने मुलांबाबतचा प्रत्येक कायदा डावलून ३१ आदिवासी मुलींना आसामातून पंजाब आणि गुजरातेत "हिंदू" बनवण्यासाठी धाडले... त्यांचे पालक असाहाय्य आहेत 


आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात 7 जून, 2015 रोजी म्हणजे बबिता गुजरातला निघण्या अगोदर दोनच दिवस मान्सूनचा दुसरा पाऊस झाला. त्यामुळे बामुनगंगाव भातिपरा गावात दोन गोष्टी झाल्या: बबिताच्या गावाला हिरवाळीने गच्च वेढले आणि त्यांच्या छोट्याशा मातीच्या झोपडीजवळच्या थेबा बासुमातारीच्या म्हणजे बबिताच्या वडिलांच्या तीन बीघा भातशेतीतील बिळांतून खान्गक्राय अलारी (खेकडे) बाहेर पडले. सहा वर्षाच्या बबिताला या लालबुंद, आठ पायांच्या खेकड्यांचे भारी आकर्षण. दर मान्सूनमध्ये खेकडे पकडून आईच्या जुन्या दोखनाने झाकलेल्या बांबूच्या टोपलीत घालण्यात ती तासनतास घालावीत असे. त्या संध्याकाळी  बबिताला खांगक्राय अलरीची आमटी हवी होती. "खेकडे पकडणं, साफ करणं आणि खाण्याजोगा भाग शिजवणं जिकिरीचं असतं. पण तरीही मी तिच्यासाठी केलं... नाहीतर कोण तिथे तिला ते करून घालणार?" तिची आई चंपा सांगते.  तिच्याशेजारी बसलेला थिबा म्हणतो, "आता नको आणखी काही बोलूस..." आणि डबडबलेल्या डोळ्यांनी तो उठून भिंतीजवळ जाऊन उभा राहतो.
९ जून २०१५ रोजी म्हणजे बबिताने खेकड्याची आमटी खाल्ल्याला दोन दिवस झाल्यानंतर ती आणि आणखी तीस आदिवासी मुली - वय वर्षे ३ ते ११ - यांना कोरोबी बासुमातारी आणि संध्याबेन तिकडे नामक "राष्ट्र सेवक समिती" आणि "सेवा भारती" या दोन संघ परिवाराशी संबंधित संस्थांच्या सदस्यांसोबत "गुजरात आणि पंजाब"मध्ये शिक्षणासाठी नेतोय असे सांगून ट्रेनमध्ये चढवण्यात आले.  या मुली कोक्राझार, गोलपारा, धुब्री, चिरांग आणि बोनगाईगाव या आसामातील सीमेलगतच्या पाच जिल्ह्यांतून आल्या होत्या. बबिताने जाऊन एक वर्ष झाले. मान्सून परत आला आणि खेकडेही परतले. मात्र अजूनही मुलींच्या पालकांचा मुलींशी संपर्क होऊ शकलेला नाही. 
या तीन महिन्याच्या काळात आऊटलूक साप्ताहिकाने संघ परिवाराद्वारे तीन-तीन  वर्षांच्या अशा एकतीस आदिवासी मुलींची आसामच्या आदिवासी भागातून पंजाब आणि गुजरात मध्ये तस्करी कशी केली जाते याचा पर्दाफाश करण्यासाठी सरकारी कागदपत्रांचा आधार घेतला.  त्या मुलांना आसामात परत आणण्यासाठी जारी करण्यात आलेल्या आदेशांना - जे आसाम राज्य बालक हक्क संरक्षण आयोग, बालकल्याण समिती, कोक्राझार, राज्य बालसंरक्षण सभा, आणि चाईल्डलाईन, दिल्ली आणि पतियाळा यांकडून आले होते - संघप्रणित संघटनांकडून पंजाब आणि गुजरात राज्य सरकारांच्या मदतीने हरताळ फासण्यात आला.  





भाग १

मुलांची तस्करी 

आदिवासींच्या श्रध्दांमधील चराचर सृष्टीत जीवन पाहाण्याच्या गुंतागुंतीच्या आदिम उपासना पद्धतींचे, संघाच्या अजेंड्याच्या वरवंट्याखाली सपाटीकरण करण्यात येत आहे.

माझं मूल कुठं आहे?
आधा हसदा आणि फूलमोनी, श्रीमुक्तीचे पालक 

 १ सप्टेंबर २०१० रोजी सुप्रीम कोर्टाने "अनाथालयातील मुलांचे शोषण, राज्य सरकार  वि. यू. ओ. आय आणि इतर" या खटल्यात मोठ्या संख्येने होणाऱ्या मुलांच्या राज्यांतर्गत वाहतुकीबाबत निकाल देताना म्हटले आहे: "आसाम आणि मणिपूर या राज्यांतील १२ वर्षांखालील किंवा प्राथमिक शाळेतील मुलांना पुढील आदेशांपर्येंत शिक्षणासाठी म्हणून इतर राज्यांत पाठवण्यास मनाई केली जात आहे." 
तामिळनाडूतील ख्रिश्चन मिशनरी "गृहां"त तस्करी करून नेल्या गेलेल्या ७६ आसामी आणि मणिपुरी अल्पवयीन मुलींबाबतच्या तपासानंतर हा आदेश देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतरही सी.आय.डीच्या अहवालानुसार २०१२ ते २०१५ दरम्यान आसामातून ५००० पेक्षा जास्त मुले नाहीशी झाली आहेत आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते हा आकडा शिक्षण आणि नोकरीच्या नावाखाली तस्करी झालेल्या मुलांचा असावा. यांपैकी ८०० मुले २०१५ साली नाहीशी झाली.
"मला माझ्या मुलीला इतक्या लांबवर पाठ्वायचंच नव्हतं. ती आजारी पडली तर? तिला माझी गरज भासली तर? तिला शोधायला मी कुठं जाऊ? पण या माणसानं मला तसं करायची बळजबरी केली." रागाने ताम्बारलेल्या डोळ्यांनी आधा हसदा सांगतो. मंगल मार्दी हा त्याचा शेजारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आधा हासदाच्या घराच्या शेणाने सारवलेल्या लहानश्या तुकड्याभोवतीच्या काटेरी तारांच्या कुंपणापाशी उभा राहिला. कोक्राझार जिल्ह्यातील गोसाईगाव नगरातील बाशबारी गावातील रास्वसंघाचे विधायक कार्य दाखवण्यासाठीच त्याने मला आधाला भेटायला आणले होते. आधाच्या या अनपेक्षित उद्रेकाने तो स्तिमित झाला होता. त्याने आसामीमध्ये काहीतरी म्हटले परंतु आधा अविचल होता. 
"मग मला सांग ना श्रीमुक्ती कुठं आहे? सांग मला! तू तिला पाठवलंस!" आधाला रडू कोसळते. त्याची पत्नी फूलमणी त्याची समजूत काढते.
"मग आता तुम्ही उरलेली तीन मुलंही श्रीमुक्तीप्रमाणेच पाठवणार का?" मी विचारते. "नाही." तो रागाने उत्तरतो, "त्यांनी मला पैसे दिले तरी नाही." मंगल या संभाषणावर केवळ हसतो, घराच्या खांबाशी रेलून त्याच्या हातातील स्मार्टफोनशी चाळा करीत राहतो. 
आधा हा संथाळ जमातीचा भूमिहीन शेतमजूर दिवसाला २०० रुपये मिळवतो. तो ३० वर्षांचा आहे पण दिसतो मात्र बराच म्हातारा. त्याला चार मुले आहेत. त्याची सहा वर्षाची मुलगी श्रीमुक्ती ही त्या तस्करी केलेल्या ३१ मुलांपैकी एक. 
"पण तुम्ही तिला पाठवलीतच का?" मी विचारते. 
"कारण २००८ सालच्या दंगलीनंतर माझे घर पुन्हा बांधायला त्याने मला मदत केलेली म्हणून." आधा सांगतो. त्या वर्षी बोडो-आदिवासी संघर्षात त्याचे घर नष्ट झाले होते. त्याला एक महिनाभर मदतशिबिरात राहावे लागले होते. त्यानंतर मंगल रास्वसंघाचा कार्यकर्ता म्हणून पुढे आला. 
"तू अशी तक्रार करतो आहेस जसं काही मी माझ्याच फायद्यासाठी हे केलं," मंगल म्हणतो. "ती अभ्यासासाठी गेली आहे. माझीही मुलगी गेली आहे."
"मग तू तुझ्या पोरीशी दररोज कसा काय बोलतोस आणि मी आता वर्षभर माझ्या मुलीशी बोलू शकलो नाही हे कसं?" आधा उत्तरतो. "कुणास ठाऊक ती शाळेत तरी आहे का नाही!"
"याला वेड लागलं आहे." नाराज झालेला मंगल म्हणतो आणि मला आपल्यासोबत येण्याचा इशारा करतो. "तुम्ही माझ्यासोबत या."
आधा आणि मंगलच्या मुली, श्रीमुक्ती आणि राणी, दोघीही सहा वर्षाच्या, या गेल्या वर्षी गुजरातमध्ये एका शाळेत शिकण्यासाठी म्हणून गेल्या.
"त्याने मला सांगितले दोघीही एकत्र असतील. पण आता तो सांगतो श्रीमुक्ती पंजाब मध्ये आहे आणि पुढील चार वर्षे तरी येणार नाही." आधा सांगतो. "पालकांना आपल्या मुलांना भेटू न देणारं हे कसलं शिक्षण आहे?" 
आता फूलमणीही म्हणते, "आता आम्ही कोणाला विचारावं? ती एक दिवस परत येईल असं मंगलचं तोंडी आश्वासन तेवढंच आमच्यापाशी आहे."
मंगलचे घर आधा हासदाच्या घराच्या दहापट तरी मोठे आहे. मोठं कंपाउंड आहे, ओळीने लावलेली झाडे आहेत, बऱ्याच खोल्या आहेत, प्रवेशद्वाराच्या डावीकडे पिवळ्या कट्ट्याच्या तुळशीसोबत एक मंदिरही आहे. सज्जाच्या भिंतीवर श्रीरामाचे चकचकीत पोस्टर आहे. 
भगवा टिळा लावलेला, मनगटावर पवित्र लाल धागा बांधलेला मंगल पांढरी बंडी आणि धोतर अशा वेषात त्या पोस्टरखाली बसतो. त्याच्या घामेजलेल्या कपाळावर पडलेल्या आठ्या तो आधाच्या उद्रेकामुळे रागावला आहे हेच दाखवतात. मी आत येताना तो त्याच्या फोनवर चोरून माझा फोटो घेऊ पाहतो. मी  त्याला पकडते आणि पोज देऊ पाहते. दचकून तो म्हणतो, "आतापर्यंत चारवेळा असे लोक आले भेटी द्यायला- मुलींची चौकशी करण्यासाठी. काय चाललंय कळत नाही."  
***

१६ जून २०१५ रोजी, मुलींना घेऊन गेल्यानंतर आठवडाभरात आसाम राज्य बालहक्क संरक्षण समितीने(ASCPCR) आसाम पोलिसांना, सीआय़डीला आणि एडीजीपीला
पत्रे लिहिली आणि बालहक्क संरक्षण समितीच्या राष्ट्रीय आयोगालाही प्रत पाठवली. अल्पवयीन मुलांच्या न्याय्य हक्कांसंबंधीच्या २००० सालच्या कायद्याचा भंग झाला असल्याचे आणि यातून लहान मुलांची तस्करी झाल्याचे त्यात म्हटले होते. समितीने पोलिसांना यात योग्य ते लक्ष घालून या एकतीस बालिकांना पुन्हा आसाममध्ये परत आणवून पालकांची पुनर्भेट करून द्यावी अशा सूचना दिल्या. सूचना मिळाल्यापासून पाच दिवसांत कारवाई झाल्याचा अहवाल पाठवावा अशीही सूचना होती. पण काहीही कारवाई झाली नाही, काहीही अहवाल देण्यात आला नाही. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आय़ोगाने पत्राची दखलही घेतली नाही कारण आयोग भाजपशासित केंद्रसरकारच्या हाताखाली काम करीत होता. आसाम राज्य समितीचे पत्र पोलीस आणि इतर शासकीय यंत्रणांकडे गेल्यावर कोक्राझारच्या बालकल्याण समितीच्या सदस्यांनी या अपहृत मुलींच्या पालकांच्या घरी बरेचदा भेटी दिल्या.
या समित्यांची स्थापना राज्य शासनाने बाल-न्याय- बालसंरक्षण आणि संवर्धन कायद्यानुसार केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील बालकल्याण समितीला न्यायदंडाधिकाऱ्यांचे किंवा अव्वल न्यायदंडाधिकाऱ्यांचे अधिकार असतात. एखाद्या मुलासाठी लोकांना जबाबदार ठरवण्याचे अधिकार त्यांच्याकडे असतात. एखादा खटला मुलांच्या घराजवळील बालकल्याणसमितीकडे ते वळवू शकतात. मुलांना पुन्हा घरी पाठवणे, पालकांशी पुनर्भेट घडवणे यासाठी काम करतात. समितीसमोर किंवा एखाद्या सदस्यासमोर, पोलिसांसमोर, सरकारी नोकरांसमोर, सामाजिक कार्यकर्त्यांसमोर किंवा सुजाण नागरिकांसमोर मुलांना आणले जाते. एखादे मूल स्वतःहूनही त्यांना भेटू शकते. अशा मुलांबद्दलचे नियमित अहवाल देण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर असते. मुलांची सुरक्षिततला आणि कल्याण यांचा विचार करून मुलांचे पालक किंवा दत्तक पालक यांच्याकडे त्यांना सोपवायचे की नाही याचा निर्णय या समित्या करतात. किंवा मग त्यांच्यासाठी दुसरा निवारा शोधतात, संस्थेत ठेवतात. प्रकरणाचा अंतिम निर्णय मूल समोर आल्यापासून चार महिन्यांच्या आत व्हावा असा निययम आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या २०१०मधील मार्गदर्शक तत्वांनुसार शिक्षण किंवा कोणत्याही कारणासाठी आसाम, मणिपूर येथील कोणत्याही बालकास राज्याबाहेर नेण्यात येऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. पण याचा भंग करून सेवा भारती, विद्या बारती आणि राष्ट्र सेविका समिती यांनी बाल न्याय कायद्याचाही भंग केला आहे. या मुलींना आसामातून बाहेर- पंजाब किंवा गुजरातला नेण्याआधी बालकल्याण समितीसमोर हजर करायला हवे होते आणि त्यांचे ना हरकत प्रमाणपत्रही घ्यायला हवे होते. हे करण्यात आलेले नाही.
२२ जून २०१५ रोजी मलया डेका, या कोक्राझार बालकल्याण समितीच्या अध्यक्षांनी गुजरातच्या सुरेंद्रनगर बालकल्याण समितीच्या अध्यक्षांना विनंतीपत्र लिहिले.
आसाममधून आलेल्या बालिकांचा हलवद,सुरेंद्रनगर येथील सरस्वती शिशु मंदिरमधून परत पाठवण्यासंबंधी विनंती करणारे हे पत्र म्हणते, या मुलींचे लहान वय आणि पालकांपासून दूर रहाण्यात त्यांना होणारा मानसिक त्रास लक्षात घेतला पाहिजे. त्यांच्या हक्कांचे आणि बाल-न्याय कायद्याच्या अर्थाचेच यात उल्लंघन होते. या मुलींना गुवाहाटीला परत आणणे आपणास सोयीचे ठरेल, तेथून येथील बालकल्याण समितीच्या यंत्रणेतून त्यांना कोक्राझार येथील त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेऊ.
पण सेवा भारती आणि राष्ट्र सेविका समितीच्या लोकांनी यातून एक पळवाट काढली. त्यांनी मुलींच्या पालकांकडून एका प्रतिज्ञापत्रावर सह्या घेतल्या. मुली नेल्यानंतर एक महिन्यानंतर हे प्रतिज्ञापत्र घेतले गेले. या ३१ प्रतिज्ञापत्रांत रास्वसंघाशी संबंधित शिक्षिका मंगलाबेन हरिशभाई रावळ, कन्याछात्रालय/ विद्याभारती संलग्न सरस्वती शिशुमंदिर, सुरेन्द्रनगर, गुजरात यांना मुलींना शिक्षणासाठी नेण्यासाठी अनुमती देण्यात आली होती. आउटलुककडे या प्रतिज्ञापत्रांच्या प्रति आहेत- सारी प्रतिज्ञापत्रे इंग्रजीत आहेत. सारख्याच मजकुराची आहेत. त्यांवर इंग्रजीत सह्या आहेत. आउटलुकने ज्यांची भेट घेतली ते बहुतेक पालक एकतर निरक्षर आहेत किंवा इंग्रजी न येणारे तर नक्कीच आहेत. या पालकांच्या प्रतिज्ञापत्रांचा मसुदा पुढील प्रमाणे-
१-   मी शेतकरी आहे आणि दंगलग्रस्त आहे.
२-   २५ जानेवारी २०१४च्या दंगलीत माझ्या घराचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.
३-   मी अजूनही निर्वासित निवारा छावणीत रहातो.
४-   माझ्याकडे उत्पन्नाचे साधन नाही.
५-   माझ्या मुलीचे शिक्षण करण्यासाठी फीचे पैसे मजजवळ नाहीत.
६-   त्यामुळे चांगल्या शिक्षणासाठी मी स्वखुषीने माझ्या मुलीला गुजरातला शिक्षणासाठी पाठवीत आहे.
कोक्राझारच्या बालकल्याण समितीच्या मलया देका म्हणतात, हाच कायद्याचा भंग आङे. मुलांना नेण्यापूर्वी ही प्रतिज्ञापत्रे व्हायला हवी होती. नेल्यानंतर एक महिन्याने नव्हे. कोक्राझारच्या समितीने या सर्व मुलींच्या पालकांकडे प्रतिज्ञापत्रांतील तपशीलांची छाननी करण्यासाठी भेट दिली. त्यांना हेच कळले की यातील कुणीही २०१४च्या दंगलीत सापडले नव्हते की कुणीही निर्वासित निवारा छावण्यांमध्ये रहात नव्हते. शिवाय, त्यातील बहुतेकांकडे जमीन होती आणि उत्पन्नाचे साधनही होते. सर्वात मोठे असत्य तर हेच होते की या प्रतिज्ञापत्रात उल्लेख केलेल्या जानेवारी २०१४च्या बोडो-आदिवासी दंगली डिसेंबर २०१४मध्ये झालेल्या.
त्या पुढे म्हणाला, फेब्रुवारी २०१६मध्ये बालकल्याण समितीच्या एका अधिकाऱ्याला मंगल मार्दीने शारीरिक दुखापत करण्याची धमकी दिली होती. पुन्हा येऊन त्या मुलांची आणि पालकांची चौकशी करताना दिसलात तर बदडून काढू असं तो म्हणाला होता. मंगलविरुध्द आणि आणखी काहीजणांविरुध्द कोक्राझारच्या गोसाईगाव पोलिस ठाण्यात एफआरआय दाखल करण्यात आला. या प्रतिज्ञापत्रांतील तपशील खोटे असल्याचे चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितले. मार्च २०१६मध्ये मलयाने गुवाहाटी उच्च न्यायालयास पत्र लिहिले आणि न्यायमूर्तींना, सत्र न्यायालयाच्या दंडाधिकाऱ्यांना या खोट्या प्रतिज्ञापत्रांबाबत कारवाई करण्याची विनंती केली. काहीही प्रतिसाद मिळाला नाही.
***
कुणी हिंदूंनी हिंदुत्वसंघटनेकडे आपली मुले पाठवली तर हरकत काय आहे?” मंगल मला विचारतो.
पण सगळे आदिवासी हिंदू नसतात. मी उत्तरते.
परंपरेने संथाळ लोक मरांग बुरू (किंवा बोंगा)ची सर्वात मोठा देव म्हणून पूजा करतात आणि त्यांच्या श्रध्दांनुसार जगातील विविध कामे चालवण्यासाठी आत्म्यांचा दरबार भरतो. संपूर्ण वर्षभर त्यांच्या वेगवेगळ्या पारंपारिक पूजा चालतात त्या शेतीशी संबंधित असतात. शिवाय जन्म, विवाहाच्या रूढी वेगळ्या असतात. मृत्यूनंतर दफन केले जाते. ते दिव्यात्म्यांसाठी आहुती देतात- शक्यतो पक्ष्यांची आहुती दिली जाते.
पण मंगलची कारणं तयार आहेत. हिंदु हा काही तसा धर्म नाही. तो सांगतो, देवावर विश्वास असलेला प्रत्येकजण हिंदूच अशतो. साऱ्या जगात सुरुवातीला फक्त हिंदूच होते.
विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया २२ डिसेंबर २०१४ रोजी भोपाळ येथे अगदी हेच म्हणालेले. देशातील हिंदूंची लोकसंख्या ८२ टक्केवरून १०० टक्केवर आणायला विहिंप काय वाटेल ते करायला तयार आहे आहे असेही त्यांनी सांगितले होते.
कोक्राझारमध्ये गेली १९ वर्षे काम करणारे फूलेन्द्र दत्त नावाचे संघ स्वयंसेवक जे मला सांगत होते तेच मंगलही सांगत होता.- संघ आदिवासींना सांगतो की जो कोणी सूर्य, वृक्ष, वारा आणि निसर्गाची पूजा करतो तो हिंदू. आदिवासींच्या चराचर सृष्टीच्या पूजेची आदिम, गुंतागुंतीची श्रध्दाप्रणाली संघाच्या अजेंड्याच्या वरवंट्याखाली भुईसपाट केली जाते आहे. दत्त मला सांगत होते, की आम्ही संताळांना आणि इतर आदिवासींना सांगतो की हिंदुत्व मान्य करण्यासाठी फक्त तुळस लावणे आवश्यक आहे.मी मंगलला विचारते, तो कोणत्या देवांबद्दल बोलतो आहे आणि तो उत्तरतो, राम, दुर्गा, हनुमान, शिव, तुळस आणि भारतमाता
तुझा कोणत्या देवांवर विश्वास आहे?”
माझा रामावर विश्वास आहे. पण बोडोंचा शिवावर विश्वास आहे. म्हणून बोडो आणि आदिवासींच्यात फरक आहे.
खरे पाहाता, बोडोंचा मूळ धर्म आहे बाथौ, यात कोणतेही पवित्र धार्मिक ग्रंथ नाहीत किंवा देवळेही नाहीत. बोडो भाषेत बाथौचा अर्थ आहे पंच तत्वे- बार- हवा, सान- सूर्य, हा- पृथ्वी, ओर- अग्नी आणि ओख्रांग- आकाश. त्यांची मुख्य देवता आहे बाथौब्वराय (ब्वराय म्हणे- ज्येष्ठ), ही सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वशक्तीमान आहे. आणि ही पाच तत्वे म्हणजे तिची निर्मिती.

पण संघाने बोडो आणि आदिवासींमधे अगदी नव्याने, आपल्या उद्दिष्टांना समर्पक ठरेल अशी आखीव विभागणी केली आहे. बोडो आणि संथाळ आणि आसाममधले मुंडा यांच्यातील दशकभरापासूनची तेढ बोडोंना अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाल्यामुळे वाढत गेली. संथाळ आणि मुंडांना झारखंड, ओरिसा, बिहार आणि प. बंगालमध्ये अनुसूचित दर्जा असला तरी आसाममध्ये तो नाही. यावरचे स्पष्टीकरण असे आहे की वसाहतकाळात त्यांना इथे चहाच्या मळ्यांत कामाला आणले होते, त्यामुळे त्यांना एतद्देशीय दर्जा देण्यात आला नाही.
गेली वीस वर्षे बालतस्करीच्या प्रकरणात काम करून मुलांची आणि पालकांची भेट घडवून देण्याचेच काम करणारा एक कार्यकर्ता म्हणतो, दोन्ही जमातींना संघाच्या पंखाखाली घेण्यासाठी संघाने फार सोयिस्कर विभाजन केले आहे. बोडो हे शैव आहेत आणि आदिवासी वैष्णव आहेत. त्यांना हिंदू म्हणून एकत्रही आणता येते आणि त्यांची जुनी दुश्मनी मुरवायलाही वाव रहातो.
मंगलला सर्व प्रश्नांची उत्तरे पाठ आहेत. तू केव्हापासून संघाबरोबर- हिंदुत्ववादी संघटनेबरोबर काम करू लागलास?” मी विचारलं.
सगळे हिंदू आपोआपच त्याचा भाग आहेत. पण मी २००३मध्ये सक्रीय झालो. वीरेन्द्र लष्कर म्हणजे संघाचे कोक्राझार जिल्हा प्रचारक आम्हाला भेटले आणि त्यांनी सारे नीट समाजावून सांगितले- तेव्हापासून.
सक्रीय सदस्य म्हणून तू कायकाय करतोस?”
लोक संस्कार, परंपरा, रूढी आणि कर्तव्य सारं विसरलेत. आता प्रत्येक घरात देव्हारा हवा, तुळशीचं रोप हवं. मी त्यांना त्यांच्या हिंदू असण्याची जाणीव करून देतो. हिंदू राष्ट्रप्रति आपली कर्तव्ये काय आहेत याची जाणीव देतो.
काय आहेत आपली हिंदू राष्ट्राप्रति कर्तव्ये?”
मुसलमान आणि ख्रिश्चन घुसखोरांपासून राष्ट्राचं रक्षण करायचं. हे मिशनरी आणि बांगलादेशी इथे काय करतायेत पहा.
आणि मुलींना बळजबरीने दुसऱ्या राज्यांत पाठवल्यामुळे हिंदू राष्ट्राला कशी मदत होते?”
हे त्यांच्याच भल्यासाठी आहे. हिंदू मुलींवर संस्कार व्हायला हवेत. आधासारख्या निरक्षरांना काहीही कळत नाही. मला पटवून देण्याचा तो प्रयत्न करतो.
पण खोटी कागदपत्रे कशासाठी करायची? आणि पालक आपल्या मुलींशी बोलू शकत नाहीत, भेटू शकत नाहीत हे कशासाठी?”
त्याचा चेहरा फुलारतो. मला तुमच्याशी आता काहीही बोलता येणार नाही. कोरोबिला विचारा काय ते.

भाग २
मागोवा

२००८ साली राष्ट्रीय सेविका समितीची पूर्ण वेळ प्रचारिका झाल्यानंतर काही दिवसातच कोरोबी बसुमातार्यने आपल्या कामाला सुरवात केली. मी तिला पहिल्यांदा भेटले ते महराष्ट्रातील औरंगाबाद  २०१२ सालच्या डिसेंबर महिन्यातील एका दुपारी. त्यावेळेस ती राष्ट्र सेविका समितीच्या शिबिरासाठी कोक्राझर ते औरंगाबाद हा प्रचंड मोठा प्रवास करून खास या शिबिरासाठी आली होती.  वीस वर्षाच्या संस्कारक्षम वयात कोरोबिला समितीच्या कार्यासाठी निवडण्यात आले होते. नुकतेच बोडो-मुस्लीम दंगलीत तिचे घर उध्वस्त झाले होते आणि तिचे कुटुंब विखुरले होते. आणि ती दंगलग्रस्त लोकांसाठी तयार केलेल्या शिबिरात रहात होती आणि तिने आता हिंदुत्वाच्या विचारसरणीला जवळ केले होते. महाराष्ट्रातील सुनीता नावाच्या ज्येष्ठ प्रचारीकेने पहिल्यांदा कोरोबिला हेरले आणि तिला राष्ट्र सेविका समितीच्या किशोरी वर्गात , म्हणजे प्रशोक्षण शिबिरात  सामील केले.  नेल्ल्लीच्या  हत्याकांडानंतर  पूर्वांचल भागात गेलेली सुनीता तेथे वीस वर्षे सेविका समितीची पूर्णवेळ कार्यकर्ती होती. आपल्या प्रशिक्षणार्थी ते राष्ट्र सेविका समितीच्या पूर्ण वेळ कार्यकर्ती बनण्याच्या आपल्या प्रवासाबद्दल कोरोबी मला म्हणाली की " हा सर्व  प्रवास  म्हणजे माझी नियती  माझ्या हातात घेण्याचा  प्रवास होता.”

हिंदुत्वाच्या राजकारणात ‘प्रचारिका’ या पदाला मोठे स्थान आहे. त्यांचे हिंदुत्व विचारसरणीचे चांगले प्रशिक्षण झालेले असते आणि निमलष्करी कौशल्यांचेदेखील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचाराकांप्रमाणेच या प्रचारिकादेखील ब्रम्हचर्य पाळतात. आयुष्यातील भौतिक आणि लैंगिक गरजांच्या त्यागामुळे या प्रचारीकांना एक वेगळा दर्जा प्राप्त होतो कारण ब्रह्मचर्याचा अध्यात्मिकता आणि पावित्र्य यांच्याशी सबंध मनाला जातो. देशाच्या  दुर्गम भागात संघ परिवाराच्या  हिंदुत्व विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी या प्रचारिकानी आपले सर्व आयुष्य वाहिलेले असते. 
“सेविका समितीची कार्यकर्ती झाल्यावर मला माझ्या हक्कासाठी लढण्याचे आणि जे माझे आहे ते मिळवण्याचे शिक्षण मिळाले” असे तिने मला सांगितले होते. त्यावेळेस तिचा चेहरा लाल झाला होता आणि चेहऱ्यावर सुडाची भावना स्पष्ट दिसत होती. चार वर्षानंतर, (आज वय ३२ वर्षे) ASCPCR ने  संध्याबेन तिकडेबरोबरच कोरोबिलाला ३१ मुलांच्या तस्करीच्या कामगिरीच्या प्रमुखपदी निवडले. तिचे या हिंदुत्ववादी कामगिरीचे यशावरून  पूर्वांचल प्रदेशातील संघर्षग्रस्त भागातील तरुण मुलींची  हताश मानसिकता , त्यांचा परिस्थितीने आलेला दुबळेपणा, शासन पार पडत नसलेली जबाबदारी  या सर्व गोष्टींचा आपला हिंदुत्ववादी अजेंडा राबवण्यासाठी संघ परिवार  कसा वापर करत आहे याचा पुरावा म्हणजे कोरोबिला लाभलेले यश. या भागातील वारंवार उद्भवणाऱ्या वांशिक दंगलीनी कोरोबीच्या प्रयत्नांना मदतच झाली.

आम्ही जेंव्हा कोक्राझर मधील मलगाव गावातील दिवी बासुमातारीच्या घराचा दरवाजा उघडण्याची वाट पहात होतो तेंव्हा आतून त्रासिक  आवाज आला “आता कोण आलेय ? काय पाहिजे तुम्हाला?”. हा आवाज रोपीचा होता. रोपी तिशीतील असावी , सडपातळ , हातात पाण्याच्या दोन बादल्या धरलेली आणि पाठीला आपल्या एक वर्षे वयाच्या मुलीला अरुणीकाला घट्ट बांधलेली रोपी. मी तिले म्हंटले की आम्ही ३१ हरवलेल्या मुलींपैकी तिच्या पाच वर्षे वयाच्या मुलीबद्दल , दिवीबद्दल चौकशी करायला आलो आहोत. “ तुम्ही तिला घेवून गेलात आणि नंतर तिचे सर्व फोटो देखील घेवून गेलात” तिचे ताडकन उत्तर आले. ती कधी येईल परत?”. “ कोण घेवून गेले तिचे फोटो?” आम्ही विचारले . “तुमच्यासारखेच कोणी तरी.” ती उत्तरली. मी कोरोबीला दिविबद्दल विचारण्यासाठी फोन केला. तिने कोणाला तरी माझ्याकडे पाठवले आणि तो माझ्याकडे असलेले तिचे दोन्ही फोटो घेवून गेला”. ती म्हणाली. 
सर्मिला,सुर्गी, सुकुर्मानी आणि ईतर सर्व लहान मुलींच्या  पालकांनी हीच गोष्ट मला सांगितली. या मुलांच्या चौकशीसाठी CWC आणि ASCPCR च्या भेटीनंतर कोरोबीने मुलींच्या पालकांकडून त्यांच्या मुलींचे फोटो घेवून येण्यासाठी कोणाला तरी पाठवले होते.
“तुमच्याकडे फोटोची आणखी एखादी कॉपी नाही ? “ आम्ही विचारले. “ हे गाव शहरापासून ४० किलोमीटर लांब आहे. आमच्याकडे तुमच्याकडे असतात तसे  खूप फोटो नसतात” रोपीच्या चेहर्यावर नाराजी होती. पाण्यांच्या बादल्या कोपऱ्यात ठेवून तिने आपली बंद झोपडी उघडली आणि अर्धवट विणलेले गुलाबी दोखणा हातात घेतले. दोखणा म्हणजे बोडो स्त्रिया नेसत  असलेले पारंपारिक वस्त्र. दोखोनी विणून ते शहरात नेऊन विकणे हा रोपीचा  व्यवसाय. तिचा नवरा बकुल बसुमात्र गुवाहातीच्या केबल कंपनीत काम करतो आणि तिला दर सहा महिन्यांनी भेटतो. आपल्या अनुपस्थितीत दिविला दूर पाठवल्यामुले बकुल रोपिवर खूप नाराज आहे. “ ते म्हणतात माझ्यामुळे आमची मुलगी आम्ही गमावली” रोपी  मला म्हणाली. कोरोबीने तिला सांगितले होते की दिवी एका शाळेत शिकेल आणि दरवर्षी रोपीला भेटेल. “ पण आम्ही दिविशी बोलूनदेखील आता वर्ष झाले. आता कोरोबी म्हणते की दिवी  आता तीन चार वर्षाने परतेल. कोरोबी आता माझ्या फोनलाही उत्तर देत नाही.” असे म्हणून रोपी रडायला लागली. रोपीप्रमाणेच ईतर ३१ पालाकांकडेदेखील त्यांनी आपल्या मुलीना राष्ट्र सेविका समिती , विद्या भारतीकडे सोपवल्याचा कोणताही लेखी पुरावा नाही. किंवा त्या मुली ज्या शाळेत शिकणार त्या शाळेत शिकणार असे सांगण्यात आले त्या शाळेशी त्यांचा कोणताही संवाद झाल्याचादेखील पुरावा नाही. आता तर फोटोही नाहीत आणि मुलीना घेवून गेलेल्यांशी कोणताही संपर्क नाही त्यामुळे आता या मुलीना शोधणे अवघड झाले आहे.
मी विचारले “पण तुम्ही तुमच्या मुलीना त्यांच्याबरोबर पाठवण्याचे कारण काय ?” त्यावर ती म्हणाली “सेवाभारती”.

आसामच्या सीमावर्ती भागात संघाच्या विविध उपसंघटनांचं नेटकं जाळं आहे. त्यातलीच एक सेवाभारती. या संस्थेतर्फे अनेक कल्याणकारी कार्यक्रम घेतले जातात- यात आरोग्यशिबिरे, कार्यशिबिरे वगैरेंचा समावेश असतो. विद्याभारती आणि एकल विद्यालये मुलांना हिंदू राष्ट्रवादाचे शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करतात. वनवासी कल्याण आश्रम आणि फ्रेन्ड्स ऑफ ट्रायबल सोसायटीज् या संस्था आदिवासी कल्याणाचे कार्यक्रम करतात. दूरदूरच्या खेड्यापाड्यांत संघपरिवाराच्या हिंदुत्ववादी तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी या केंद्रांचा वापर प्रचारिका करतात.
सेवाभारतीची स्थापना, तिसरे सरसंघचालक, बाळासाहेब देवरस यांनी १९७८मध्ये केली. समाजाच्या कमकुवत घटकांवर लक्ष केंद्रित करण्याचा उद्देश होता. रास्वसंघाच्या अखिल भारतीय सहसेवा प्रमुखाकडे या संघटनेच्या मार्गदर्शनाची जबाबदारी असते. अखिल भारतीय प्रतिनिधी सभा या रास्वसंघाच्या सर्वोच्च कार्यकारिणीत त्यांना प्रतिनिधीत्व असते. या दृष्टीने पाहता सेवाभारती ही संघपरिवारातील उपसंघटनांमधली एक फार महत्त्वाची संघटना आहे. सेवाभारतीच्या वेबसाइटनुसार, दीड लाख कल्याणकारी प्रकल्प त्यांच्या मार्फत देशात राबवण्यात येतात. तरुण वा किशोरवयीन आदिवासी मुलामुलींसाठी ते वस्तीगृहेही चालवतात शिवाय अनौपचारिक शिक्षण केंद्रेही चालवतात.

***
आम्ही सगळे दोन वर्षांपूर्वी खूप आजारी पडलो होतो- दिवी, माझी दुसरी दोन मुलं आणि मी, रोपी सांगते, सेवाभारतीच्या कांचाईने औषधासाठी शिबीर भरवलं. तेव्हा आमची तिची भेट झाली.
ते शिबीर संपल्यावर कांचाईने मातृमंडलीची सुरुवात केली- सर्व मातांचा एक गट करून आठवड्यांतून एकदा भेटायला लागला. आम्ही गाणी गायचो आणि कांचाई आमच्याबरोबर आरोग्य, स्वच्छता वगैरेवर बोलायची. संडास कसं वापरायचं, घरच्या घरी पाळीसाठी पॅड्स कशी करायची हे सांगायची. ती बोडो जमातीपैकी होती. त्यामुळे आमची भाषा बोलणारं, आमची संस्कृती जाणणारं कुणी आहे याचं बरं वाटायचं.
मग त्याच वेळी, कांचाईने बालशिबिर ठेवलं. मुलांना संस्कार शिकवण्यासाठी तीन दिवसांचं शिबिर होतं ते. चांगले नागरिक बनणे का महत्त्वाचे आहे ते त्यात शिकवणार होते.
त्याच वेळी मला कांचाईने कोरोबीला भेटायला आणि दिवीला गुजरातला शाळेत शिकायला पाठवायला सांगितलं.
आतवर घुसायला हे धोरण वापरणे संघासाठी नवीन नाही. प्रथम कल्याणकारी संघटना पाऊल ठेवतात. त्यातून लोकप्रियता वाढते, मग राजकीय कार्यकर्ते कोण होऊ शकतात याचा अंदाज घेतला जातो, अगदी दूरवरच्या खेड्यापाड्यात जाणं, गळ्यातली लॉकेट्स वाटणं, पत्रकं वाटणं, हिंदूधर्मसाहित्य वाटणं या गोष्टी करत राहिल्यावर त्यांचा प्रभाव वाढत जातो. मग स्थानिक राष्ट्रसेविका समिती आणि रास्वसंघाचे पूर्णवेळ प्रचारक प्रवेश करतात. सेवाभारतीची सेवा जेथे शासनाचे हात कधीही अगदी मूलभूत सेवांसाठीही पोहोचलेले नाहीत अशा ठिकाणी उपयुक्त ठरते. राजकीय कार्यावर सेवाभारतीचा सुरक्षित पडदा रहातो. बऱ्याचशा गाववाल्यांना आणि पालकांनी वाटते त्यांची मुले सेवाभारती या एनजीओने शिक्षण देण्यासाठी नेली आहेत. त्यांचे संघाशी नाते आणि हिंदुत्वनिष्ठेचे डोस पाजण्याचे व्यूह ग्रामीण व्यक्तीला दिसतही नाहीत.

आसामच्या संघर्षप्रवण भागात जगणे आणि वाढणे हे इतके कठीण आहे की सतत चालणाऱ्या बोडो-मुस्लिम किंवा बोडो-आदिवासी हिंसाचारामुळे आपापल्या अस्मितेसंबंधी लोकांच्या भावना फार तीव्र आहेत. योग्य अयोग्यमधील फरक समजून घेणे जवळपास अशक्यच असते. भयग्रस्ततेचे शिकार होतात लोक... आणि हिंदुत्ववादी प्रचाराची वाट मोकळी होते.
***

कांचाई ब्रह्मा ही एक चौतीस वर्षे वयाची बाई आहे. गोसाईगाव या कोक्राझार जिल्ह्यातील एका छोट्या शहरात रहाणारी सेवाभारतीची कार्यकर्ती. तिची कथा बऱ्याच प्रमाणात कोरोबी आणि या पळवून नेलेल्या एकतीस मुलींशी मिळतीजुळती आहे. कुमरसामी या तिच्या गावात झालेल्या सेवाभारतीच्या किशोरी वर्गाच्या कार्यक्रमात ती वयाच्या पंधराव्या वर्षी सहभागी झाली.
या वर्गांमधून लहान मुलींवर संस्कार करण्याचे मुख्य कार्य होते, तिच्या ऑफिसमध्ये माझा फोटो घेताघेता ती मला सांगते.
कसले संस्कार?” मी विचारते.
मुलींना हे सांगितलं जातं, की त्या आपले खरे संस्कार विसरल्या आहेत. नमस्काराची जागा हेलोने घेतली आहे. परंपरागत वेषभूषा टाकून लांब पॅन्ट्स घालतात. हे सारे ख्रिस्ती प्रभावामुळे झाले आहे. त्यांनी पुन्हा आपल्या मूळ संस्कृतीकडे वळावे आणि आपल्या देशासाठी चांगली स्त्री बनावे. ती हसून सांगते.
अशा प्रशिक्षणातून या तरुण मुली हिंदू राष्ट्रातील स्त्रियांची नियत भूमिका काय असावी या हिंदुत्ववादी भूमिकेवर विनाप्रश्न विश्वास ठेवायला शिकतात. आउटलुकच्या औरंगाबाद शिबिरावरील(२८ जानेवारी २०१३) वृत्तांतात हे दाखवण्यात आले होते. मग ते स्थानिक उत्सव, लोककथा, भाषा आणि इतिहास यावर भर देऊ लागतात. हे करत अशतानाच मुस्लिमांचा द्वेष, ख्रिस्तींचा द्वेष याची गुंफण केली जाते.
बोडोंच्या मनांत सेवाभारतीबद्दल काहीही शंका नाहीत, कारण कांचाई, कोरोबि या स्त्रियांचे स्थानच तसे झगमगते आहे. त्यांची क्षमता, शक्ती जाणवण्यासारखी आहे शिवाय त्या त्यांच्या जमातीच्या आहेत. हे मुलींना सक्षम करण्याचे धोरण आखण्याची क्लृप्ती फार यशस्वी झाली आहे. लहान मुलींच्या पालकांची काही त्यांच्या शिक्षणासंदर्भात महत्त्वाकांक्षा असलीच तरीही त्यांच्याकडे साधने नसतात. एका मुलीने दुसऱ्या मुलीला भरती करायचे अशी कार्यपद्धती आहे.
कांचाईला २००३मधल्या एका शिबिरात एका राष्ट्र सेविका समिती प्रचारिकेने हेरले. २००४मध्ये तिला उत्तर प्रदेशमधील एका वसतीगृहात प्रशिक्षणासाठी नेण्यात आले. तिच्याबरोबर त्याच जिल्ह्यातील तीन मुली होत्या. २००५मध्ये ती परतली.
पुढल्या दोन वर्षांत आम्ही गोलपारा, कोक्राझार आणि चिरंग अशा तीन जिल्ह्यांत फिरून आम्ही सर्वांना आमचे छान अनुभव सांगितले आणि मग त्यातून ५०० मुलींना आम्ही वसतीगृहांत पाठवू शकलो.कांचाई सांगत होती. नंतरच्या काही वर्षांत त्यातल्या काहीजणी परतल्या आणि त्यांची लग्नंही झाली. आता त्या गृहिणीसेविका म्हणून काम करतात किंवा अर्धवेळ काम करतात.

सेवाभारतीच्या पांथिक कार्यक्रमांत सहभागी नसलेले जे कुणी पालक आहेत त्यांना वेगळी वर्तणूक मिळते आणि जे कुणी आखून दिलेल्या वर्तुळाबाहेर जाऊ पाहातील त्यांच्याबद्दल संघ स्वयंसेवकांना माहिती दिली जाते. कांचाईची निष्ठा उघड आहे, ती म्हणते, बोडो लोकांना ख्रिश्चन लोक मूर्ख बनवतात आणि मुस्लिम लोक ठार मारतात. आमची अस्मिता वाचवण्यासाठी आणि आमच्या मूळ हिंदुत्वाचे स्मरण देण्यासाठीच मला प्रशिक्षण मिळाले आहे. मी स्वतः बोडो असल्यामुळे मी सेवाभारतीत सामील झाले आणि भारतमातेच्या विकासासाठी मी काम करायला सुरुवात केली.
कांचाई नवीन भरतीसाठी पाहाणी करत असताना तिच्या प्रयत्नांतून नवी भरती होते  संघ परिवाराच्या एकल विद्यालयाच्या प्रकल्पातून आणि वनबंधू परिषदेमधून. एकल विद्यालये म्हणजे एकशिक्षकी शाळा असतात. मुख्यत्वे ती अनौपचारिक शिक्षण देतात. एक शिक्षक चाळीस मुलांच्या वर्गाला तीन तास शिकवतात. त्यांना राष्ट्रीय गीते, कविता आणि खेळ शिकवण्यात येतात- बा बा ब्लॅकशिप हॅव यू एनी वुल?’ऐवजी. आम्ही त्यांना भारत देश, मेरा देश, मेरी माता और प्रदेश, मेरी जान, मेरे प्राण भारतमाता को कुर्बान शिकवतो. ती सांगते.
संघगीतांवर भर असतो कारण त्यातून संघभावना, समविचार आणि गटाचा अभिमान या गोष्टी पक्क्या होत जातात. हिंदुत्वाच्या तत्वांनुसार सांगितलेला इतिहास, लोकगीते शिकवली जातात. या मुली अनेक सणावारांना, सेवाभारतीने भरवलेल्या शिबिरांत आणि काही खास प्रसंगी करमणुकीसाठीही गाणी म्हणायला जातात. अगदी शांत, सौम्य प्रकारे हिंदुत्वाची दीक्षा दिली जाते.
एकल विद्यालय फाउंडेशन २००० साली नोंदवण्यात आले. १९८६पासूनच ही विद्यालये सुरू झाली होती. २०१३मध्ये आदिवासी भागातील सुमारे ५२००० गावांमधून ते पोहोचले होते. यांचे नाते थेट संघ परिवाराचशी जवळून संबंधित असलेल्या विश्व हिंदू परिषदेशी आहे. पूर्वी झी न्यूजच्या सुभाष चंद्रा हे त्याच्या प्रमुखपदी होते. भाजप खासदार हेमामालिनी त्यांच्या ब्रॅन्ड अँबॅसिडर होत्या. कोक्राझारचे रास्वसंघाचे स्वयंसेवक फूलेन्द्र दत्त सांगतात की या एकट्या जिल्ह्यातच २९०च्यावर एकल विद्यालये आहेत. वनयात्री म्हणजेच आदिवासींना संस्कारित, शिक्षित करण्यासाठी काय पध्दत वापरावी याचे मार्गदर्शन वनबंधू परिषदेकडून होते. शालेय अभ्यासक्रमाच्या भोवतीनेच धडे आखले जातात. पण इतिहासाची, जीवशास्त्राची, भूगोलाची शिकवण हिंदू जाणीवांप्रमाणे दिली जाते. धर्मभावना जागृत ठेवणारे, आज्ञाधारक, स्वार्थत्यागी हिंदुत्ववागी निर्माण करणारे शिक्षण दिले जाते. सेवाभारती आपल्या किशोरी आणि बाल वर्गांतून या शाळांसाठी भरती करण्यास मदत करतात. नैतिक पोलीसगिरीची संस्कृती हळुवारपणे जोपासली जाते. श्रध्दा आणि परंपरा यांचे एकजिनसीकरण सुरू करण्यात आले आहे.
मुलींना प्रशिक्षित करणे हे फार महत्त्वाचे आहे, कारण त्यांच्यामार्फत सारा समाज मूल्ये शिकतो. मग अनेक वर्षांपर्यंत ती कोणीही मिटवू शकणार नाही. कांचाई सांगते,मग त्या ज्या कुटुंबात जातील ती सारी हिंदू राष्ट्राची शक्ती बनतील. म्हणून आम्ही मुलींवर विशेष लक्ष ठेवतो आणि त्यांना सेलफोन्स वापरू नयेत अशा सल्ला देतो.
कसं?” मी विचारलं. उत्तर भारतातील खापमधून स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न होतो त्यापेक्षा हे वेगळं असेल अशी मला आशा होती.
हिंदू धर्मात असा नियम आहे की लग्न हे धर्मातच केलं पाहिजे, कांचाई सांगते.तरुण मुली मुलांशी फोनवर बोलतात आणि मग लग्न करण्यासाठी पळून जातात. आम्ही हल्लीच खूप शर्थीने एका मुलीला नवऱ्याला सोडायला लावलं. त्या मुलीने मुसलमानाशी लग्न केलं होतं. सुरुवातीला तिने नकार दिला कारण ती गरोदर होती, पण मग आम्ही तिला खूप मार्गदर्शन केलं तेव्हा तिने त्याला सोडलं. शेजारच्या गावांत अनेक बोडोंना मुसलमानांनी मारल्याचं आम्ही तिला सांगितलं. मग तिला पटलं. आता ती त्याला सोडून आली आणि सेवाभारतीसाठी काम करते.
कांचाई आणि कोरोबि या दोघी संघाच्या उपशाखांसाठी भरतीचे काम फार यशस्वीरित्या करीत आहेत. त्यांचे बोडो असणे हे फार उपयुक्त ठरते. स्त्रिया म्हणून त्यांना स्थानिकांचा विश्वास सहज संपादन करता येतो. त्यांची प्रतिमा अतिशय उज्ज्वल असल्यामुळे आणि त्या आसामबाहेरून प्रशिक्षित होऊन आल्यामुळे कोणाही तरूण मुलीला त्यांच्यासारखं व्हावंसं वाटू शकतं. स्त्रीची माता, पत्नी, कन्या म्हणूनच भूमिका असते हे हिंदुत्ववादी तत्व त्यांच्या गळी आपोआपच उतरतं आणि शिवाय त्या तत्वाचे हिंदू राष्ट्र व्हावे यासाठी त्या आक्रमकही होतात.
कोरोबिला मी चार वर्षांपूर्वी औरंगाबाद प्रशिक्षण शिबिरात भेटले होते. हिरावलेल्या मुलींपैकी एकीच्या पालकांच्या घरात जेव्हा मला तिचा पोन आला तेव्हा तिच्या आवाजातला बदल मला जाणवला. त्या वेळी ती विनयाने पण दृढ राहून बोलत होती. आणि आता ती बचावाच्या पवित्र्यात ओरडून बोलत होती.
मी कोक्राझारमधल्या दोदश्री गावात घना कांता ब्रह्माच्या घरी गेले होते. त्यानेही त्याच्या मुलीला- भूमिका ब्रह्माला गुजरातला पाठवले होते. त्याचं घर ऐसपैस- गावातलं सर्वात मोठं घर होतं. मी त्याच्या अंगणात बसून भिंतीवरली चित्रे वगैरे पाहात होते. त्याची पत्नी सुभद्रा आसामी रिवाजानुसार पान-सुपारी घेऊन माझं स्वागत करायला आली.
आपली मुलगी पाठवण्यापूर्वी त्याने सही करून दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील तपशील मी तपासून पाहात होते. तीन मुलींच्या पालकांनी मला सांगितले होते की ब्रह्माने गेल्या आशाम निवडणुकीत भाजपसाठी काम केलं होतं. त्या तीन मुलींपर्यंत पोहोचायला कोरोबिला यानेच मदत केली होती हे मंगल मार्दीने सांगितलं होतं. सुकुरमणीचा पिता, देना तुडू म्हणालेला, तो (ब्रह्मा) त्याच्या मुलीशी जवळपास रोज बोलतो. पण आमच्या मुलींना त्याने कुठे पाठवलंय ते मात्र आम्हाला सांगत नाही. तो श्रीमंत आहे. म्हणजे गरीबांनी आपली मुलं धर्मार्थ देऊन टाकायची असा अर्थ होतो कां?”
मी ब्रह्माला जेव्हा विचारले की तुझ्याकडे वीस बिघे जमीन असताना प्रतिज्ञापत्रात आपल्याला उत्पन्नाचं साधन नाही असं का बरं लिहिलंय- तेव्हा तो बेमुर्वतपणे उत्तरला, असंच.
म्हणजे?”
म्हणजे मुसलमानांनी आणि ख्रिस्तींनी येऊन आमच्या लोकांचं धर्मांतर करून आमच्या जमिनी आणि कामं काढून घेण्यापेक्षा मी कोरोबि आणि संघाच्या मदतीने आमच्या मुलांना वाचवायला मदत करतोय. बाकीच्या बोडोंच्या अस्मितेचं संवर्धन करतोय. तो म्हणतो.
कोरोबिसारखे संघाचे कार्यकर्ते फसवणुकीच्या कलेत आता तरबेज झालेत. संघर्षाने चिंध्या झालेल्या या भागात ते कुठल्याही सांगोवांगीच्या कहाण्या वास्तव म्हणून रंगवतात. संशयाचं भयग्रस्त वातावरण आणि संतापाच्या भरात लोकांना नीट विचारच करता येत नाही. आपला राजकीय कार्यक्रम राबवायला या साऱ्याचा फायदा त्यांना होतो. इतरत्र चाललेल्या संघाच्या घरवापसी कार्यक्रमासारखंच आहे हे. मूळ कल्पना तीच- संघ सर्वत्र हेच सांगत आङे की या देशातील सारे दलित, आदिवासी आणि मुसलमान हे मूलतः हिंदूच आहेत. २०१४मध्ये संघाच्या उपशाखांकडून जेव्हा घरवापसीचे कार्यक्रम जाहीर झाले आणि काही मुसलमान आणि बौध्दांना त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात घेतले तेव्हा अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या अहवालात असे लिहिण्यात आळे होते- देशातील दहा कोटी आदिवासी लोकसंख्येपैकी, १.२२ कोटींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. आश्रमाने ५३,००० गांवांशी संपर्क साधला आहे, आणि इतर १लाख ९हजार आदिवासी गांवांपर्यंत आम्हा २०१५ या वर्षाखेरीपर्यंत पोहोचायचे आहे.
मी पुन्हा एकदा ब्रह्माला मुलांच्या संशयास्पद व्यवहाराबाबत प्रश्न टाकते. पण चुकीची कागदपत्रे का केली आणि बाकीच्या पालकांना खोटे का सांगितले गेले? हे बेकायदेशीर आहे. यावर तो रागारागाने बोडोमध्ये काहीतरी बडबडला. मला काहीच कळले नाही. मग त्याने त्याच्या भल्यामोठ्या स्मार्टफोनने माझा फोटो काढला. मला काही कळायच्या आत त्याने नंबर फिरवला आणि माझ्या हातात दिला.
हेलो, मी म्हणाले.
तुम्ही लोक कशासाठी सारखेसारखे येऊन या पालकांना विचारताय? जेव्हा मुसलमान लोक यांना क्रूरपणे ठार करत होते तेव्हा तुम्ही कुठे होतात?” पलिकडचा आवाज अगदी संस्कृतयुक्त हिंदीत ओरडत होता.
तुम्ही कोण? तुमची ओळख द्या प्रथम. मी विनंती केली.
माझं नाव कोरोबि. आणि मी तुमच्यासारख्यांना घाबरत नाही. जा आणि काय वाट्टेल ते सांगा कुणालाही, ओके?”
तुम्ही मला भेटत का नाही आणि मग बोलू आपण. मी म्हणते.
मला कुणालाही भेटायचं नाहीये. तुम्हा लोकांना हिंदूंची काही पर्वा नाही. या देशाचे खरे रहिवासी हिंदूच आहेत. तुम्हाला बाहेरच्या मुस्लिम बांगलादेशींसारख्यांचीच काळजी. आणि आता तुम्ही रास्वसंघ मुलांचा व्यापार करतो म्हणून अफवा पसरवताय. ती म्हणते.
याचा अर्थ तिला तिच्याविरुध्द सुरू झालेल्या पोलीसातल्या तक्रारींची आणि अधिकृत कारवाईची कल्पना होती.
मी तर रास्वसंघाचं नावही घेतलेलं नाहीये, कुठल्याच संघटनेचं नाव घेतलेलं नाहीये. तुम्हीच ते घेताय. मी उत्तरते.
जेव्हा मुसलमान येऊन त्यांच्या नोकऱ्या, जमिनी घेतात, त्यांच्या बायकांवर बलात्कार करतात- तेव्हा संघच त्यांना मदत करतो. तुम्ही दिल्लीवाले नाही करत.” तिचे सुरूच रहाते.
मी फक्त या बेपत्ता मुलींचा पत्ता विचारतेय. तुम्हाला काही सांगायचं असेल तर मला भेटा. आता तुम्ही केवळ माझ्या कामात अडथळा आणताय. मी म्हणते.
मला काहीही सांगायचं नाहीये. फक्त त्या पालकांना भेटणं थांबवा. दिल्लीला आमच्या झंडेवालाँच्या ऑफिसमधे जाऊन भेटा आणि सगळे प्रश्न त्यांना विचारा.
ती फोन ठेवून देते.
----------------------------------------------------------------------------------------------

भाग ३
छोटा काशीमधील राण्या

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुलांच्या हक्कांबाबतच्या परिषदेच्या कलम ९ नुसार, मुलांच्या हिताचे असल्याशिवाय त्यांना आपल्या पालकांपासून दूर करण्यात येऊ नये (उदा. छळ किंवा दुर्लक्ष होत असल्यास.) पालकत्वाच्या जबाबदारीसंबंधी निर्णय घेतले जात असतील तेव्हा मुलाला आपली मते व्यक्त करण्याची संधी दिली गेली पाहिजे. प्रत्येक मुलाला त्यांना इजा होत नसल्यास, दोन्ही पालकांशी संपर्कात राहण्याचा अधिकार आहे. भारताने या करारनाम्यावर १९९२ वर सह्या केल्या.
आता आसाममधील ३१ मुलींबाबत सांगायचे तर १६ जून २०१५ रोजीच्या (एएससीपीसीआर ३७/२०१५/१) एएससीपीसीआरचे अध्यक्ष रूनामी गोगोई यांच्या एडीजीपी सीआयडी, आसाम पोलिस यांना लिहिलेल्या पत्रानुसार चाइल्डलाइन इंडिया फाऊंडेशन, मध्य विभागाने खबरी आणि मानवी तस्करी प्रतिबंधक विभाग, गुन्हे शाखा, जीपी आणि आरपीएफ यांच्या मदतीने ११ जून २०१५ रोजी सायंकाळी ७.४० च्या दरम्यान नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून मुलांची सुटका केली. यात याच ३१ मुलांचा संदर्भ आहे.
चाइल्डलाइन इंडिया फाऊंडेशन (सीआयएफ) ही केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाची केंद्रीय संस्था असून ती देशभरात चाइल्डलाइन १०९८ ची स्थापना, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी यांच्यासाठी पालक संस्थेचे काम करते. ही काळजी आणि संरक्षणाच्या गरजेतील मुलांसाठीची २४ तास मोफत आपत्कालीन दूरध्वनी सेवा आहे. तिने या उद्दिष्टासाठी आपत्कालीन दूरध्वनी वाहिन्या स्थापित केल्या आहेत.
११ जून  रोजी चाइल्डलाइन दिल्लीला या मुलींच्या पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये तस्करीबाबत एका खबरीकडून फोन आला. या मुलींची नवी दिल्लीतील पहाडगंज स्थानकावर सुटका करण्यात आली. त्याच दिवशी चाइल्डलाइनच्या समन्वयक असलेल्या शैजू यांनी मयूर विहार, दिल्लीतील बालकल्याण समितीच्या अध्यक्ष सुषमा विज यांना पत्र लिहिले आणि त्यांना कळवले की आसाममधील कोकराझर आणि बोंगाइगाव येथील संध्या नावाच्या स्त्रीसोबत असलेल्या या मुलांची सुटका करण्यात आली आणि त्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. परंतु या ठिकाणी बालकल्याण समिती, सुरेंद्रनगरच्या आदेशाने हस्तक्षेप केला आणि एकाच दिवसात या मुलींना पोलिस ठाण्यातूनच त्यांच्या पुढील ठिकाणी नेण्यात आले. त्यातील २० मुली गुजरातमधील हलवाड येथे तर ११ पटियालाला नेण्यात आल्या. शैजू यांनी लिहिले की, दिल्लीच्या पोलिस विभागाकडून तसेच वरील जिल्ह्यांच्या बालकल्याण समित्यांकडून योग्य/संबंधित कागदपत्रांसह या मुलींबाबत अधिक माहिती गोळा करण्याची आवश्यकता आहे. मी आपल्याला विनंती करते की या मुलींच्या हितासाठी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. बालकल्याण समिती, मयूर विहार, दिल्ली यांच्याकडून या प्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याबाबत एएससीपीसीआरने १६ जून रोजी एडीजीपी, आसाम यांना पत्र लिहिलेः या मुलांची सुटका ११ जून २०१५ रोजी करण्यात आली, परंतु लेखी पुराव्यांत असे दिसून आले की, बालकल्याण समिती (सीडब्ल्यूसी) (सुरेंद्रनगर) यांनी बालगृह सचिव, हलवाड यांना बालन्याय कायदा २००० च्या कलम ३३(४) अंतर्गत ३ जून २०१५ रोजी आदेश जारी केले होते. बालकल्याण समितीसमोर मुलांना उपस्थित न करता ते हलवाडमधील बालगृहाला मुलांच्या योग्य ताब्याबाबत पत्र कसे लिहू शकतात... आपले पालक/आईवडील यांच्यासोबत आसाममध्ये राहणाऱ्या मुलांचे असे कोणते गुन्हे आहेत की त्यांना गुजरात राज्यातील बालकल्याण समितीकडे पाठवण्यात येते?” आऊटलुककडे बालकल्याण समिती, सुरेंद्रनगर यांच्या पत्राची एक प्रत आहे जी बालन्याय कायद्याचे सरळसरळ उल्लंघन करते.
एएससीपीसीआरच्या पत्राने आसाम पोलिसांनाही सूचना दिल्या की त्यांनी या प्रकरणाची योग्य चौकशी करावी आणि सर्व ३१ मुलांना आसाममध्ये परत आणण्यासाठी योग्य पावले उचलावीत... आसाम सरकार राज्यातील मुलांसाठी शिक्षणाचा हक्क आणि इतर विकास कार्य तसेच संरक्षण योजना राबवत आहे, मग चांगल्या सुविधांच्या नावाखाली मुलांना आपल्या कुटुंबापासून दूर का पाठवण्यात यावे. हे मुलांच्या हिताच्या विरोधात जाणारे जेजे कायदा २०००चे उल्लंघन आहे. त्याला तस्करीही म्हणता येईल.
दुसऱ्या दिवशी, १७ जून २०१५ रोजी गुजरात समाचार वृत्तपत्राच्या अहमदाबाद आवृत्तीने खालील बातमी प्रकाशित केलीः हलवाडमधील विद्या भारती ट्रस्टशी संलग्न असलेल्या सरस्वती शिशु मंदिरने दिल्लीमध्ये एक बैठक आयोजित केली ज्यात त्यांनी आसाममधील अलीकडेच आलेल्या पुरात अनाथ झालेल्या २० मुलींना दत्तक घेतले. या दयार्द्र पावलामुळे गुजरातची प्रतिमा उंचावली असून राज्याला अभिमान वाटतो आहे. या दत्तक घेण्यात आलेल्या मुली ५-८ वर्षे वयोगटातील आहेत आणि त्यातील अनेकींना कोणतेही पाठबळ नाही. या मुलींचे स्वागत दिल्ली रेल्वे स्थानकावर सरस्वती शिशु मंदिराचे विश्वस्त श्री. रमणिकभाई राबडिया आणि श्रीमती वर्षाबेन राठोड आणि दोन पोलिस अधिकाऱ्यांनी केले.
दुसऱ्या दिवशी, १८ जून रोजी, कुमुद कलिता, आयएएस, सदस्य सचिव, राज्य बाल संरक्षण सोसायटी, आसाम यांनी कोकराझार आणि बसईगाव येथील बालकल्याण समित्यांना पत्र पाठवले की, आपल्याला कोकराझार, चिरंग, धुब्री, गोलपारा, बोंगाईगाव येथील ३१ मुलींच्या तस्करीची कल्पना आहे. सलाम बालक ट्रस्ट चाइल्डलाइनने पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मदतीने नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मुलींची सुटका केली. या मुलींची सुटका केल्यानंतरही काही राजकीय हस्तक्षेपामुळे या मुली गुजरात आणि पंजाबमधील त्यांच्या निश्चित ठिकाणी नेल्या गेल्या. या घटनेतील सर्वांत धक्कादायक बाब अशी की सुरेंद्रनगर बालकल्याण समितीने यातील २० मुलींना आरएसएसपी हलवाड, गुजरात येथील बालगृहात त्यांच्या मूळ जिल्ह्यातील बालकल्याण समितीला त्यांच्या जिल्ह्यातील मुलांच्या नेण्याबाबत माहिती देण्यात आलेली नसतानाही ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कृपया आमच्या मुलांना त्यांच्या हितासाठी आसाममध्ये लवकरात लवकर पाठवण्यात यावे.
यानंतर बालकल्याण समिती, कोक्राझारने सुरेंद्रनगरच्या बालकल्याण समितीला २२ जून २०१५ रोजी एक पत्र लिहिले आणि आसाममधील मुलांच्या पुनर्पाठवणीची विनंती केली. सुरेंद्रनगरच्या बालकल्याण समितीने प्रतिसाद दिला नाही. कोक्राझारच्या बालकल्याण समितीने मुलींना आसामला परत पाठवण्याची विनंती केल्यावर आठ महिन्यांनी म्हणजे २ फेब्रुवारी २०१६ रोजी त्यांनी एकमेव पत्र (सीडब्ल्यूसी/एसएनआर/१५०) लिहिले. हे पत्र आसाम सरकारचे सदस्य सचिव डी. बी. अर्थकुर यांना लिहिलेले होते, ज्यात मोरबी जिल्ह्यातील हलवाडमधील राष्ट्रीय सेवा संस्था इन्स्टिट्यूटमधील २० आसामी मुलींच्या होम स्टडी पाठवण्यास सांगण्यात आले होते.
हलवाड हे एक छोटे गाव आहे जे पूर्वी सुरेंद्रनगर जिल्ह्यात होते आणि आता मोरबीमध्ये, गुजरातमधील अहमदाबादपासून १०० किलोमीटरवरील कच्छच्या छोट्या रणाच्या दक्षिण टोकाला आहे. बालन्याय कायद्यानुसार कोणत्याही मुलाचा होम स्टडी, मुख्यत्वे मुलाच्या कुटुंब आणि सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीचा अहवाल बालकल्याण समितीकडे मुलाला कोणत्याही शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेकडून चालवल्या गेलेल्या बालगृहात पाठवण्याच्या आदेशापूर्वी पाठवायचा असतो. या परिस्थितीत सीडब्ल्यूसी, सुरेंद्रनगरने पोलिसांना ३ जून २०१५ रोजी या मुलींना राष्ट्रीय सेवा संस्थेत कोणत्याही होम स्टडीशिवाय पाठवण्याचा आदेश दिला होता.
***
हलवदमध्ये जून महिन्यात सकाळचे ६.४५ वाजले आहेत. सरस्वती शिशु मंदीरचे संकुल मुलांनी गजबजले आहे. ही मुले इमारतीच्या कॉरिडॉरचे मोजमाप करत आहेत. येथे अनेक मुली संस्थेच्या आवारात खेळत आहेत. आसाममधील २० अनाथ मुलींना संस्थेने सुनीता संस्थेतील संगीत शिक्षिकेला दत्तक दिल्याची गुजरात समाचारची १७ जून २०१५ रोजीची बातमी मी दाखवते. मी तिला सांगते की मला त्या मुलींना भेटायचे आहे.
ती अंगणात खेळत असलेल्या मुलींकडे बोट दाखवते. दिवी, अंबिका, भूमिका, बबिता माझ्याशी बोलण्यासाठी रांगेत उभ्या राहतात.
सुनीता त्यांना म्हणते,बबिता, तुझी आवडती गोष्ट सांग.बबिताला पढवण्यात आलेले असते. छोटा काशीची राणी?” ती शिक्षिकेला विचारते. ती होकार देते.

कोणे एके काळी एक शूर राजा आणि सुंदर राणी होती. ते छोटा काशीमध्ये राहत होते. रोज सकाळी ते उठायचे, आंघोळ करायचे आणि शंकराची पूजा करायचे. ते शिवलिंग धुवायचे, गायत्री मंत्र म्हणायचे आणि ध्यानधारणा करायचे. त्यामुळे शंकर इतका आनंदी होतो की तो राणीला सुंदर कपडे, खूप शूर मुले आणि सुंदर दागिने देतो. राजाला ताकदवान सैन्य आणि भरभराटीचे राज्य दिले जाते. सरस्वती देवीचे पोर्ट्रेट असलेल्या संगमरवली देवळासमोर ती गोष्ट सांगत असताना इतर अनेक मुली गोळा होतात.
बबिता गोष्ट सांगत राहते- ते आनंदात राहत होते आणि अचानक एके दिवशी, गुजरातचा सुलतान, खान या शांततेचा भंग करतो आणि त्यांच्या राज्यावर हल्ला करतो. तो मुलांना ठार मारतो, प्राणी मारतो, देवळे पाडतो, मुली आणि तरूण पुरूषांचे अपहरण करतो. या गोष्टीवरून आपण सहजपणे हे सांगू शकतो की बबिताने ही गोष्ट अनेकदा ही गोष्ट ऐकली आणि सांगितली आहे. खानचे वर्णन करताना ती भीती वाटल्याचे दाखवते आणि हत्येची गोष्ट सांगताना थरथरते. ती खूप सुंदर गोष्ट सांगते.
आपले राज्य वाचवण्यासाठी राजाने सुलतानाला आपल्या जागेवर बसवायचे ठरवले. तो गेल्यावर त्याने आपल्या प्रजेला सांगितले की युद्धभूमीवरील झेंडा युद्धात एक राजा मारला गेला तर खाली आणला जाईल. त्याने राणीकडून वचन घेतले की तो मारला गेला तर त्यांनी क्रूर हल्लेखोराकडून स्वतःचा पराभव करून घेऊ नये.
हवेत कुठेतरी बोट दाखवत ती म्हणते की- खूप दिवस राणीने एक दांडिया महालात रात्रंदिवस वाट पाहिली आणि युद्धभूमीवर लक्ष ठेवले. आणि मग एके दिवशी छोटा काशीचा झेंडा खाली आला. राणीने क्षणात मोकळ्या मैदानात धाव घेतली. तिने आपल्या दासींना सांगितले की हल्लेखोर कधीही इथे येईल. आपल्या नवऱ्याचा आणि मातृभूमीचा अभिमान राखण्यासाठी त्यांनी शत्रूने आपल्याला हरवण्यापूर्वी आपण जीव दिला पाहिजे. प्रचंड मोठ्या प्रमाणात लाकडे गोळा करून आग पेटवण्यात आली. खूप मोठी होळी पेटवण्यासाठी त्यांनी खूप तूप आणि हवनाचे साहित्य गोळा केले. राणीने त्यात उडी टाकली आणि नंतर इतरही लोकांनी जीव दिला. ते जळत असताना संपूर्ण राज्य त्यांचा हा त्याग पाहण्यासाठी गोळा झाले होते, असे ती दुःखाने म्हणाली. ती आता काहीही कारण नसताना विचारसरणीची दासी झाली होती.
त्याच संध्याकाळी राजा परत येतो. तोपर्यंत राणी आणि इतर लोक राख झालेले असतात. राजा दुःखी होतो. आदल्या संध्याकाळी झेंडा चुकीने खाली आणलेला असतो. राणीने कायमच आपला शब्द पाळला हे तो कसे विसरला. दुःखी मनोवस्थेत निर्धार करून तो रणभूमीवर परतला. आपला स्वाभिमान कायम राखणाऱ्या या स्त्रीला देवही टाळू शकले नाहीत. छोटा काशीच्या राणीने शंकराला आपल्या मातृभूमीच्या गौरवाच्या रक्षणासाठी केलेल्या त्यागाने प्रभावित केले. त्या दिवशी तो अभूतपूर्व ताकदीने आणि शौर्याने लढला. खानचा एकेक सैनिक धुळीला मिळवेपर्यंत तो लढत राहिला. सुलतान पळून गेला. त्या दिवशी छोटा काशीची शांतता पुनर्स्थापित झाली. तेव्हापासून शंकर छोटा काशीच्या प्रत्येक कानाकोपऱ्याचे संरक्षण करतो. कोणतीही बाहेरची व्यक्ती त्याची शांतता आणि गौरव यांना धक्का लावू शकत नाही. ही राणी दर पौर्णिमेला एक दांडिया महालात येते आणि प्रत्येकाची चौकशी करते.
हलवदला छोटा काशी या नावानेही ओळखले जाते. हे ठिकाण आपल्या वार्षिक लाडू खाण्याच्या स्पर्धेसाठी ओळखले जाते ज्याचे आयोजन येथील ब्राह्मण समुदाय करतो आणि पालिया म्हणजे बबिताच्या गोष्टीतल्या गावातल्या राण्यांनी केलेल्या जोहाराच्या आठवणींचा उत्सव साजरा केला जातो.
***
सकाळचे ७.१५ झाले आहेत. सगळ्या मुली सकाळच्या प्रार्थनेसाठी सभागृहात पळतात. सभागृहात एक मोठे स्टेज आणि हिंदू देव देवता, गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, हेडगेवार, सावरकर, शिवाजी, जिजाबाई आणि भारतमाता यांची छायाचित्रे आहेत आणि सर्व भिंतींवर भगवे झेंडे आहेत. एका चित्रात शिखांचे गुरू, गुरू गोविंद सिंग यांना हिंदू धर्मरक्षक म्हटल्याचे दिसते. या सभागृहात उजवीकडे ६० मुली आणि डावीकडे ३० मुले रांगेत उभी राहतात.
स्टेजखालील छोट्या पायरीवर ओमचे चिन्ह, सरस्वती देवीचे चित्र आणि दुसऱ्या पायरीवर भारतमाता आणि भगवा झेंडा आहे. एक तरूण मुली तिथे जाते आणि दिवा लावते. बाकीची मुले खाली मांडी घालून बसतात आणि हात जोडतात. उदबत्त्या पेटवून तीन चित्रांभोवती फिरवल्यावर डाव्या बाजूला बसलेली सुनीता हार्मोनियम सुरू करते आणि गायत्री मंत्राचा जप सुरू करते. मुले डोळे मिटतात आणि एकसुरात गातात,ओम भूर्भुवःस्व... चार वर्षांची देवी, गोलपाराची बोडो जमातीची मुलगी आपला एक डोळा मिटते आणि दुसरा सुनीताकडे ठेवून मंत्र पुटपुटायचा प्रयत्न करते. या चार वर्षांच्या मुलीसाठी तो कठीण असते. दुसऱ्या मुलीला मी मंत्र पुटपुटायचा प्रयत्न करताना पकडल्यावर खुदखुदते. यानंतर आणखी मंत्र होतात, आणि त्यानंतर सुनीता सर्वांना सावधानमध्ये उभे राहण्यास सांगते. त्यानंतर ती त्यांच्यासोबत वंदे मातरम म्हणते.
साधारण अर्ध्या तासाची ही प्रार्थना झाल्यावर मी सुनीता आणि इतर काही लोकांकडे त्या वीस मुलींशी बोलू देण्याची परवानगी मागते. आसामच्या २० मुलींपैकी १९ मुलींना थांबायला सांगून इतरांना जायला सांगितले जाते. मी त्यांना हिंदीमध्ये त्यांची नावे विचारते. सुनीता हाच प्रश्न गुजरातीत विचारते. त्या आळीपाळीने सांगतात अंबिका, बबिता, मोरोबी, दिवी, सोरोगी, सुराग्नी, सुकुर्मनी, रियाजाज्योत, सुरिया, नेहा, भूमिका, सुष्मिता, सुशिता, राणी, गुजिला, रूमिला, सुर्मिला, देवी, मुलिता.
अनेक मुलींना आता फक्त गुजराती भाषाच कळते कारण येथील शिक्षणाचे माध्यम मुख्यत्वे गुजराती आहे आणि त्यांना हिंदीत बोलायला प्रोत्साहन दिले जाते. त्या घरी एकतर बोडो किंवा असामी भाषेत बोलत होत्या.
मी सुशिताला विचारते- तुला घरी जायचे आहे का? ती मान हलवते. सुनिता तिला रागाने विचारते- तुला घरी जायचे आहे का? ती सतरंजीकडे बघत नाही म्हणते.
मी दिवीला विचारते तिच्या इयत्तेबद्दल विचारते.
भजनाच्या वर्गात, ती म्हणते. मी सुनीताकडे बघते. ती म्हणते की यातील बरीचशी मुले नवीन असल्याने त्यातल्या काहींना वर्गात बसवण्यात आलेले नाही.
आणि तू गं? मी ओम्बिकाला विचारते. आम्ही संस्कार शिकतो आहोत, असे ती म्हणते.
म्हणजे?
मोडक्यातोडक्या हिंदीत ती म्हणते, महिलांचा गौरव, मातृभूमीचा गौरव, रोज प्रार्थना आणि प्राण्यांना न मारता त्यांना वाचवणे. जेवणासाठी मारायचं नाही.
तुमच्या स्वाभिमानाचे रक्षण कोणापासून करायचे? मी विचारते.
हल्लेखोरांपासून. जे हिंदूंवर हल्ले करतात. जसे बांग्लादेशी आणि आसाममधील मिशनरी, ती म्हणते.
तू घरी हिंदू प्रार्थना म्हणत होतीस का?
सुनीता मध्येच टोकते- आम्ही सर्व हिंदू आहोत हे आम्हाला माहीत नव्हते. कृष्णाची बायको रूक्मिणी आमच्या जातीची होती.
७ डिसेंबर २०१४ रोजी ज्ञानोदय एक्स्प्रेस या दिल्ली विद्यापीठाच्या ईशान्य भारताच्या ट्रेन ऑफ लर्निंगला सुरूवात झाल्यावर, आरएसएसचे सहसचिव कृष्ण गोपाल यांनी भारतीय मातृभूमी आणि तिच्या ईशान्येकडील संबंधांबाबत भाष्य केले. त्यांनी हिंदू देव आणि हिंदू स्वातंत्र्यसैनिकांवर भर दिला. भगवान कृष्णाची बायको रूक्मिणी अरूणाचलमधली होती, ते त्यांना म्हणाले. त्याच भाषणात त्यांनी नागा स्त्री स्वातंत्र्य सैनिकाची गोष्ट सांगितली. राणि गैडिनलियू, जी हिंदूंच्या ख्रिश्चन धर्मातील धर्मांतराविरोधात लढली. संदेश स्पष्ट होता- तुम्ही ईशान्येकडील आहात तर तुम्ही हिंदू आहात आणि हीच गोष्ट हलवाडमध्ये या लहान मुलींमध्ये बिंबवली जात होती.
मी बबिताला विचारते- पण तुला घरी नॉनव्हेज जेवण आवडत नाही का? खेकडा आणि पोर्क? बबिता मान हलवते. पण चांगल्या हिंदू मुलीने मांसाला स्पर्श करू नये. तरूण मुलीच्या आवडीनिवडी या हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेसाठी चिरडल्या जात होत्या.
ही चर्चा मध्येच थांबली कारण रखवालदार आला आणि त्याने सांगितले की शाळेचे विश्वस्त घनःश्याम दवे यांनी या मुलींशी बोलण्यास किंवा छायाचित्रे घेण्यास मनाई केली आहे. मी मान्य करते आणि निघायचे ठरवते. मी कारमध्ये बसते तेव्हा संस्थेचे दरवाजे बंद केलेले असतात. चौकीदार येतो आणि म्हणतो की घनःश्याम दवे येईपर्यंत मला जाण्याची परवानगी नाही.
मी दवे यांना चौकीदाराने दिलेल्या क्रमांकावर फोन करते. त्यावर उत्तर येत नाही. मार्गिकेत एक तास वाट पाहिल्यावर मी चौकीदाराला सांगते की मी जातेय. तो गाडीसमोर उभा राहतो आणि जाण्यास मनाई करतो. मी त्याला सांगते की मला दिल्लीसाठी विमान पकडायचे आहे परंतु तरीही तो मला जाऊ देत नाही. मी त्याला सांगते की तो मला थांबवू शकत नाही आणि मी पोलिसांना बोलवेन. तो म्हणतो की तुम्हाला घनःश्याम दवे कोण आहेत हे माहीत नाही. तुम्हाला हवे असल्यास पोलिसांना बोलवा. माझा स्थानिक टॅक्सी ड्रायव्हर सिकंदर मला सांगतो की घनःश्याम दवेचे भाऊ भाजपचे सदस्य आहेत आणि दुसरा भाऊ पोलिसात आहे.
दरम्यान घनःश्याम दवे आपल्या बाइकवर कडक कुर्ता पायजमा आणि गंध लावून येतात. ते पन्नास वर्षांच्या आसपास असतील. ते मला कार्यालयात यायला सांगतात आणि माझे कार्ड घेतात.
तुम्ही इथे कशासाठी आला आहात- ते विचारतात.
मी त्यांना सांगते की त्या आसाममधील दत्तक घेतलेल्या २० मुलींबाबत जाणून घ्यायला मी आले आहे.
तुम्हाला माहितीय का की मेघालयमधील दोन मुली तीन दिवसांपूर्वी वसतिगृहातून पळून गेल्या. आम्हाला त्या अजून सापडल्या नाहीत. त्याचमुळे हा चौकीदार तुम्हाला थांबवत होता. हे सांगताना ते नाराज वाटतात. समजू शकते.
या मुली आसामच्या पुरात अनाथ झाल्या. मी दिल्लीत असताना मोहन भागवतजी यांनी मला त्यांना आमच्या संस्थेत आणायला सांगितले. आम्ही मान्य केले.
माझी माहिती, कामाचे ठिकाण आणि माझा ब्लॉग पाहिल्यावर दवे म्हणतात की, तुम्ही ब्राह्मण आहात. तुम्ही आम्हाला इजा करणार नाही.
मी त्यांच्या माझ्याबाबतच्या या मताचे खंडन करत नाही आणि बाहेर पडते. त्यांच्या कार्यालयातील भिंतीवर काही प्रमाणपत्रे लावलेली आहेत. त्यातील पहिले वसुबेन त्रिवेदी, गुजरातच्या महिला आणि बालकल्याण राज्यमंत्र्यांचे आहे. ते २३ जून २०१५ रोजीचे आहे. त्यात असे म्हटले आहे की या संस्थेचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते २००२ साली झाले आणि ही संस्था राज्यासाठी गौरवास्पद आहे.
दुसरे प्रमाणपत्र गुजरातच्या समाजकल्याण संचालनालयाचे आहे. त्यात राष्ट्रीय सेवा शिक्षण सेवा प्रतिष्ठान, हलवाडची नोंदणी बालन्याय कायद्यांतर्गत काळजी आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या मुलांसाठी प्रमाणित केली आहे. या प्रमाणपत्राची मुदत ३ मार्च २०१६ रोजी संपली आहे. बाल न्याय कायद्यांतर्गत गरजू मूल वैधता असलेल्या नोंदणीकृत बालगृहातच राहू शकते. घनःश्याम दवे यांना भाजपाकृत गुजरात सरकारचा निश्चितच पाठिंबा आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------


भाग ४
'खालच्या' मुली

संयुक्त राष्ट्रांच्या बालहक्क कराराच्या अनुच्छेद ३०(अल्पसंख्यांकांच्या मुलांसाठी)  नुसार, "देशातील बहुसंख्य जनतेपेक्षा वेगळे असले तरीही, कुटुंबियांची भाषा, रूढी आणि धर्म शिकण्याचा आणि पाळण्याचा अधिकार तेथे वास्तव्य करणार्‍या प्रत्येक बालकास असेल.”
आसामच्या अकरा मुलींची अवैध वाहतुकीची चौकशी करण्याविषयी, दिल्ली चाइल्डलाइनने २३ जून २०१५ रोजी पतियाळा चाइल्डलाइनला लिहिल्यावर, पतियाळा चाइल्डलाइनने सरहिंदी गेट, पतियाळा, पंजाब, येथील माता गुजरी कन्या छात्रावासाला भेट दिली.
चाइल्डलाइन पतियाळाच्या समन्वयक हरजिंदर कौर यांनी वसतिगृहाला भेट दिली असताना तेथील कार्यवाहांनी त्यांची अडवणूक करून आक्षेप घेतल्यावर कौर यांनी हा अहवाल सादर केला: "चाइल्डलाइन दिल्लीकडून सूचना आल्यावर चाइल्डलाइन पतियाळाने माता गुजरी कन्या छात्रावासाचा पत्ता शोधला. त्यानंतर आम्ही पतियाळाच्या बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांकडे गेलो. सर्व ११ मुली तिथे सुखरूप आहेत की नाही वगैरे महत्त्वाचे मुद्दे तपासण्यासाठी अध्यक्षांनी सांगितले की चाइल्डलाइनच्या कर्मचार्‍यांसोबत, पतियाळा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, आणि, विभाग चारचे पोलिस ठाणे, यांनी त्या छात्रावासाला भेट द्यावी. आम्ही सगळे छात्रावासात गेलो आणि तेथील कार्यवाहांना भेटलो. परंतु, त्यांनी काहीही प्रतिक्रिया द्यायला किंवा त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधायला नकार दिला."
"दरम्यान आम्ही वसतिगृहाची कसून तपासणी केली. या वसतिगृहात ३१ मुली आहेत. आसामहून आलेल्या नव्या ११ मुलींव्यतिरिक्त सर्व मुली शाळेत जातात. वसतिगृहात पलंग नाहीत आणि एका मोठ्या दिवाणखान्यात जमिनीवर गाद्या घातल्या होत्या. तेवढ्यात, तिथे काही अधिकारी आले आणि आमच्याशी उद्धटपणे बोलू लागले. 'तुम्ही जेजे अ‍ॅक्टनुसार मुलींना बाल कल्याण समितीसमोर का सादर केले नाही?' असे आम्ही त्यांना विचारले आणि या ११ मुलींविषयीची योग्य कागदपत्रे मागितली. पण त्या मुलींची जागा बदलण्याचे काहीही सयुक्तिक कारण त्यांनी दिले नाही आणि अध्यक्ष, समन्वयक, आणि, संरक्षण अधिकार्‍यांशी हुज्जत सुरू केली. त्यानंतर तिथे बाल कल्याण समितीचे सदस्य आणि वसतिगृहाचे एक विश्वस्त एक श्री जिंदाल यांनी तिथे येऊन 'इथे यायची तुमची हिंमत कशी झाली?' असा आम्हाला जाब विचारला आणि आमच्यावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती चिघळल्याचे पाहून पोलिसांनी आम्हाला तिथून लगेच निघून जायला सांगितले."

महिला आणि बाल विकासाच्या केंद्रीय मंत्रालयाच्या अधिपत्याखालच्या चाइल्डलाइन इंडिया फाउंडेशनला हा अहवाल सादर केला होता परंतु काही कारवाई करण्यात आली नाही.

पतियाळा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ एस.एस. गिल म्हणतात की, त्यांनी ज्या पहाणीमध्ये भाग घेतला त्यातून असे वाटते की सरकार संघाच्या या संघटनेकडे कानाडोळा करते आहे. याचे सर्वात ठळक उदाहरण असे की बाल कल्याण समितीचे एक सदस्यच मुलांसाठीच्या या अवैध कारभाराचे विश्वस्त आहेत.” ते म्हणतात, "मुलींच्या वसतिगृहावरील या छाप्यात, कार्यवाहक वीणा लांबा यांनी आणि सेविका समितीच्या दुसर्‍या एका सदस्येने परिस्थितीला धार्मिक रंग दिला. मी शीख असल्यामुळे त्यांच्या धार्मिक संस्थेमध्ये ढवळाढवळ करतो आहे असा आरोप त्यांनी छाप्यादरम्यान केला. संघाच्या काही सदस्यांनी तिथे येऊन आम्हाला धमकावले म्हणून आम्ही निघून गेलो.
हरजिंदर कौर यांच्यासोबत या वसतिगृहात गेलेल्या जिल्हा बाल संरक्षण अधिकारी शायना कपूर यांनी पुष्टी दिली की, बालगुन्हेगार न्याय कायद्याखाली या वसतिगृहाची नोंदणी झालेली नाही, आणि, नोंदणीकृत नसलेल्या संस्थेमध्ये मुलांना ठेवणे बेकायदेशीर आहे. कोणत्याही साहित्यिक, वैज्ञानिक किंवा धर्मादाय संघटनेसाठी असलेल्या, केवळ सोसायटीज रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट १८६० अंतर्गतच या संस्थेची नोंदणी झालेली आहे. रोजगार देण्याच्या नावाखाली महिला आणि बालकांची तस्करी करणार्‍या बहुतेक संघटना याच कायद्याच्या अंतर्गत नोंदणीकृत असतात.
कपूर म्हणतात, "आम्ही वसतिगृहाला भेट दिली तेव्हा, तिथे सुरक्षारक्षकही नव्हते आणि या मुलींना रहाण्यासाठी धड सोयीही नव्हत्या. त्यांच्याकडे कोणतीही कायदेशीर कागपत्रे नव्हती, कायद्याने आवश्यक असलेल्या कोणत्याही वैद्यकीय चाचण्या या मुलींना ठेवण्यापूर्वी करण्यात आल्या नव्हत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, संरक्षण देण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी मुलांना इतर राज्यांतून आणणे बेकायदेशीर आहे. त्यांना मुलांना मदतच करायची होती तर आसाममध्येच का केली नाही? त्यापेक्षा त्यांनी पतियाळातल्याच मुलांना मदत करायला हवी होती. हे कायद्याचे उल्लंघन आहे."

प्रकरणाचा तपास केल्यानंतर, वसतिगृहात रहाणार्‍या काही मुलींच्या पालकांशी कपूर यांनी संपर्क साधला. मोनोबिना आणि दिब्यज्योती या दोन मुलींचे पालक आसामहून आले. "या मुली वसतिगृहात दोन वर्षांपासून रहात होत्या आणि पालक त्यांना शोधत होते. 'तुम्हाला घरी जायचे आहे का' असे आम्ही मुलींना विचारले तेव्हा त्या 'हो' म्हणाल्या. त्या पालकांसोबत निघून गेल्या. माता गुजरी कन्या छात्रावासाच्या आडमुठेपणामुळे, आसामच्या ११ मुली आणि बाकीच्या इतर मुलींसाठी आम्ही काही करू शकलो नाही." त्या म्हणाल्या.
माता गुजरी या, नववे शीख गुरू, गुरू तेग बहादुर यांच्या पत्नी होत्या. पतियाळातील दर पाचांपैकी एक आस्थापन त्यांच्या नावे आहे. अगदी, पतियाळातील स्थापत्याचा एक वारसा आणि भौगोलिक खूण असलेल्या सरहिंदी गेटजवळसुद्धा किमान तीन माता गुजरी शाळा आणि महाविद्यालये आहेत. माता गुजरी छात्रावाससुद्धा जवळच आहे. छात्रावासाचे भलेमोठे लोखंडी दार घट्ट बंद असल्यामुळे आत डोकावणे शक्य नाही. आम्ही दार ठोठावून आत शिरलो तेव्हा वीणा लांबा या मध्यमवयीन बाई आम्हाला भेटायला आल्या. राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर, आणि, भारतमाता, यांच्या भित्तीपत्रकांनी सजवलेल्या अंगणात आम्हाला बसवले गेले.
लांबा यांनी स्वत:ची ओळख बालवसतिगृहाच्या कार्यवाहक म्हणून करून दिली. त्यांनी अधिक काही माहिती उघड करायला नकार दिला आणि आम्हाला मुलींना भेटूही दिले नाही. पण त्यांनी याला दुजोरा दिला की तिथे आसामच्या ११ मुली आहेत, आणि, राष्ट्र सेविका समितीच्या पतियाळाची प्रचारिका लक्ष्मी ही गुवाहाटीला कोरोबीकडून आणखी मुली आणायला गेली आहे.
मी विचारले, "आसामच्या मुली शाळेत जातात का?" त्या म्हणाल्या, "काहीजणी जातात, पण यावर मी आणखी काहीही बोलू शकत नाही". आम्ही निघून गेलो.
माता गुजरी कन्या छात्रावासाजवळच्या सर्वात उंच इमारतीवर आम्ही दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजता ठाण मांडले. ६.१० वाजता मुली वसतिगृहाच्या गच्चीवर जमू लागल्या. एका काठीवर भगवा झेंडा फडवण्यात आला आणि मुलींनी त्याच्यासमोर रांग केली. ती एक राष्ट्र सेविका समितीची शाखा होती. भगवा झेंडा हा पीठासीन गुरू होता. प्रार्थनांच्या फैरीनंतर, मुली खोखो खेळू लागल्या. एका खेळात एक मुलगी खडूच्या एका छोट्या वर्तुळात उभी होती. काश्मीर व्यापण्याचा प्रयत्न करणार्‍या पाकिस्तानी दहशतवाद्यांची ती प्रतिनिधी होती आणि बाकीच्या मुली तिला वर्तुळाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न करताना "काश्मीर हमारा है (काश्मीर आमचे आहे)" अशी घोषणा देत होत्या.
आम्ही फोटो काढत होतो तेव्हा एक शेजारी वर आला आणि म्हणाला, "ते खालच्या जातीच्या मुलींना शारिरीक शिक्षण देत आहेत. या मुलींनाही इथे आणायला, पंजाबमध्ये भिकार्‍यांची इतकी कमतरता होती का?”

भाग ५
मुलींसाठी 'घर वापसी' ?


स्टॅलिनिझम आणि नाझीझमच्या मुळांचा शोध घेणाऱ्या हॅना अरेंन्ड्ट या जर्मन-अमेरिकन राज्यशास्त्रतत्वज्ञ त्यांच्या 'सत्य आणि राजकारण' या निबंधामध्ये लिहितात "आपलं जीवन ज्या वस्तुस्थितीच्या संदर्भात जगतो त्यातील सत्य किती कमकुवत असू शकतं याची इतिहासतज्ज्ञाला जाण असते. एखाद्या चुकार असत्यामुळे त्याला तडा जाऊ शकतो, किंवा जाणीवपूर्वक असत्याचा प्रचार करणाऱ्या गटांमुळे किंवा देशांमुळे त्याची लक्तरे लोंबू शकतात. आणि त्यानंतर अशी गैरसोयीची सत्ये भूलथापांनी काळजीपूर्वक झाकून दिसेनाशी केली जातात किंवा त्यांचा पूर्ण विसर पडतो. थापा मारणाऱ्या व्यक्तीला त्याच्या श्रोत्यांना काय ऐकावेसे वाटते याची पूर्वकल्पना असते, त्यामुळे सत्यापेक्षा असत्य समजायला आणि स्वीकारायला सोपे असते." परकीयांपासून स्त्रियांचे शील रक्षण करण्याच्या संकल्पनेला दुजोरा देणारी बबिता स्वत: गुजरातमध्ये परकीय आहे हे समजू शकत नाही. पतियाळामध्ये परकीय आणि परजातीय अशी दूषणं मिळणारी श्रीमुक्ती काश्मीरमधील घुसखोरांना हाकलून लावण्याचा खेळ खेळते. घरापासून दूर नेलेल्या या आदिवासी मुलींच्या 'शिक्षणा'मध्ये हिंदू राष्ट्राच्या रक्षणाकरिता परकीयांना हुसकावून लावणे या संकल्पनेवर भर दिला जातो. पण या 'शिक्षण' प्रक्रियेत त्या स्वत:च दुर्दैवाने परकीय झाल्या आहेत. घरापासून परागंदा झालेल्या बोडो आणि आदिवासी मुलींवर शील, सती आणि जोहार अशा पुरुषसत्तावादी संकल्पनांचा पगडा बसला आहे. ब्रिटिश काळात गुन्हेगारांशी लढा देणाऱ्या तेंगफखरी आणि इतर आदिवासी वीरांगनांऐवजी जोहार करून आत्महत्या करणाऱ्या छोटा काशीच्या राणीसारखे आदर्श त्यांच्यापुढे ठेवले जात आहेत. त्यांच्या मनात रुजवली जाणारी शौर्याची संकल्पना संघाच्या हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी पत्नी, माता, किंवा प्रचारक होण्यापुरती मर्यादित आहे. त्या घरी परततील तेव्हा कडव्या शिकवणीने आलेल्या कट्टर विचारसरणीसोबत. गेल्या वीसेक वर्षांत बोडोंच्या प्रदेशात ख्रिश्चन मिशनऱ्यांचा बराच शिरकाव झाला आहे. या अहवालात पूर्वी नमूद केलेल्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशात मुलांच्या बेकायदा वाहतुकीत मिशनरी संस्थांच्या सहभागाचा संदर्भ आहे. आपल्या सहकारी पक्षांसोबत राज्यात प्रथमच सत्तेवर आलेल्या भाजप सरकारला शाश्वत हिंदूकरण केलेली मतपेढी मिळवून देण्याच्या प्रयत्नांत संघ परिवाराने अशीच यंत्रणा वापरली आहे, किंबहुना याहून एक पाऊल पुढे टाकलं आहे. तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विरोधाची संधीही मिळू नये यासाठी संघाच्या विविध संघटनांनी दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. बाल हक्कांबद्दल काम करणारे कोक्राझार येथील एक महत्वाचे कार्यकर्ते म्हणतात "मुलांना मदत करणाऱ्या युनिसेफ सारख्या संघटना मुलांच्या आसपासची सामाजिक परिस्थिती बदलण्यावर भर देतात, मुलांना त्यांच्या मुळांपासून दूर नेण्यावर नाही. परंतु संघ कार्यकर्त्यांची आणि पालकांवची मुस्कटदाबी करून, आणि कायदे धाब्यावर बसवून मुलांना विशिष्ट शिकावं देण्यासाठी घरापासून दूर पाठवत आहे. आता केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असल्यामुळे संघाचा सहभाग असलेले ३१ मुलींच्या वाहतुकीच्या या प्रकरणात पडायला कोणीही धजावत नाही." "बेटी बचाओ, बेटी पढाओचा मथितार्थ हा आहे की काय?" ते शेवटी म्हणतात. ASCPCR च्या अध्यक्षा रुणूमी गोगोई म्हणतात, "मुलींना शिक्षण द्यायचे असेल, त्यांचे संरक्षण करायचे असेल, त्यांच्या जडणघडणीत मदत करायची असेल, तर हे कार्य आसाममध्येच का नाही केले जात? यासाठी मुलींना पंजाब आणि गुजरातमध्ये नेण्याची काय गरज आहे? आणि शिक्षणासाठी दूर नेले जात असेल, तर मुलींना त्यांच्या पालकांना भेटायची, त्यांच्याशी बोलायची आडकाठी का?"

संघर्षग्रस्त आसाममध्ये पालक, तरुण पिढी आणि मुले सर्वच असंतुष्ट आहेत - संधींचा आणि विकासाचा अभाव आहे, आणि राज्याच्या कल्याणकारी योजना तळागाळात पोचल्या नाहीत. बोडोंच्या मनात इस्लाम आणि ख्रिश्चनिटी बद्दल कृत्रिमरित्या शत्रुभाव निर्माण करण्यात आला आहे, आणि संथाल आणि मुंडा यांच्याबद्दलच्या पारंपरिक शत्रुभावाला हेतुपूर्वक जागृत ठेवले जात आहे. संघ परिवाराच्या प्रोत्साहनाने धर्म आणि पुरुषसत्तावादाच्या संस्था आदिवासी मुलींना आणि त्यांच्या पालकांना सतत संघर्षांचे वातावरण निर्माण करणाऱ्या शिकवणीकडे ढकलत आहेत. उच्चवर्गीय हिंदुत्वाशी मेळ नसलेल्या संकल्पनांचे हळूहळू उच्चाटन होत आहे. सेवा भारती आणि राष्ट्र सेविका समिती यांनी बेकायदेशीरपणे वाहतूक केलेल्या ३१ मुलींच्याबद्दलचे सत्य कदाचित उघडकीला येणार नाही. भाजप प्रणित सरकारे असलेली गुजरात आणि पंजाबसारखी राज्ये नियम धाब्यावर बसवत आहेत, आणि मुलींना आसाममध्ये परत पाठवायला नकार देत आहेत. बबिताचे वडील थेबा विचारतात, "आम्हाला आमच्या मुलीला फक्त शिक्षण द्यायचं होतं. अशा अपेक्षांचाही गरिबांना अधिकार नाही का? मुलांना भेटता न आल्यामुळे झुरणारे माझ्यासारखे पालक निर्माण करून सेवा भारती राष्ट्रनिर्माण कसं करणार आहे?"
---------------------------------------------------------------------------------------



या एकतीस मुली... आसामी जिवंत आईबापांच्या मुली. पुरामध्ये त्या अनाथ झाल्या, त्यांचे 
आईवडील मेले आणि म्हणून सरस्वती शिशुमंदिर या संस्थेने त्यांना दत्तक घेतल्याची बातमी गुजरात समाचारमध्ये छापून आली.
-----------------

हे सारे कपोलकल्पित आहे आणि संघाला बदनाम करण्याच्या दुष्ट हेतूने नेहा दीक्षित यांनी लिहिले आणि त्याचा संदर्भ घेऊन लिहिताना मुग्धा कर्णिक यांनीही दुष्ट हेतूने प्रेरित होऊन लिहिले असा अपप्रचार करणाऱ्यांसाठी पुढे ही दोन पत्रे. ती राज्य पातळीवरच्या अधिकृत समित्यांच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांनी लिहिली आहेत.
या शिवाय नेहा दीक्षित यांच्याकडे (आणि त्यांनी माझ्याबरोबर शेअर केल्यामुळे माझ्याकडेही) पुराव्याची कागदपत्रे आहेत. नेहा दीक्षित यांनी न्यायालयात जावे असा बकवास युक्तिवाद करणाऱ्या आंधळ्या लोकांसाठी एक सूचना. त्या पत्रकार आहेत. कार्यकर्त्या नाहीत. पण न्यायालयात जायची वेळ आणली तर हे लेखन दुष्ट हेतूने नसून सत्यशोध आहे आणि त्यात असलाच तर आईवडिलांपासून तोडलेल्या मुलींशी त्यांची पुनर्भेट व्हावी हाच हेतू आहे.
त्यांचे हिंदुत्वीकरण करायचे असले तरीही ते त्यांच्या घराजवळ करणे शक्य आहे. मग त्यांना अनाथ ठरवण्याची यातायात का केली जाते. 
गरीब अनाथ मुलांना वाटेल तसे वापरता येते असे वाटतेय की काय कुणाला????




1 comment:

  1. धक्कादायक आणि काळजाला पीळ पडणारं ...

    ReplyDelete