Wednesday, March 28, 2012

सोन्याच्या गणपतीच्या चोरीची पाळेमुळे


दिवेआगरचा सोन्याचा गणपती चोरीला गेला आणि सर्वत्र साजेसा ओरडा सुरू झाला.
आपल्या अनेक अक्कलभास्करांच्या जिभा तळपू लागल्या. कुणी म्हणतंय पापाचा अंधार झाला, कुणी म्हणतंय ज्या राज्यात देव सुरक्षित नाही तिथे माणूस काय सुरक्षित रहाणार, कुणी म्हणतंय महाराष्ट्रभर संतापाची लाट, कुणी म्हणतंय आम्ही आंदोलन करणार, कुणी म्हणतंय घंटानाद करणार, कुणी म्हणतंय सर्वांनी आपापल्या देवांना साकडी घाला.
पापाच्या अंधाराचं माहीत नाही पण अकलेचा उजेड तर भरपूर पडतो आहे. संतापाच्या लाटेचं माहीत नाही पण डबक्याला पूर आलेला जरूर दिसतोय. देवाला सुरक्षा हवी असते असा ठणठणाट करणाऱ्या श्रध्देच्या व्यापाऱ्यांना आता अधिकच श्रध्दामार्गी प्रसिध्दीचं बळ मिळणार असं दिसतंय. घंटानाद आणि साकडी घालणाऱ्यांचे पाय बाकीच्या देवळांकडे वळले की देवस्थानांच्या तिजोऱ्यांत ऩाण्यांचा नाद किंवा नाद न करता पडणाऱ्या नोटांचा भार वाढणारसं दिसतंय. काहीच करता येत नसलं की आंदोलनाची हाळी द्यायची आणि आपलं राजकीय अस्तित्व दृश्य ठेवायचं हे तंत्र पुन्हा एकदा यशस्वी ठरणार असं दिसतंय. गणपती गेला म्हणून दिवेआगरची बाजारपेठ ठप्प होण्याआधी निदान एकाध पंधरवडातरी राजकीय भक्तांच्या आवकजावकीचं सलाईन लागून धुगधुगत राहील.

दिवेआगरचा सोन्याचा गणपती सापडला कसा, तो किती किलोचा आहे आणि त्याबाबतची थोडीफार ऐतिहासिक माहिती आज प्रसिध्द झाली आहे. या दुःखद दरोड्यात एका पंचाहत्तर वर्षांच्या पहारेकऱ्याचा बळी गेला आणि दुसरा पासष्ट वर्षांचा पहारेकरी जब्बर जखमी झाला. यामुळे कुणालाही वाईटच वाटेल. एक चांगले चरितार्थाचे साधन दिवेआगर गावाने या दरोड्यामुळे गमावले आहे याबद्दल सहानुभूती व्यक्त करून याबाबत नक्की कायकाय कसकसे घडले आणि त्यात कुणाकुणाचे चुकले याचा वस्तुनिष्ठ हिशेब मांडला गेला पाहिजे. सर्व काही खापर शासन यंत्रणेवर फोडणे चूक असले तरीही त्या यंत्रणेने जी चूक केली ती नेमकी कशा प्रकारची होती हे समजावून घेणे महत्त्वाचे आहे. कारण त्या चुकीतला सर्वात मोठा सहभागी दबावगट शासकीय नव्हता, त्यांची कारणे काय होती तेही समाजावून घ्यावे लागेल. सोन्याची अंडी देणारी कोंबडी आपल्या खुराड्यात ठेवताना त्या खुराड्याच्या सुरक्षेसाठी अंड्यांच्या हिशेबात खर्च केला होता कां, हेही पहावे लागेल.
हा गणपती चोरीला गेला म्हणून सरकारी यंत्रणेला बोल लावण्याच्या जय्यत तयारीत असलेल्या सर्वांसाठी एक माहिती.
रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून या गणपतीच्या सुरक्षेसाठी चार पोलीस कॉन्स्टेबल देऊ करण्यात आले होते. पहिली तीन वर्षे चार शस्त्रधारी पोलीस सुरक्षेसाठी सतत तैनात असत. त्या पोलिसांना रोजचा भत्ता रुपये अडीचशेप्रमाणे देणे ही देवस्थान विश्वस्त न्यासाची जबाबदारी होती. सुरक्षेवरील महिना तीस हजार रुपये खर्च अस्थानी वाटल्याने विश्वस्तांनी ही सुरक्षा व्यवस्था महाग पडत असल्याचे सांगून ती नाकारली.
त्यानंतर आजतागायत या सोन्याच्या सुरक्षेसाठी काहीही व्यवस्था नाही. जी काही तथाकथित व्यवस्था विश्वस्तांनी केली ती दुर्व्यवस्था होती. म्हणजे गावातील काही निवृत्त लोकांनी दिवसा प्रसाद वाटणे, लोकांना रांगेची शिस्त पाळायला लावणे वगैरे गोष्टी सांभाळायच्या आणि रात्री आळीपाळीने पहारा द्यायचा अशी ती व्यवस्था होती. अर्थातच सारे पहारेकरी हे बव्हंशी थोड्या मानधनावर कामे करणारे स्वयंसेवी ज्येष्ठ नागरिक होते.
या दुर्दैवी निर्णयाला जबाबदार ना शासन होते, ना पुरातत्व विभाग, ना या देशाची सुरक्षा व्यवस्था.
कशाच्या आधारावर ज्या देशात देव सुरक्षित नाही तिथे माणसं कुठून असणार अशी आगखाऊ भाषा करतात लोक?
देव आणि संस्कृती जपणाऱ्या लोकांना यातल्या देवाच्या सुरक्षेचा प्रश्न फारच महत्त्वाचा वाटतो आहे. साठ ते पंचाहत्तर वर्षांच्या वृध्दांचा जीव धोक्यात मुळात घातला कोणी?
या मूर्तीचा घात केला कोणी?
या ऐतिहासिक वस्तूचा नाश झाला याला हा दरोडा एक निमित्त आहे. त्याची कारणे आपल्या बौध्दिक दिवाळखोरीत खोलखोल जाणारी आहेत.
या गणपतीचा शोध लागल्यानंतरचा इतिहास असा आहे-
डॉ. अरविंद जामखेडकर हे राज्य पुरातत्व खात्याचे संचालक म्हणून 31 जुलै 1997 रोजी निवृत्त झाले. त्याचपाठोपाठ सप्टेंबर महिन्यात दिवेआगरचा हा सोन्याचा गणपती सापडला. अशा प्रकारे जमिनीखाली जे काही पुरावशेष सापडतात त्याला निखाते निधी असा शब्दप्रयोग आहे. डॉ. जामखेडकरांच्या निवृत्तीनंतर श्री कावडकर यांच्याकडे चार्ज होता. ते या निखाते निधीचे (ट्रेजर ट्रस्ट)चे पदसिध्द अधिकारी होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नियमांनुसार मूर्तीची मागणी करणे अपेक्षित होते. नियमांनुसार निखाते निधी सापडल्याची बातमी कळल्यानंतर शोध लागलेल्या किंवा लावणाऱ्या व्यक्तीला त्या सापडलेल्या ऐवजाच्या निहीत किमतीच्या एक पंचमांश इतकी रक्कम बक्षीस म्हणून देण्याची तरतूद आहे. हा ऐवज माझ्याच मालकीचा आहे असे जर एखाद्या व्यक्तीने सिध्द केले तर बक्षीसातील काही भाग त्यास मिळण्याचीही तरतूद आहे. मौल्यवान धातू असल्यास किंमत निश्चित करण्याच्या दृष्टीने ती वस्तू वजन करण्यासाठी नेली जाणे अपेक्षित असते.
असा पुराविशेष ऐवज शासनाच्या ताब्यात आल्यावर शासकीय विभागात अथवा वस्तूसंग्रहालयात प्रदर्शित करून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यासंबंधी केंद्र शासनाचा अधिनियम आहे. त्या नुसार राज्यसरकारने नियम करणे आणि त्यांची अंमलबजावणी पुरातत्वाच्या निखाते निधी अधिकाऱ्यामार्फत करणे अपेक्षित आहे.

या अधिनियमाचा उद्देशच असा आहे की कोणत्याही सार्वजनिक कामाच्या संदर्भात खोदाई चालू असताना जमिनीखाली काही पुरावस्तू, मौल्यवान अवशेष उघडकीस आले तर त्यांची हेळसांड वा नाश होऊ नये. त्या वस्तू कुणाच्या खाजगी मालकीच्या क्षेत्रात सापडल्या तरीही शासनाने नियमांनुसार ठरलेला मोबदला देऊन पुरावशेष ताब्यात घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. पुरातत्वाचे काम भारतात सुरू झाल्यानंतर म्हणजे एकोणिसाव्या शतकात सुरुवातीच्या काळात असे अवशेष- एकेणिसाव्या शतकात- त्या काळच्या ब्रिटिशांच्या शासनाखालील भारतात स्थापन झालेल्या शासकीय संग्रहालयांना वाटून देण्याची प्रथा होती. मात्र स्वतंत्र भारतात ही प्रथा हळुहळू बंद पडली. राज्यांची अस्मिता आडवी येऊ लागली. प्रत्येक राज्य आमच्या राज्यात सापडलेल्या वस्तू आमच्याच ताब्यात रहायला हव्यात असा आग्रह धरू लागले. राज्याचे लोकप्रतिनिधी, लोकप्रतिनिधींच्या अंगठ्याखाली काम करणारे नोकरशहा, हितसंबंधीयांच्या राजकारणापुढे माना तुकवू लागले, त्यात पुरातत्वविषय अपवाद कां रहावा? यातूनच पुरावस्तूंच्या बाबतीतल्या कायद्यांना फाटा मिळू लागला किंवा ते सरळसोट धाब्यावर बसवले जाऊ लागले.

या सोन्याच्या गणपतीच्या विशिष्ट संदर्भात खटकणारी गोष्ट अशी की, फक्त मू्र्तीच नाही तर मूर्ती ज्यात सुरक्षित ठेवण्यात आली होती ती अभिलेखयुक्त तांब्याची पेटीसुध्दा ज्या शेतात ती सापडली त्या शेताच्या आताच्या मालकिणीच्या ताब्यात सोपवण्यात आली.
त्या काळातील सांस्कृतिक मंत्री कै. प्रमोद नवलकर यांनी या संबंधी नियमानुसार निर्णय घ्यायला हवा होता. तो न घेता त्यांनी लोकानुनयी असा निर्णय घेतला. याच कै.नवलकरांनी आपल्या कारकीर्दीत धुळ्याजवळ बलसाणे येथे सापडलेली जिनाची मूर्ती जैन लोकांना पूजेसाठी देऊन टाकली. तसेच औरंगाबाद येथील हरसूल तलावाजवळ सापडलेल्या जैन प्रतिमांच्या मोठ्या साठ्यात सापडलेल्या तीसचाळीस मूर्तीही त्यांनी जैनांना देऊन टाकल्या. धार्मिक भावनांचा आदर करून अशा प्रकारे पुरावस्तू धर्मगटांच्या स्वाधीन करून टाकणे हा चुकीचा पायंडा त्यांनी येथे पाडला. आजच्या सोन्याच्या गणपतीचा दरोडा हा या सर्व मूर्खपणाचे अंतिम फलित आहे.

अशा प्रकारच्या अनुनयास सर्वच राजकीय पक्ष बळी पडत आले आहेत.

पायधुणीसमोरचे एकमेवाद्वितीय असे दीडशे वर्ष जुने जैन देरासर जमीनदोस्त करण्यात जैन समाजाचाच आग्रह होता. त्या वास्तूचे विशेषत्व होते. त्यातील चित्रे वेगळीच होती. त्या वास्तूचे रक्षण करावे हा पुरात्तव विभागाचा आग्रहही जैन समाजाच्या इच्छेपुढे मान तुकवून मागे लोटण्यात आला. कौतुक होते नव्या संगमरवराच्या श्रीमंती मंदिराचे.  इतिहासाचे नाही. इतिहासाचे जतन करण्यापेक्षा लोकांना श्रध्देचे देव्हारे माजवण्यात पराकोटीचा रस असतो. वेरुळ येथील वरच्या चौतीस नंबरच्या लेण्यातील चौदा फुटी महावीर मूर्तीही संरक्षित पुरावस्तू नसल्याचे कारण देऊन पूजेत आणण्यास परवानगी देण्यात आली. पाषाणाच्या त्या मूर्तीला काळा ऑइलपेन्ट फासण्यात आला आहे. मांगीतुंगी गडावरील दोन्ही जैन गुंफांमध्ये चकचकीत पांढऱ्या किंवा नक्षीच्या टाइल्स वापरून वाट लावली आहे. ऑइलपेन्टचे रंगकाम तर आहेच. पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीचा अभिषेक थांबवावा असे पुरात्तव विभागाने सांगूनही काही उपयोग झालेला नाही. मेहकरच्या विष्णूमूर्तीला काय नि  उस्मानाबादच्या त्रिविक्रमाच्या मूर्तीला काय असमंजस लोक वस्त्रे नेसवून मूर्तींचे मूळ सौंदर्य झाकून टाकतात. त्या मूर्तींच्या सौंदर्याची वा ऐतिहासिक महत्त्वाची जाणच नसते. महत्त्व नुसते मौल्यवान धातूला किंवा तथाकतित देवत्वाला.
या सोन्याच्या गणपतीच्या बाबतीत लोकांनाही कौतिक आहे ते तो सोन्याचा असण्याचेच.
न पेक्षा असे कितीतरी दगडी गणपती, शिवपार्वती, विष्णूलक्ष्मी, महावीर तीर्थंकर कोकणच्या भूमीवर, या देशाच्या भूमीवर विखरून पडलेले आहेत. त्यांचे कौतुक कोण करतो. आपल्या शिलाहार, राष्ट्रकूट, चालुक्य, सातवाहन इत्यादी राजघराण्यांच्या सत्ताकालातील इतिहासाच्या अनेक खुणा अनेक ठिकाणी विखरून आहेत. त्यावर आम्ही चुना मारतो, थुंकतो, नावे लिहून ठेवतो, रिकाम्या बाटल्या फोडतो. त्याकाळातील मूर्तीकला, स्थापत्य यांचे जतन करण्यासाठी आम्ही काहीही करायला मागत नाही.
जाणूनही घेऊ इच्छित नाही. शिवाजीचा काळ आणि त्यानंतर जे काही असेल ते पांडवकालीन मानण्याची आपली लोकपध्दती आहे. कौतुक कशाचे तर सोनेचांदीचे. देवत्वाचे.
आज अनेक ठिकाणी जीर्णोध्दाराच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करून जुनी मंदिरे नष्ट करून, ग्रेनाइट, संगमरवर, स्पार्टेक, ऑइलपेंटने मढलेली मंदिरे आणि चांदीच्या पत्र्याची गर्भगृहे उभी केली जातात. देव आणि चांदीचे देव्हारे याचेच मूल्य लोकांना अजूनही वाटते. जुन्याचे संवर्धन आणि सौंदर्यवर्धन करणे यापेक्षा कमी पैशांत पण अदिक प्रयत्नांतून होऊ शकते... पण आम्हाला ते नकोच आहे.

आम्ही आहोत एका कृत्रिम, बेगडी संस्कृतीचे पाईक.

आता विषादापोटी खरोखर असे वाटते, हा गणपती कुणा प्राचीन वस्तूंचे महत्त्व ओळखणाऱ्या टोळीच्या हाती पडलेला असू दे.
हा सोन्याचा गणपती चोरीस गेल्यावर बाहेर विकला गेला तर त्याचे मूल्य त्यातल्या सोन्याचे किंवा देवत्वाचे नाही. ते त्याच्या प्राचीनतेचे असेल, त्याच्या इतिहासाचे असेल. वजनी सोन्याच्या किंमतीपेक्षा ते कित्येक पटींत असेल. आजतरी या देशात सापडलेल्या प्राचीन वस्तूंपैकी सर्वात मोठी सोन्याची एकचएक वस्तू म्हणून या मूर्तीचे महत्व आहे. यात देवत्व शोधण्याचा प्रकार हा ज्ञान आणि विश्लेषणाच्या प्राथमिक पायरीवर असलेल्या लोकांनी केला तरी पुढील पिढ्यांसाठी, अभ्यासासाठी पुरातत्व जतन करण्याची जबाबदारी असलेल्या स्वतंत्र देशाच्या, प्रगत होऊ पहाणाऱ्या देशाच्या शासनकर्त्यांनी त्याला उत्तेजन देणे हे सर्वथा गैर झाले. आज या गणपतीचा साचाही काढलेला नाही. त्याची व्यवस्थित मागून पुढून, बाजूने अशी छायाचित्रे उपलब्ध नाहीत.
पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांनी अनभ्यस्त लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली नांगी टाकली आणि एका ऐतिहासिक महत्त्वाच्या मौल्यवान वस्तूची वासलात लावली.
आज, ही मूर्ती निदान आंतरराष्ट्रीय प्राचीन वस्तूंचा व्यापार करणाऱ्यांच्या टोळ्यांच्या हाती असेल तर निदान ती अखंड तरी राहील अशी एक आशा आहे. जगाच्या पाठीवर कुठेतरी तो सुरक्षित राहील.. केवळ एक किलो तीनशे ग्राम वजनाच्या मौल्यवान धातूसाठीच चोरी करणारे बेअकली दरोडेखोर असतील तर ते त्या मूर्तीचे तुकडेतुकडे करून वितळवून ती विकून खातील. आपल्या हाती कधीच काहीही लागणार नाही.
आणि याला सर्वस्वी कारणीभूत असेल आपण ऐतिहासिक वारशासाठी दाखवत असलेली संपूर्ण अनास्था.
देवांच्या मूर्ती कधीही आपले, आपल्या दागिन्यांचे, आपल्या भक्तांचे रक्षण करू शकत नाहीत- हे सोरटी सोमनाथावरच्या सतरा स्वाऱ्यांनंतरही आपण शिकलो नाहीच. आपली देवळे अनुत्पादक सोन्याचांदीने मढतात. आणि देवांच्या श्रध्देच्या नावे व्यापार करत रहातात.
आपल्या परड्यात साऱ्या जगाचे चित्त वेधवून घेईल असा इतिहास आहे. त्याचे जतन, संरक्षण करण्याकडे मात्र आपले चित्त नाही. देव आणि सोने यापलिकडे पहाण्यासाठी आपल्या बुध्दीची कवाडे उघडली तरच हे शक्य होऊ शकते.

पण सध्यातरी आम्ही आहोत एका बेगडी संस्कृतीचे वाचाळ, असमंजस पाईक.


                                              mugdhadkarnik@gmail.com



4 comments:

  1. You flag interesting issues. Why don't you write also in English for a wider audience? Or do you run a blog in English as well which we don't know about?

    ReplyDelete
  2. अगदी खरं आहे... जे साईबाबा आयुष्यभर फकीर होते त्यांना सोन्याचे सिहासन देतात आणि त्यांच्या नावाखाली कोट्यावधींचा घोटाळा करतात...

    ReplyDelete
  3. Very well written you must be really angry with the state of the matter.but you write in a restrained 'civil' manner.not many seem to be interested in loss of life and ancient treasure.in similar manner devotees travelling in their swanky fast cars for Darshan loosing life...nothing really shakes the idol worship and blind faith in it.it is beyond my humanly understanding

    ReplyDelete
  4. निखात निधी वरील महत्वपूर्ण माहिती देणारा लेख. तसेच भारतीयांच्या इतिहासाच्या बेगडी ज्ञानाचे बुरखे फाडणारा लेख !
    श्री. प्रवीण सहदेव कदम

    ReplyDelete