आपणा सर्वांची- अगदी जगभरच्याच सर्व लोकांची एक अंगवळणी सवय आहे. ते म्हणजे देव-धर्माच्या बाबतीतली श्रध्दा म्हणजे अगदी त्याविरुध्द कोणी काही म्हणायचं बोलायचं नाही. धर्मश्रध्दांच्या बाबतीत भावना दुखावण्याचे प्रमाण प्रचंड आहे.
डॉकिन्सने डग्लस ऍडॅम्सचं एक भाषण त्याच्या गॉड डिल्यूजनमध्ये उद्धृत केलं आहे. त्यात तो म्हणतो- धर्माच्या केंद्रस्थानी अशा काही कल्पना असतात, ज्यांना आपण पवित्र म्हणतो किंवा शुध्द म्हणतो किंवा असंच काहीतरी म्हणतो. याचा अर्थ एवढाच असतो की या एका कल्पनेबद्दल कुणालाही टीका करण्याची परवानगी नाही. अजिबात नाही. कां नाही? नाही. बस्स नाही म्हणून नाही. आपल्याला आवडत नसलेल्या पक्षाला मतं देणाऱ्यांशी तुम्ही वाद घालू शकता. सगळे जण कडाकडा भांडतील, पण कुणाच्याही भावना दुखवणार नाहीत. कुठल्याही प्रश्नावर, कर वाढण्याचा प्रश्न असो वा काहीही... त्यावर वाद घालण्याचं स्वातंत्र्य सर्वांना आहे. पण कुणी म्हणालं... आण्ही ना शनिवारी अमुक गोष्ट करत नाही- की लगेच तुम्ही तत्परतेने म्हणायचं- हो कां... प्रत्येकाची श्रध्दा असते. आम्ही त्याचा आदर करतो. तुम्ही काहीही वाद न घालता पुढे बोलू लागता.
आपण कुठल्या पक्षाला मत द्यायचं, अर्थव्यवस्था कशी असावी यावर मत मांडू शकतो. पण हे विश्व कुणी निर्मिले की ते निर्माण झाले यावर चर्चा... छेछे त्यावर श्रध्देचा प्रश्न येतो.
आपल्याकडे या श्रध्दांचे पदर जरा वेगळे असतील. पण मुळात तेच. देवाच्या अस्तित्वासंबंधी, परंपरांच्या योग्यायोग्यतेसंबंधी आपण उगाच कुणाच्या भावना दुखावण्याच्या भानगडीत पडत नाही.
संस्कृतीच्या विकासात अशा प्रकारचे मंथन होणे आवश्यक असते. भावनांचा बडिवार माजवून, -लोकभावनेचा तर फारच जास्त बडिवार- आपण स्वतःच्या समाजाला बौद्धिक प्रगतीच्या आवश्यक टप्प्यांपासून मागे ठेवतो. ही जबाबदारी त्या त्या समाजातल्या, संस्कृतीतल्या बुध्दिवंतांची असते. तडजोडवादी दृष्टिकोनाचे एक मर्यादित महत्त्व आहे हे खरेच. म्हणजे उदाहरणार्थ बिनडोकपणे कपाळाला टिळे फासकटून हातात त्रिशूल घेऊन आलेल्या माणसापुढे बौध्दिक चर्चा करण्यापेक्षा चर्चात्मक पळ काढला नाही तर तोच मूर्खपणा होईल. पण काहीतरी बौध्दिक क्षमता घेऊन आलेल्या आपल्या तरूण विद्यार्थ्यांपुढे आपण यावरील चर्चा खुल्या करायलाच हव्यात. त्यांना प्रस्थापित भक्ती-श्रध्दा-परंपरांच्या आविष्कारांना आव्हान द्यायला शिकवायला हवं. यात हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन-बौध्द-पारशी- शीख-ज्यू-जैन हे धर्म आणि पंथ त्याच बरोबर साई-सत्यसाई- अनिरुध्दबापू- स्वामीसमर्थ-गजानन महाराज- नरेंद्रमहाराज- भैय्यूमहाराज- अमृतानंदमयी- कलीमहाराज- आसारामबापू- राधेमाँ- श्रीश्रीर-... अरे बापरे... या साऱ्यांपैकी कुणावरच्याही श्रध्देच्या आधाराची गरज पडणाऱ्या सर्व मुलांना आपण त्यांच्या श्रध्देच्या गरजांची कारणं शोधायला तरी किमान सांगू शकतो. आपल्या अवलंबित्वाचं कारण कळलं की उत्तर शोधायची इच्छा होते एवढं तर त्यांना समजू द्या.
विश्वातील प्रत्येक घडामोडीची कारणं भौतिकच असतात हे ओळखून त्यांचा शोध घेण्याची लालसा बाळगणाऱ्या सर्वोच्च मानवी प्रज्ञेसंबंधी त्यांना काहीतरी समजू द्या-
नाहीतर ख्रिश्चन धर्मात जन्मलेली मुले दोन हजार वर्षांतल्या, मुस्लिम समाजातली मुले सातव्या शतकातल्या, हिंदूंची मुले तीन-चार हजार वर्षांतल्या... वगैरे- इतिहासापुरतीच मर्यादित होऊन रहातील. या पृथ्वीच्या साडेचारशे कोटी वर्षांच्या इतिहासाचा आवाका, या विश्वाच्या अजूनही निश्चित नसलेल्या इतिहासाचा आवाका समजून घेण्याची त्यांची कुवत आपणच वाढवू शकतो.
अर्थात आपण आपली कुवत वाढवली तरच.
No comments:
Post a Comment