आपणा सर्वांची- अगदी जगभरच्याच सर्व लोकांची एक अंगवळणी सवय आहे. ते म्हणजे देव-धर्माच्या बाबतीतली श्रध्दा म्हणजे अगदी त्याविरुध्द कोणी काही म्हणायचं बोलायचं नाही. धर्मश्रध्दांच्या बाबतीत भावना दुखावण्याचे प्रमाण प्रचंड आहे.
डॉकिन्सने डग्लस ऍडॅम्सचं एक भाषण त्याच्या गॉड डिल्यूजनमध्ये उद्धृत केलं आहे. त्यात तो म्हणतो- धर्माच्या केंद्रस्थानी अशा काही कल्पना असतात, ज्यांना आपण पवित्र म्हणतो किंवा शुध्द म्हणतो किंवा असंच काहीतरी म्हणतो. याचा अर्थ एवढाच असतो की या एका कल्पनेबद्दल कुणालाही टीका करण्याची परवानगी नाही. अजिबात नाही. कां नाही? नाही. बस्स नाही म्हणून नाही. आपल्याला आवडत नसलेल्या पक्षाला मतं देणाऱ्यांशी तुम्ही वाद घालू शकता. सगळे जण कडाकडा भांडतील, पण कुणाच्याही भावना दुखवणार नाहीत. कुठल्याही प्रश्नावर, कर वाढण्याचा प्रश्न असो वा काहीही... त्यावर वाद घालण्याचं स्वातंत्र्य सर्वांना आहे. पण कुणी म्हणालं... आण्ही ना शनिवारी अमुक गोष्ट करत नाही- की लगेच तुम्ही तत्परतेने म्हणायचं- हो कां... प्रत्येकाची श्रध्दा असते. आम्ही त्याचा आदर करतो. तुम्ही काहीही वाद न घालता पुढे बोलू लागता.
आपण कुठल्या पक्षाला मत द्यायचं, अर्थव्यवस्था कशी असावी यावर मत मांडू शकतो. पण हे विश्व कुणी निर्मिले की ते निर्माण झाले यावर चर्चा... छेछे त्यावर श्रध्देचा प्रश्न येतो.
आपल्याकडे या श्रध्दांचे पदर जरा वेगळे असतील. पण मुळात तेच. देवाच्या अस्तित्वासंबंधी, परंपरांच्या योग्यायोग्यतेसंबंधी आपण उगाच कुणाच्या भावना दुखावण्याच्या भानगडीत पडत नाही.
संस्कृतीच्या विकासात अशा प्रकारचे मंथन होणे आवश्यक असते. भावनांचा बडिवार माजवून, -लोकभावनेचा तर फारच जास्त बडिवार- आपण स्वतःच्या समाजाला बौद्धिक प्रगतीच्या आवश्यक टप्प्यांपासून मागे ठेवतो. ही जबाबदारी त्या त्या समाजातल्या, संस्कृतीतल्या बुध्दिवंतांची असते. तडजोडवादी दृष्टिकोनाचे एक मर्यादित महत्त्व आहे हे खरेच. म्हणजे उदाहरणार्थ बिनडोकपणे कपाळाला टिळे फासकटून हातात त्रिशूल घेऊन आलेल्या माणसापुढे बौध्दिक चर्चा करण्यापेक्षा चर्चात्मक पळ काढला नाही तर तोच मूर्खपणा होईल. पण काहीतरी बौध्दिक क्षमता घेऊन आलेल्या आपल्या तरूण विद्यार्थ्यांपुढे आपण यावरील चर्चा खुल्या करायलाच हव्यात. त्यांना प्रस्थापित भक्ती-श्रध्दा-परंपरांच्या आविष्कारांना आव्हान द्यायला शिकवायला हवं. यात हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन-बौध्द-पारशी- शीख-ज्यू-जैन हे धर्म आणि पंथ त्याच बरोबर साई-सत्यसाई- अनिरुध्दबापू- स्वामीसमर्थ-गजानन महाराज- नरेंद्रमहाराज- भैय्यूमहाराज- अमृतानंदमयी- कलीमहाराज- आसारामबापू- राधेमाँ- श्रीश्रीर-... अरे बापरे... या साऱ्यांपैकी कुणावरच्याही श्रध्देच्या आधाराची गरज पडणाऱ्या सर्व मुलांना आपण त्यांच्या श्रध्देच्या गरजांची कारणं शोधायला तरी किमान सांगू शकतो. आपल्या अवलंबित्वाचं कारण कळलं की उत्तर शोधायची इच्छा होते एवढं तर त्यांना समजू द्या.
विश्वातील प्रत्येक घडामोडीची कारणं भौतिकच असतात हे ओळखून त्यांचा शोध घेण्याची लालसा बाळगणाऱ्या सर्वोच्च मानवी प्रज्ञेसंबंधी त्यांना काहीतरी समजू द्या-
नाहीतर ख्रिश्चन धर्मात जन्मलेली मुले दोन हजार वर्षांतल्या, मुस्लिम समाजातली मुले सातव्या शतकातल्या, हिंदूंची मुले तीन-चार हजार वर्षांतल्या... वगैरे- इतिहासापुरतीच मर्यादित होऊन रहातील. या पृथ्वीच्या साडेचारशे कोटी वर्षांच्या इतिहासाचा आवाका, या विश्वाच्या अजूनही निश्चित नसलेल्या इतिहासाचा आवाका समजून घेण्याची त्यांची कुवत आपणच वाढवू शकतो.
अर्थात आपण आपली कुवत वाढवली तरच.
Saturday, August 14, 2010
Wednesday, August 11, 2010
श्रध्देला वळण? नाही. श्रध्देला छेद.
गेल्या ब्लॉगपोस्टवर मंगेश करंदीकरांनी लिहिलेल्या कॉमेन्टला अनुसरून थोडेसे लिहिणार आहे.
अपेक्षा आहे की एकदा या ब्लॉगचा उद्देश खडखडीत स्पष्ट व्हावा.
श्रध्देला वळण लावण्याचा प्रयत्न आपल्याकडे अनेक लोकांनी मनःपूर्वक केला आहे.आपले सारे संस्कार आणि औपचारिक शिक्षण करणारे लोक, संस्था हेच तर करीत असतात. ते करण्यासाठी वेगळे काही प्रयत्न नव्याने करण्याची गरज नाही. काही मूलगामी बदल करता येणे संभवतच नसेल तेव्हा तोच तर एक मार्ग असतो.
मला महत्त्वाचा वाटतो तो उद्देश,या प्रकारच्या मूल्य शिक्षणापेक्षा अगदी वेगळा आहे.
श्रध्दा या शब्दाचा संकल्पनात्मक विचार करायला हवा.तरुण मुलांना करायला लावायचा तर आपण तो आधी करायला हवा.
वास्तव, सत्य, ठोस पुरावा लक्षात न घेता केवळ जे आपल्या मनात आहे- मग ती प्रतिमा असो, कथा असो,व्यक्ती असो वा कथित इतिहास असो किंवा तथाकथित शास्त्र असो त्यावर शास्त्रकसोटी न लावता विश्वास ठेवणे म्हणजे श्रध्दा. म्हणजेच तो आंधळेपणा झाला. आपण एक लटकाच भेद तयार केला आहे. सत्याधार नसलेले काही विश्वास म्हणजे श्रध्दा. आणि काही म्हणजे अंधश्रध्दा. शहरी लोक किंवा जरा भद्रलोक देवळाबिवळांत जातात,नवस वगैरे बोलतात, गणपती-महालक्ष्म्यांचे उत्सव करतात, त्यांना सोन्याचे कानबिन, मुकुट-हार वाहतात त्या श्रध्दा, गाडी सुरू होताना गणपती बाप्पा मोरया नाही तर गजानन महाराज की जय वगैरे म्हणतात ती श्रध्दा आणि कोणी कुचंबलेल्या बाया घुमू लागतात, किंवा कोणी आपली डोकी देवापुढे फोडून घेतात किंवा कोणी आपल्या पाठीतल्या स्नायूंत बगाड रुतवून घेतात- काय नि काय- त्या अंधश्रध्दा.या दोन्हींमध्ये फरक आहे तो फक्त अंशात्मक. गुणात्मक फरक काहीच नाही.
सत्य न जाणून घेता कशावरही विश्वास म्हणजेच श्रध्दा- भले स्वतःच्या मानसिक आधारासाठी बाळगलेली असली तरीही त्याला आंधळेपणाच म्हणावे लागते हे प्रथम मान्य करू.
आपापल्या सांस्कृतिक अवकाशात असलेल्या सर्व गोष्टी जाणून घेणे,त्यांची सत्यता पडताळण्याचा सतत प्रयत्न करणे हा एक ज्ञानार्जनाचा भाग आहे.करंदीकरांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना जे सांगितले तो त्याचाच भाग होतो. व्यासोच्छिष्टम् जगत् सर्वम् असे मान्य करणे ही मात्र श्रध्दा झाली. तिला वळण कसे लागणार?
ज्ञान मिळवत रहाण्याच्या प्रक्रियेचा अर्थ किंवा हेतूच श्रध्दा संपवणे हा असतो. प्रश्नचिन्हांच्या रानांतून न घाबरता वाट काढत जाणे म्हणजे वैचारिक प्रवास. अशा प्रवासात प्रत्येकाच्या मर्यादा निरनिराळ्या असतील. थकून कशालातरी शरण जाणे स्वाभाविक असेल कदाचित... मळलेली वाटही असेल. पण थकण्याचं उदात्तीकरण करायची गरज नाही.आणि साऱ्याच बुध्दीमत्तांना त्याच पट्टीत ठोकून बसवण्याची सक्ती करायचीही गरज नाही. नास्तिकतेला योग्य तो सन्मान मिळायला हवा.
पारंपारिकतेला हसणाऱ्या पण आपल्याला मानसिक धक्का बसला की मनःशांतीदाता वाटणाऱ्या बाबाच्या नादी लागणाऱ्या लोकांची याच संदर्भातील बौध्दिक तयारी कधी झालेली नसते. पारंपारिकतेची वरवरची लक्षणे टाकून देणारे लोक म्हणजे काही तर्कनिष्ठ विचारपध्दतीचे पाईक असतात असं नाही. मग साडीला किंवा भारतीय पोषाखाला नाक मुरडून हसणाऱ्या, खाली घसरणाऱ्या जीन्स घालणाऱ्या मुलंमुली विवेकी आहेत असं झालं असतं.
म्हणून केवळ वरपांगी आधुनिक वाटणारे लोक विमानप्रवासाचा खर्च सोसून तिरुपतीला नाहीतर सत्यसाईच्या मंत्रालयमकडे रवाना होत असतात. त्यांचं समर्थनही थोडं याच जातीतील असतं... पण त्यांच्याकडून कित्ती चांगली चांगली कामं होतात ते पहा. श्रध्देला वळण आहे बरं.
नाही. आपण आता हे काम नव्याने करण्याची गरज नाही.
मुळातून विचार करायला हवा. प्रत्येक न उलगडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आज नाही उद्या मिळेल, प्रत्येक समस्येचा सामना करायला बुध्दीचंच बळ पुरतं, माणसाचं या जगातलं अस्तित्व टिकण्याचं,बहरण्याचं कारण दैवी शक्ती नसून त्याची मर्यादा वाढत वाढत गेलेली पदार्थवादी बुध्दी आहे हा विचार जनसाधारणांच्या मनात भिनायला हवा.
नैतिकता पाळली जाण्यासाठी देवाची किंवा धर्माची खरोखर गरज नसते. ती मनातून, बुध्दीतून स्फुरते.
अनैतिकता,क्रौर्य या गोष्टीही याच बुध्दीतून स्फुरतात-त्याला भूतखेत,सैतानांची गरज नसते हे कळायला हवं.
पारंपारिकतेची दिवसेंदिवस वाढत चाललेली नाटकं-तमाशे, दाखवेगिरीचा सोस हा एक एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीचा चांगला सोर्स झाला आहे.पण ज्या मुलांची बुध्दी प्रखर सत्यशोधाच्या लालसेने पेटून उठू शकेल ती या नसत्या भानगडींमुळे झाकोळली जातात,नको त्या दडपणाखाली आकसून जातात. दिग्मूढ होतात, ही त्यातली खरी दुष्टता आहे.
एक वाक्य फार प्रेमाने अनेक शिक्षक, पालक आपल्या मुलांना सांगत असतात. त्यात एक भाबडेपणा असतो. पण ते एक फार धोकादायक वाक्य आहे.- 'कुठेतरी श्रध्दा असायला हवी बाळा'- हे ते वाक्य. म्हणजेच कधी ना कधी तरी तू सत्याकडे न पहाता आंधळा विश्वास ठेव असा त्याचा अनुवाद होतो.
माझा विरोध यालाच आहे.
Tuesday, August 10, 2010
नास्तिकतेचा फोरम
माझा लाडका विचारवंत उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ आणि नास्तिकतेचा वैचारिक मंच धडाडीने उभारणारा रिचर्ड डॉकिन्स याला अभिवादन करून मी आज हा नवा वेब्लॉग सुरू करीत आहे. आपल्यात अनेक जण विवेकी असतात. त्यांना श्रध्दा, विश्वास, देव, धर्म, रूढी-परंपरा, सण-उत्सव या सर्व गोष्टींपैकी बहुतेक गोष्टी अजिबात पटत नसतात. संस्कृतीचा भाग म्हणून, कुटुंबियांच्या भावना दुखवू नयेत म्हणून आपण अनेकदा प्रवाहपतितांसारखे काही गोष्टी पाळतो.
देव-धर्म पाळण्यातले, पूजा-अर्चा करण्यातले फोलपण समजूनही सामाजिक बंधने म्हणून आपल्यापैकी अनेकजण मनातल्या मनात चडफडत या गोष्टी करीत असतात. यात एक भीतीही असते... बाजूला पडण्याची, एकटे पडण्याची.
रिचर्ड डॉकिन्स म्हणतात, धैर्य दाखवून एकत्र आले, स्पष्ट बोलू लागले तर जगभरातल्या नास्तिकांची संख्या धर्मानुयायांपेक्षा कदाचित् जास्तच भरेल. पण ही सारी सायलेन्ट मेजॉरिटी आहे, म्हणून ती मायनॉरिटी वाटते. भारताच्या संदर्भात हे विधान म्हणजे जरा अतीच आशावादी ठरेल.
बाबावाक्यम् प्रमाणम् ही वृत्ती आपल्या संस्कृतीच्या नसानसांत भिनली असावी असं आपले उत्सवी गोंधळ पाहून तरी वाटतं.
आधुनिक भौतिक प्रगतीला मानवी आध्यात्मिक प्रगतीतले हीण ठरवून या देशात त्याच भौतिक प्रगतीचा आधार घेतघेत त्यामागील विज्ञानाला पराभूत करण्याचे धंदे चालतात. कितीही उच्च प्रतीच्या अध्यात्मातून, ईश्वराच्या शोधातून, भक्तीतून, तीर्थयात्रा-वाऱ्यांतून, हिमालयातील जपतपांतून आज आपण वापरतो त्यातील साध्यातले साधे अवजारही तयार झाले नसते. कुठल्याही देवाला अनवाणी जाऊन ना कुणाचा आजार बरा होतो ना कसलं यश येतं... पण तरीही असल्याच गोष्टींनी आधुनिक तंत्रज्ञानावर स्वार होऊन आपला बिस्तरा पसरत नेला आहे. तर्कशुध्द विचार करण्याचं वळण न लावणाऱ्या आपल्या शिक्षणपध्दतीतून बहुतांशी जे बौद्धिक विकलांग निघत रहातात त्यांना चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची हिंमतच होणार नाही.
एक उपाय मला सुचतो. छोटी सुरुवात असेल कदाचित पण अशी हिंमत असलेल्या नास्तिकांनी, विवेकनिष्ठांनी एकत्र आले पाहिजे. धर्मसंघटने असतात, पंथसंघटने असतात, देवळं-मशिदी-चर्च मंडळींची संस्थाने असतात, कुठल्याही फुटकळ महाराज-बाबा-बापू- माँ- अम्मांचे बिल्ले लावलेले ताफे असतात- आपल्यासारख्या लोकांचा एकतरी फोरम आहे? आपण आळशी आहोत की भित्रे- असा प्रश्न पडावा.
या जगात अनेक देशांतून, आपल्याच देशाच्या विज्ञानसंस्थांतूनही जग अंतर्बाह्य बदलून टाकणाऱ्या विषयांवरचे नवनवीन शोध लागत असताना, नवे शोध लागण्याची गती अनेकपटींनी वाढलेली असताना आपल्या भोवती जो देवधर्मोद्भव अपरंपार वैचारिक गोंधळ माजलेला दिसतो त्याबाबत आपण काय करणार आहोत. नुसतेच छद्मी हसणार?! खाजगीत टर उडवणार?! आणि मग आपण हे बदलू शकत नाही... अहो शतकानुशतकांच्या परंपरा आहेत या... कशा बदलणार... जाऊं द्या म्हणून गप्प बसणार?!
विवेकनिष्ठेचा आंतराग्नि फुंकर घालताच फुलू शकतो.
कोणत्याही राजकीय तत्वप्रणालीचा झेंडा खांद्यावर न घेता हे करणे आवश्यक आहे.
भ्रामक कल्पनांना मोडीत काढण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलनाचाच नव्हे तर श्रध्दा निर्मूलनाची गरज आहे. विश्वासावर आधारित असलेला, पुराव्यावर आधारित नसलेला कोणताही दावा-अर्थात श्रध्दा म्हणजे अंधश्रध्दाच असते. हे मत मान्य असलेल्या सर्वांचे हे व्यासपीठ व्हावे.
केवळ लिहिण्यापुरतेच मर्यादित न रहाता आपण हे विषय हाती घेऊन तरूण मुलामुलींपर्यंत पोहोचले पाहिजे. मराठी भाषक मुलेमुली इंग्रजीतले विचार वाचायला अजूनही बिचकतात. भाषेमुळे ज्ञानही परके होते. म्हणून आपले विचार आपल्या भाषेतून. डॉकिन्स, रसेल, हिचिन्सन, डेनेट... साऱ्यांचे विचार आपल्या भाषेतून. लिहायचे. मांडायचे. पोहोचवायचे.
हे एक कन्व्हर्जन आपल्याला करायलाच हवं.

Subscribe to:
Posts (Atom)