Saturday, April 16, 2016

मंदिरप्रवेशाच्या आग्रहाची बौध्दिक दिवाळखोरी.

नास्तिकांच्या दृष्टीने मंदिर प्रवेशाचा संघर्ष हा हास्यास्पदच होता आणि असेल. समाजात एका विशिष्ट बाबीवरून जाणीवजागृती करायची म्हणून एक प्रश्न उचलून लावून धरायची क्लृप्ती अनेक विचारसरणींतून केली जाते. तशीच कदाचित् स्त्रीवादी भूमाता ब्रिगेडने ती केली असेल. पण या संघर्षातून नेमके काय हाती लागले याचा विचार करताना, समाजातील एक श्रध्दा अधिकच गडद करण्याचेच काम यातून साध्य झाले हे काही वर्षांनंतर लक्षात येईल. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या हमीद दाभोलकरांनी मंदिरप्रवेशाच्या संघर्षात अंनिसला उतरवायचे ठरवले आहे ही आणखी एक दुर्दैवी गोष्ट असेच मी मानते.
ज्या गोष्टी फेकूनच देण्याच्या लायकीच्या आहेत- म्हणजे शनी हा ग्रह असून देव नाही, शनीची ग्रहबाधा, मंगळाची बाधा या सर्व गोष्टी मूर्खपणाच्या आहेत हे सांगायचे काम विवेकवादाच्या पायावर उभ्या असलेल्या कुठल्याही चळवळीचे आहे. भूमाता ब्रिगेडचा पाया विवेकवादाविना असलेल्या स्त्रीवादाचा (अगदीच वाईट संगदोष) असेल तर त्यापासून दूर रहाणेच अंनिसला श्रेयस्कर राहिले असते. परंतु भूब्रिला मिळालेल्या प्रसिध्दीचा सोस अंनिसला पडला की काय असा प्रश्न मनात आल्यावाचून रहात नाही.
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना या संघर्षावरून जी मारपीट झाली, त्यांचे चारित्र्यहनन किंवा त्यांची रेवडी उडवण्याचे जे प्रकार झाले त्या विकृत मानसिकतेचा निषेध सर्वांनीच केला पाहिजे. नास्तिकांनाही केला पाहिजे, आणि अंधश्रध्देविरुध्द थोडा लोकानुनय करत काम करण्याचे धोरण ठरवलेल्या अंनिसनेही केला पाहिजे. पण मंदिरप्रवेशाच्या आग्रहात उतरणे यातून मूळ विवेकवादाच्या भूमिकेला तडेच जातात.
या विषयावर मी आजवर काहीही लिहिले बोलले नव्हते, कारण ज्या भूमिका वेगळ्याच आहेत त्या प्रत्येक भूमिकेवर आपण लिहायलाच हवे असे काही नाही असे मला वाटते. परंतु अंनिसच्या नव्या भूमिकेमुळे नास्तिकवादातून आलेली भूमिका स्पष्ट व्हायला हवी असे वाटते.
मंदिरप्रवेशासाठी आंदोलनात उतरण्याच्या भूमिकेबद्दल मी अंनिसचा निषेध करीत आहे, कारण त्यात मला केवळ प्रसिध्दीच्या सोसाचा वास येतो आहे.


No comments:

Post a Comment