Friday, April 22, 2016

सर्वोच्च न्यायालयाचा धार्मिक स्थळांना झटका.

सुप्रीम कोर्टात तिरुअनंतपुरमच्या के प्रदीपकुमार यांनी केलेल्या अर्जावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांचे कान पकडत, रस्त्यारस्त्यांवर वाहतुकीस अडथळे ठरणारी किंवा अनधिकृत अशी जमीन घशात घालण्याच्या उद्देशाने काढलेली देवळे-प्रार्थनास्थळे काढून टाकणे, पुन्हा उभी राहू नयेत यासाठी कारवाई करणे यावर एक अहवाल तातडीने द्यायला सांगितले आहे. रस्त्यावर सर्वांचा हक्क असून कोणत्याही धार्मिक कारणांमागे दडवलेल्या राजकीय हेतूंनी बांधलेली स्थळे नष्ट झाली पाहिजेत असे सर्वोच्च न्यायालयाने निसंदिग्ध शब्दांत सांगितले आहे.
सर्व शहरांत, छोट्या-मोठ्या नव्याने पसरणाऱ्या नगरांत अनधिकृत बांधकामांचा प्रश्न असतोच. त्यातही धार्मिक आधार घेऊन उघडलेल्या या देऊळ-मशीद-चर्च- गुरुद्वारा- विहार यांच्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अधिक अडचणीचा होतो. ती पाडायची तर त्या मागे बहुतेकवेळा उभ्या असलेल्या राजकीय- गुंड शक्ती त्याचा गैर फायदा घेऊन भलतीच नौटंकी उभी करतात. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचे  खरे आणि खोटे भय दाखवून या भूछत्री स्थळांची मशागत होत रहाते.
गेली काही वर्षे तर देऊळ काढणे हा व्यवस्थित धंदा म्हणून रुळलाय.
काही वर्षांपूर्वी आताचा मुंबईचा एक मिनिगोल्डमॅन जेव्हा केवळ गुंडगिरीत होता तेव्हा त्याने सभ्यतेची सफारी वस्त्रे चढवण्याचा राजमार्ग म्हणून जे काही केले ते तो फुशारकीने सांगत होता ते आठवले.
'आता सगळे जुने धंदे सोडले, साहेब. आता आपलं एक हॉटेल आहे बारकं. तिथं बार सुरू होईल लायसेन मिळाला की. आणि दोन देवळं आहेत आपली. मस्त चाललंय. आता जुना धंदा करायची गरज पडत नाय.'
कित्येक देवळं मी गेल्या चाळीस वर्षांत नजरेसमोर अस्ताव्यस्त वाढत जाताना, महिमा पध्दतशीरपणे वाढवत जाताना पाहिली आहेत.
उंबराच्या बुंधाशी असलेला लाकडी मखरातली दत्ताची तसबीर एका संगमरवरी मूर्तीवाल्या, ग्रेनाईटयुक्त देवळात बदलली.
सिध्दीविनायकचे अगदी बारीकसे देऊळ कसकसे फुगत गेले, सोन्याच्या कळसावर भ्रष्टाचाराचा कळस चढवते झाले, हातपाय रस्त्यात पसरणारा रांगमंडप आला, कोर्टातून त्यावर आक्षेप घेणारांना कसे नामोहरम करण्यात आले... हेही पाहिले. कोर्टाने देवळाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्ती नसलेले नागरिक गप्प बसले होते.
झोपडपट्टी आणि हायवे याच्या मार्जिनमधे वाढलेली अनेक मंदिरे आहेत. बारीकशा देवळ्या सुजतसुजत सर्वांगी पसरतात. त्यात कुणाकुणाची सोय...  सगळं यथास्थित जमून येऊ लागतं. पन्नास-शंभर फुटाचे भिकार बांधकाम वाढतवाढत  दोन हजार स्क्वेअर फुटाच्या घरात जाते. लोकल फुडारी 'सदर खुले सभामंडपचे' काम करून देतात. मग कधीतरी खुले सभामंडप हळूच बंदिस्त होतात. देवळाच्या मागच्या बाजूने कळसाला लागून एक मजला चढवला जातो. सिंटेक्सची टाकी आणि लोखंडी जिना लागतो.  पुजाऱ्यांच्या जगण्याहागण्याची सोय होते. यच्चयावत सर्व सणांच्या दिवशी सजावट, रोषणाई, लाउडस्पीकरवरील आऱत्या भक्तीगीते यांच्या निमित्ताने चंदा जमा होत रहातो.
हायवे रुंदीकरणासारख्या कामातही या लबाड देऊळशाहीची आडकाठी होते. बाकी कष्टकऱ्यांच्या अनधिकृत झोपड्या उडवल्या जातात सहज. आणि ढेरपोट्या देवांच्या नि पुजाऱ्यांच्या काव्यांपुढे प्रशासने नांग्या टाकतात.
या प्रकाराला आवर घालण्याइतकी शक्ती सर्वोच्च न्यायालयाने आता प्रशासकीय, शासकीय संस्थांना प्रदान केली आहे.
पण इच्छाशक्तीचे देऊळ कोण बांधणार हो?

Saturday, April 16, 2016

मंदिरप्रवेशाच्या आग्रहाची बौध्दिक दिवाळखोरी.

नास्तिकांच्या दृष्टीने मंदिर प्रवेशाचा संघर्ष हा हास्यास्पदच होता आणि असेल. समाजात एका विशिष्ट बाबीवरून जाणीवजागृती करायची म्हणून एक प्रश्न उचलून लावून धरायची क्लृप्ती अनेक विचारसरणींतून केली जाते. तशीच कदाचित् स्त्रीवादी भूमाता ब्रिगेडने ती केली असेल. पण या संघर्षातून नेमके काय हाती लागले याचा विचार करताना, समाजातील एक श्रध्दा अधिकच गडद करण्याचेच काम यातून साध्य झाले हे काही वर्षांनंतर लक्षात येईल. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या हमीद दाभोलकरांनी मंदिरप्रवेशाच्या संघर्षात अंनिसला उतरवायचे ठरवले आहे ही आणखी एक दुर्दैवी गोष्ट असेच मी मानते.
ज्या गोष्टी फेकूनच देण्याच्या लायकीच्या आहेत- म्हणजे शनी हा ग्रह असून देव नाही, शनीची ग्रहबाधा, मंगळाची बाधा या सर्व गोष्टी मूर्खपणाच्या आहेत हे सांगायचे काम विवेकवादाच्या पायावर उभ्या असलेल्या कुठल्याही चळवळीचे आहे. भूमाता ब्रिगेडचा पाया विवेकवादाविना असलेल्या स्त्रीवादाचा (अगदीच वाईट संगदोष) असेल तर त्यापासून दूर रहाणेच अंनिसला श्रेयस्कर राहिले असते. परंतु भूब्रिला मिळालेल्या प्रसिध्दीचा सोस अंनिसला पडला की काय असा प्रश्न मनात आल्यावाचून रहात नाही.
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना या संघर्षावरून जी मारपीट झाली, त्यांचे चारित्र्यहनन किंवा त्यांची रेवडी उडवण्याचे जे प्रकार झाले त्या विकृत मानसिकतेचा निषेध सर्वांनीच केला पाहिजे. नास्तिकांनाही केला पाहिजे, आणि अंधश्रध्देविरुध्द थोडा लोकानुनय करत काम करण्याचे धोरण ठरवलेल्या अंनिसनेही केला पाहिजे. पण मंदिरप्रवेशाच्या आग्रहात उतरणे यातून मूळ विवेकवादाच्या भूमिकेला तडेच जातात.
या विषयावर मी आजवर काहीही लिहिले बोलले नव्हते, कारण ज्या भूमिका वेगळ्याच आहेत त्या प्रत्येक भूमिकेवर आपण लिहायलाच हवे असे काही नाही असे मला वाटते. परंतु अंनिसच्या नव्या भूमिकेमुळे नास्तिकवादातून आलेली भूमिका स्पष्ट व्हायला हवी असे वाटते.
मंदिरप्रवेशासाठी आंदोलनात उतरण्याच्या भूमिकेबद्दल मी अंनिसचा निषेध करीत आहे, कारण त्यात मला केवळ प्रसिध्दीच्या सोसाचा वास येतो आहे.


Tuesday, April 5, 2016

नासदीय सूक्त

नासदीय सूक्त म्हणजे बिगबॅन्ग सिध्दांताच्या जवळ जाणारी रचना आहे एवढेच नव्हे तर तसा अभ्यासच आपल्या पूर्वजांनी केला होता असे अतिशयोक्त दावे करायला मजाच येते परंपरावादी विद्वानांना.
नासदीय सूक्त अज्ञेयवादी विचाराची सुरुवात आहे. म्हणजे आस्तिक्याकडे झुकणारा अज्ञेयवाद आहे तो. नास्तिक्याकडे झुकणारा नाही. फार सुंदर कल्पना केली आहे. यातून एक सुंदर प्रतिभावान विचार समोर आला आहे हे नक्की. बिग बॅन्ग चे भौतिकशास्त्रवंत ज्ञान वेगळे.
                पण नासदीय सूक्त नक्की काय म्हणते ते जाणून घ्यायला हरकत नाही. मानवी जिज्ञासेतून स्फुरलेलं एक श्रेष्ठ काव्य आहे ते.



नासदासीन्नो सदासीत् तदानी
नासिद्रजो नो व्योमा परोयत् 
किमावरीवः कुह कस्य शर्मन्
अम्भ किमासीत् गहनम् गभीरम् .१
हे सारे निरस्तित्व नव्हते आणि अस्तित्वातही नव्हते. नव्हते वातावरण, नव्हते त्यापलिकडले आकाश. कशाने कशावर आवरण घातले होते? कोणी कुणाला आधार दिला होता? सारे जलमय होते कां... खोल खोल अथांग जल... होते कां ते तरी?

न मृत्यूरासीदमृतं न तर्हि
न रात्र्या अह्न आसीत् प्रकेतः.
आनीदवातं स्वधया तदेकं
तस्माद्धान्यं न परः किंच नास .२.
मृत्यूचे अस्तित्व नव्हते आणि अमर असेही काही नव्हते. रात्र आणि दिवसाचा भेद जाणव देणारे काहीही नव्हते. स्वतःच स्वतःचा श्वास बनलेले की श्वासरहित असे ते एक अस्तित्व... त्यापेक्षा वेगळे असे काहीच तर नव्हते तेव्हा.

तमआसीत्तमसा गूळ्ह
-मग्रेsप्रकेतं सलिलं सर्वमा इदम्
तुच्छ्येनाभ्वपिहितं यदासीत्
तमसास्तमहिनाजायतैकम् .३.
अंधःकार होता... सारा अनियंत्रित गोंधळ अंधःकारानेच पोटात घातलेला. जे जे काही होते ते नव्हतेही, निराकार होते... उष्ण शक्तीतून, अंधःकाराच्या अस्तातून ते काही एकमात्र जन्माला आले.

कामस्तदग्रे समवर्तताधि
मनसो रेतः प्रथमं यदासीत्
सतो बन्धुमसति निरविन्दन्
हृदि प्रतीष्या कवयो मनीषा .४.
आणि मग उद्भवली आरंभीची कामना... आत्म्याचे परम बीज, सूक्ष्म प्राण अशी ती कामना. नंतरच्या विचारवंतांनी आपल्या हृदयातून विचार करून निरस्तित्वाशी अस्तित्वाचे नाते शोधून पाहिले.

तिरश्चीनो विततो रश्मिरेषाम्
अधः स्विदासीदुपरी स्विदासीत्
रेतोधा आसन् महिमान आसन्
स्वधा अवस्तात प्रयतिः परस्तात .५.
त्यावेळी त्या दोघांमधील अंतर मिटत जाताना, त्या वरील अवकाशात काय होते आणि त्याखालील अवकाशात काय होते? तेथे सर्जक होते, महाशक्ती होत्या, मुक्तपणे काहीकाही घडत होते आणि ऊर्जेचा कल्लोळ होता

को अद्धा वेद क इह प्रवोचत्
कुत आजाता कुत इयं विसृष्टिः
अर्वाग् देवा अस्य विसर्जनेना-
sथा को वेद यत आबभूव .६.
ते जे घडत होते, जन्माला येत होते, निर्माण होत होते, त्याचा उगम कोणता, उद्भव कसा झाला, हे कोण निश्चितपणे सांगू शकेल? ही सृष्टी निर्माण झाल्यानंतर देवांची निर्मिती झाली. मग प्रथम कोण अस्तित्वात आले होते हे कोण जाणत असेल?

इयं विसृष्टिर्यत आबभूव
यदि वा दधे यदि वा न
यो अस्याध्यक्षः परमे व्योमन्
सो अङ्ग वेद यदि वा न वेद.७.
या निर्मितीचा मुळारंभ जो होता... त्यानेच या साऱ्याला आकार दिला- की नाही दिला? या सृष्टीवर सर्वोच्च स्वर्लोकीच्या कुणा दृष्टीचे नियंत्रण आहे? आहे कां? त्याला तरी हे सारे निश्चितपणे कळत असेल की नसेल...?


हा अनुवाद पूर्वीच कधीतरी करून ठेवलेला... 

आस्तिकांनी डोक्यावर घेतलेले आणखी एक चेटूक

रामदेव बाबा! गेल्या दोन दशकांत हा 'बाबायोगा' दरवर्षी मोठामोठा होत गेला. मास स्केलवर योगासनांची शिबिरे भरवण्याचा त्याचा उद्योग सुरू झाला तो साधरणतः १९९५-९६ च्या सुमारास. आणि मग त्याच्या प्रभावी भाषणशैलीचे व्यापारी सौष्ठव ओळखून त्याला काही व्यावसायिकांनी उचलून धरले. सन २००३ मधे बाबा रामदेव टीव्हीवर झळकू लागला. पहाटेच सुरू होणाऱ्या तथाकथित अध्यात्मिक चॅनेल्सच्या रांगेतल्या आस्था चॅनेलमधे याचीही भर पडली.
टीव्हीवरच्या किंवा कुठल्याही चकाकत्या पडद्यावरील माणसांच्या दर्शनाने भारतीय लोक कसे खुळावतात याची उदाहरणे अगणित आहेत. रामदेव बाबाचा योग, संस्कृती, ‘भ्रस्टाचार’ विरोध, नीती, आरोग्यदात्याची भूमिका, मोठमोठे रोग केवळ योगसाधनेने बिनपैशात बरे करण्याचे दावे, भव्य शामियान्यातील हजारोंच्या गर्दीला एका हाकेसारशी गुडघे टेका, अंगठे धरा वगैरे योगासनांच्या सूचना देण्याची हातोटी या साऱ्याची नशा त्याचे कार्यक्रम पाहाणारांच्या आणि प्रत्यक्ष योग करायला जाणारांच्या डोक्यात भिनली नसती तर नवल. सकाळी उठलं की फुकटात आय़ुर्वेद शिकायला मिळतो अशी शॉर्टकट तज्ज्ञांची चंगळही झाली. आचार्य बालकृष्ण वनस्पती हातात धरून आय़ुर्वेद आणि ओषधी यांचे प्रवचन देऊ लागलेच होते. त्यातून एक वेगळेच साम्राज्य उभे रहायचे होते.
बाबायोगाचे चेटूक पद्धतशीरपणे समाजातल्या योगासने करायचा वेळ परवडणाऱ्या वर्गावर पसरत गेले. कोकाकोलाका उपयोग किसलिये? संडास साफ करने के लिये- या सारख्या घोषणांनी अमेरिकी उत्पादनांना सांसकृतिक विरोध करणारांना चेव आला. कोककोलाचा खप कमी झाल्यावर रामदेवबाबाला आपली ताकद खऱ्या अर्थाने लक्षात आली. २००६मध्ये पतंजली आय़ुर्वेद ही कंपनी बाबायोगा आणि त्याचा उजवा हात बाळकृष्ण यांनी स्थापन केली. भक्तांच्या श्रध्दाळू मनांची जमीन प्राणायामांच्या फाळाने नांगरून झालेली. आपल्या नावे करून झालेली. आता केवळ धंद्याचे बियाणे टाकायचे बाकी होते. दहा वर्षांत या कंपनीची उलाढाल 4500 कोटी रुपयांवर गेली आहे. दर महिन्याला ५०० ते साडेपाचशे कोटीची भर पडण्याचा सध्याचा वाढीचा वेग आहे. बाबायोगाच्या लोकप्रियतेच्या चेटुकात आता जाहिराती, सरकारी पाठबळ अशीही भर पडली आहे. धडकधडकनाचनगुरूंला आता ही जागतिक पातळीवर पोहोचलेली स्पर्धा जाणवू लागली आहे. पतंजली उत्पादने सरकारी मर्जीतल्या उद्योगपतींच्या रिटेल स्टोर्समधून रॅक्सभरभरून विकली जात आहेत. मॅगीवर हल्ला करणे हा बाबायोगाच्या जारणमारणाचाच भाग होता. मग कशा पतंजली नूडल्स आळ्या तेही आपण पाहिले आहे. पुढची तारीख घातलेली उत्पादने आजच बाजारात येत आहेत हेही आपण पाहातो आहोत.
या साऱ्या प्रयत्नांकडे चलो ठीक है एक भारतीय कंपनी पाय रोवू पाहातेय तर काय वाईट आहे असे म्हणून सोडून देता आलेच असते.
पण बाबायोगाचे चेटूक सोडून देण्यासारखे नाही. अर्थात आमच्यासारख्यांनी काही लिहिलं म्हणून या चेटकाला काही फरक पडेल असे नाही याची पुरेपूर जाणीव आहे.
आता बाबायोगाचे इतर आलामंतरकोलाकंतर काय असते ते पहा.
या बाबायोगाने योग आणि प्राणायामांच्या उपयोगातून कॅन्सर- स्तनांचा कॅन्सर, यकृताचा कॅन्सर, प्रोस्टेट, गर्भाशय, पिट्युटरी ग्रंथीचा कॅन्सर आपण बरे करून दाखवल्याचा दावा केला होता. यासाठी आपल्याकडे पुरावे आहेत अशे दावेही केलेच. ते पुरावे कधीही समोर आले नाहीतच.
२००६मधेच एड्ससारखा सिंड्रोम योगासनांनी बरा करण्याचा त्याने दावा केला तेव्हा देशाच्या आरोग्य मंत्रालयाने त्याला ताबडतोब हे दावे करणे थांबवावेत अशी नोटिस दिली. त्याने ते लगेच थांबवलेही. मद्दडांच्या मनाचा कब्जा करण्यासाठी असा फुटकळ दावा थोडा काळ केला तरी पुरेसाच होता.
योग, संस्कृत भाषा एवढ्यापुरतेच शिक्षण घेतलेले असल्याने बाबायोगाकडून आणखी काही अभ्यस्त अपेक्षा करणे चूकच आहे. त्यामुळे होमोसेक्शुअलिटी हा एक रोग आहे असे त्याचे ठासठासून सांगणे त्याच्या कुवतीनुसार बरोबरच होते. जगभरात होमोसेक्शुअलिटीबद्दल जागृती होत असण्याचा तो काळ होता. तिथे बाबायोगाने आपल्या अकलेचे दिवे पाजळून देशातल्या मी माझे स्वतःचे डोके कधीही वापरणार नाही अशी शपथ घेऊन जन्मलेल्या अनेकांच्या मनातला अंधार आणखी गडद केला. आणि होमोसेक्शुअलिटी प्राणायामाने बरी होऊ शकते असे म्हणून न जाणो किती पालकांनी आपल्या मुलांना मानसिक त्रास दिला असेल...
अर्थातच हे दावे करून तशी औषधेही दिव्य औषधी मंदिरमार्फत विकली जाऊ लागली होती.
बाबायोगाची आणखी एक मूठमारी म्हणजे विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देऊन त्यांची मने दूषित करण्यापेक्षा सर्वत्र योगिक शिक्षण सुरू करा असे सांगणे.
बाबायोगाचे पंजाबीड्रेसयुक्त पलायन ज्या आंदोलनात घडले होते ते आंदोलन अखेर हिंदुत्ववादी सरकारला कसे उपयोगी पडले हा आता इतिहास आहे. काळ्या पैशाबाबतच्या उपोषणांची नौटंकी करताकरता बाबायोगा स्वतःच एका काळ्यापैशाबाबतच्या संवादात अडकला होता. पण असल्या गोष्टींची सारवासारव आपल्या देशात कषायवस्त्र ल्यालेल्या कुठल्याही चोराला करता येते हे काही वेगळे सांगायला नको. काँग्रेस नेतृत्वाची फुकटचंबू फौजही या बाबांपुढे झुकत होती, विज्ञानवीर म्हणवणारे, कलाम, भटकर हेही बाबायोगा, बाबाभोगांच्या समोर झुकत आले आहेत.
आज भगव्याचा उद्घोष करणाऱ्या सरकारच्या राज्यात या भगव्याखाली नागव्या असलेल्या बाबाबुवांना भारीच सुरक्षित दिवस आले आहेत. साधी नोटिसही येणार नाही आरोग्यविभागाकडून तर कायदा सुरक्षा विभाग तर हात बांधूनच रहाणार हे स्पष्ट आहे.
एवढा श्रीमंत, सत्तामंत बाबायोगा आता मर्यादा सोडून का बोलू लागला आहे याची ही पार्श्वभूमी आहे.
या देशात (अजून) कायद्याचे राज्य आहे म्हणून- नाहीतर भारतमाता की जय न बोलणाऱ्यांची मुंडकी छाटली असती असे बोलण्याचा माजोरीपणा या बाबायोगाने आज दाखवला आहे. हा बेशरमपणा असाच वाढत जाणार आहे. शांतीच्या नावाने कार्यक्रम भरवायचे आणि त्यात हिंसेलाच उत्तेजन द्यायचे हा कार्यक्रम बेमुर्वतपणे राबवण्यात संघपरिवाराला आता असल्या चेटक्यांचीही मदत मिळू लागली आहे.
हे थांबवणे अवघड होत जाणार आहे. केवळ निर्भय संघर्षच यांना थांबवू शकतो. तो करावा लागेल.
Like
Comment

Monday, April 4, 2016

http://m.maharashtratimes.com/edit/ravivar-mata/etheist-in-maharashtra/articleshow/51664796.cms

हा लेख कालच्या महाराष्ट्र टाइम्समधे प्रसिध्द झाला. आणि मग अर्थातच काही फोन्स, काही मेल्स आणि फेसबुकवरच्या कमेन्ट्स असा प्रतिसाद त्यावर आला.
काही उटपटांग असंबध्द कमेंट्स आल्या नसत्या तरच नवल होतं. तशाच त्या आल्याही. म्हणून विवेकवादाच्या वाटेवर नुकत्याच धडपडत पावले टाकत चाललेल्या लोकांसाठी काही लिहिणे आलेच.
नास्तिक विचाराच्या अस्तित्वाने आणि होय आम्ही नास्तिक आहोत असे छातीठोक पणे सांगणारांच्या अस्तित्वाने बरेच लोक थोडे बावचळतात. कधी रागावतात. त्या वाटेवर जाण्यासाठी थोडे समाजभय ज्यांना आडवे येते, किंवा परंपरांचा पगडा ज्यांना छानच वाटतो ते लोक अशा गुणाढ्य होकारावर जरा जास्तच रागावतात, याचा अनुभव सगळ्याच दिलखुलास नास्तिकांना आलेला असतो. त्यामुळे त्यांना त्याचे विशेष काही वाटत नाहीच. प्रश्न आहे तो नवख्यांचा.
तुम्ही मुस्लिम आस्तिकांवर टीका करीत नाही, तुम्ही ख्रिस्ती आस्तिकांना काहीच म्हणत नाही या नेहमीच्या काड्या टाकल्या जातातच. शिवाय नास्तिक लोक जातीभेद पाळतातच असाही एक अनर्गल बकवास गमतीगमतीत केला जातो. शिवाय नास्तिक लोकांनी एकत्र आलं म्हणजे काय होणार. तेच ते बोअरिंग बोलतात (इंटरेस्टिंग हळदीकुंकू नसतं ना त्यांच्यात!), मग आता यांचा हा एक नवा धर्म, नवी पोथीच तयार होणार का वगैरेही पुळचट युक्तीवाद हुषारीने मांडले जातात. या फडतूस पण तरीही वारंवार होणाऱ्या हल्ल्याला उत्तरे आहेत.
नास्तिक्यविचाराकडे नव्याने वळणाऱ्या लोकांना सांगणे आहे- की नास्तिक मेळावा म्हणजे चळवळ नव्हे किंवा कुणालातरी कन्विन्स करण्याचा मंच नव्हे. जे कुणी या दिशेने विचार करतात त्यांना तुम्ही अयोग्य विचार करीत नाही, या विचारात अनीती नाही, तर कुठल्याही भयगंडातून श्रध्देचा गंज चढवून न घेणारे तुम्ही निर्भय, चमकदार- ब्राईट- लोक आहात हे सांगण्यासाठी इतर नास्तिक एकत्र उभे रहात आहेत.
"नास्तिकांची संख्या वाढेल ही अंधश्रध्दा आहे, किंवा नास्तिकता हीच एक श्रध्दा आहे, किंवा धर्म आहे"... वगैरे वाक्ये टाकणारे आपली या विषयातील समज तोकडी आहे एवढेच जाणवून देतात, मित्र हो. त्याने स्वतःचा बुध्दीभेद करून घेऊ नका. जे विवेकबुध्दीला पटत असेल तेच करा एवढ्याच गोष्टीचा आग्रह धरतात बरेचसे नास्तिक. आणि त्याचाच भाग म्हणून ज्या गोष्टी विवेकाच्या कसोटीवर उतरत नाहीत त्यांचे तसे- अविवेकी, त्याज्य रूप दाखवून देतात नास्तिक.
धर्म, श्रध्दा हे अखेर जवळपास साऱ्याच दुष्कृत्यांचे मूळ जनक असतात हे एकविसाव्या शतकात पुरेसे सिध्द झाले आहे. त्यावर विचार करून स्वतःची वाटचाल ठरवतात नास्तिक. आपण फक्त हा विचार मनात दडपला जाऊ नये म्हणून एकत्र येत आहोत.
अनेकांची बुध्दी केवळ ज्यांच्या पोटी आपण जन्माला आलो त्यांची मने सांभाळण्यासाठी साखळदंडांत पडते. शिवाय सारे काही परंपरेनुसार करणारांचा जथा सोबत असेल आणि बुध्दीबळ कमी पडत असेल तर त्याही साखळ्या पायात घोटाळतात. आपल्या बुध्दीला विचारांच्या निर्भय प्रवासाची चाकं मिळावीत, आपल्या सदैव घडत रहाणाऱ्या विवेकी, अंतिमत्वाचा दावा न करणाऱ्या मतांना शब्द मिळावेत म्हणून नास्तिकांनी एकमेकांची सोबत आहे हे जाणून राहिले पाहिजे.
आपले मत म्हणजे बाबावाक्यच असे समजणाऱ्या अनेक मतांच्या गल्बल्यापुढे गडबडून जाऊ नये म्हणून हे सांगणे. नास्तिकता अखेर सर्व दुष्कृत्यांचे मूळ "देव हा भ्रम" आणि "भ्रामकतेतूनच निपजलेले कुठलेही  धर्म" हेच आहेत या विचारापर्यंत पोहोचवते म्हणून बरीच गर्दी अस्वस्थ होत असते हे लक्षात ठेवले तरीही पुरे.